एक घर..वास्तुशास्त्रापासून कोसो दूर

एक घर..वास्तुशास्त्रापासून कोसो दूर

कोल्हापूर - वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार हा प्लॉट दक्षिणाभिमुख, व्याघ्रमुखी. अशा प्लॉटमध्ये घर बांधणे म्हणजे आयुष्यभर कटकट मागे लावून घेणे. असा काही वास्तुशास्त्रज्ञांनी इशाराच दिला होता. त्यामुळे हा प्लॉट बरीच वर्षे पडून होता. प्लॉट विकत घ्यायला कोण तयारच होत नव्हता... पण कोल्हापूर हे असे एक गाव आहे की, येथे एखादा असा कोल्हापुरी असतो की, तो प्रवाहाच्या विरोधात पोहायचेच म्हणून प्रवाहात उडी घेतो. 

मिलिंद रणदिवे हा असाच एक कोल्हापुरी की, त्यांनी सुर्वेनगरजवळ वास्तुशास्त्राच्या दृष्टीने बदनाम झालेला प्लॉट विकत घेतला. पूर्व-पश्‍चिम, दक्षिण-उत्तर किंवा आग्नेय-वायव्य अशा दिशांची कोणतीही बंधने न घालता त्यावर घर बांधले. हवा आणि प्रकाश भरपूर प्रमाणात घरात येईल, असे बांधकाम करायचे एवढे मात्र काटेकोरपणे पाळले. दारात फळांची झाडे लावली. ती मनापासून वाढवली. रणदिवे कुटुंब या घरात राहू लागले. दारातल्या झाडावर पक्षी घरटी करू लागले. आज हे घर कोल्हापुरातले सर्वांत साधे पण सर्वांत सुंदर असे घर ठरले आहे. या घरावर तयार केलेल्या पश्‍चिमा या शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकण्याचा सन्मान मिळाला.

ज्या घरात हवा, प्रकाश भरपूर आहे, ज्या घरातल्या लोकांच्या मनात समाधान भरलेले आहे, अशा घराला वास्तुशास्त्राच्या सल्ल्याची गरज नसते. बाथरूम इकडे, देव्हारा तिकडे, पाण्याची टाकी डावीकडे, बेडरूम उजवीकडे असल्या कारणासाठी चांगल्या घराची तोडफोड करायची वेळ अशा घरात येत नसते. असे घर त्यातल्या कुटुंबाबरोबरच आजूबाजूच्या निसर्गाचा, परिसराचा एक घटक बनलेले असते, हे या शॉर्ट फिल्ममधून सांगितले गेले आहे. आपल्या गरजेनुसार, आपल्या बजेटनुसार बांधलेले घरच किती सुंदर आणि समाधानाने भरलेले असते, यावर या शॉर्ट फिल्ममधून भाष्य केले आहे. 

मिलिंद रणदिवे व्यवसायाने आर्किटेक्‍ट आहेत; पण त्यांनी आपलं हे घर बांधताना अनावश्‍यक खर्च टाळला आहे. झुंबर, गालिया, झगझगीत फर्निचर, चकचकीत रंग, पावला पावलावर दिवे असले प्रकार त्यांनी आपल्या घरापासून लांब ठेवले आहेत. आपले घर म्हणजे एक इमारत न राहता ती निसर्गाचाच एक घटक बनली पाहिजे, ही खबरदारी घेतली आहे. आकर्षक रंग, प्रकाशझोत, राजेशाही कंपाऊंड बांधून आपले घर इतरांपेक्षा उठावदार दिसावे हा अनेकांचा प्रयत्न असतो; पण रणदिवे यांनी साधं घर, अंगणात झाडी, त्यावर चिवचिवाट करणारे पक्षी, घरात भरपूर प्रकाश व कधीच पंखा लावायला लागत नाही, अशी खेळती हवा ठेवून आपले घर इतरांपेक्षा उठावदार केले आहे. त्यावर त्यांनी शर्वरी जोडा, रवींद्र सुतार या सहकाऱ्यांच्या साथीने शॉर्ट फिल्म केली आहे. कोल्हापुरात आजपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रविवारी व बुधवारी ही शॉर्ट फिल्म दाखवली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com