ऑनलाईन नोंदणीत शाळांना एकच फुटबॉल

ऑनलाईन नोंदणीत शाळांना एकच फुटबॉल

कोल्हापूर - ‘फुटबॉल मिशन वन मिलियन’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात वाटप झालेल्या फुटबॉलची कागदोपत्री संख्या २४०० आहे. ‘वन मिलियन’ अर्थात एक लाख असे उपक्रमाचे नाव असले, तरी प्रत्यक्षात शाळांना किती फुटबॉल वाटप झाले, याची निश्‍चित माहिती मिळत नसल्याची स्थिती आहे.

ऑनलाईन नोंदणीला शाळांकडून प्रतिसाद न मिळाल्याचे कारण सांगत फुटबॉलचे वाटप झाले. ज्यांनी नोंदणी केली, त्या शाळांना तीन, तर ज्यांनी केली नाही त्यांना दोन फुटबॉल देण्याचे निश्‍चित होते. मात्र, काही शाळांना एकच फुटबॉल मिळाल्याचे सांगण्यात येते. 

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत फुटबॉलचे वाटप झाले. १७ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात फुटबॉलमय वातावरण निर्माण करणे, हा त्याचा उद्देश होता. १७ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघात समावेश झालेला कोल्हापूरचा अनिकेत जाधव हा उपक्रमाचा अम्बॅसिडर होता. उपक्रमांतर्गत १५ सप्टेंबरला महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर थाटामाटात कार्यक्रम झाला. तत्पूर्वी, १३ सप्टेंबरलाच फुटबॉलचे शाळांना वाटप करण्यात आले. त्या वेळी जिल्हा क्रीडा कार्यालयाला एक हजार फुटबॉल मिळाले. त्यामुळे काही शाळांना फुटबॉल देण्यात आले. उर्वरित फुटबॉल कधी येणार, अशी विचारणा सुरू झाल्यानंतर १९ सप्टेंबरला १४०० फुटबॉल क्रीडा कार्यालयाला मिळाले. एकूण २४०० फुटबॉलचे कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका व जिल्हा परिषद शाळांना वाटप करण्यात आले. 

विशेष म्हणजे मोठा गाजावाजा करीत ‘फुटबॉल मिशन वन मिलियन’ कार्यक्रम उरकला असला, तरी प्रत्यक्षात राज्यात ७५ हजार फुटबॉलचे वाटप झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून पुढे येत आहे. सुरवातीला प्रत्येक शाळेला पाच फुटबॉल देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ऑनलाईन नोंदणीला शाळांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या संख्येत बदल केला आणि त्यात ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना तीन व न करणाऱ्यांना दोन फुटबॉल देण्याचे निश्‍चित झाले. याबाबत विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले, की संख्येत बदल झाला असला, तरी शाळांना फुटबॉल पोचविण्यात आले आहेत. महापालिकेच्या क्रीडा विभागाचे निरीक्षक सचिन पांडव यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘महापालिकेच्या दहा शाळांना दहा फुटबॉल मिळाले. ते त्या शाळांना दिले आहेत.’’ लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरचे मुख्याध्यापक उत्तम गुरव म्हणाले, ‘‘फुटबॉलसाठी ऑनलाईन नोंदणी केली. मात्र, शाळेला एकच फुटबॉल दिला आहे.’’

दृष्टिक्षेपात...
 महापालिका क्षेत्रात वितरित फुटबॉल    ३०५
 कार्यक्रमासाठी तालुका मुख्यालय    २४०
 जिल्हा मुख्याल    १०
 जिल्हा परिषद शाळा    १३

तालुकानिहाय वाटप झालेले फुटबॉल
(एकूण- १८३२) -
 
 कागल     १६६
 गडहिंग्लज     १३९
 शाहूवाडी     १०३
 चंदगड     १४०
 पन्हाळा     १८२
 भुदरगड     १४६
 करवीर     २२३
 आजरा     ७३
 हातकणंगले     ३१९
 शिरोळ     १७६
 गगनबावडा     ३३
 राधानगरी     १३२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com