केएमटी अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - पंजा मिरवणुकीत केएमटी घुसून झालेल्या अपघातातील आणखी एका जखमीचा आज उपचार सुरू असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आनंदा बापू राऊत ऊर्फ महाराज वाघे (वय 60, रा. राजारामपुरी तिसरी गल्ली) असे त्यांचे नाव आहे. अपघातातील मृत्यूंची संख्या आता तीन झाली. राऊत यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली. राजारामपूरी परिसरातील दुकाने बंद करण्यात आली असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

रविवारी (ता.1) सायंकाळी ताबूत विसर्जन मिरवणूक पापाची तिकटीवरून गंगावेश मार्गे पंचगंगानदीकडे जात होती. राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील बदाम पंजा तिसऱ्या गल्लीतून वाजत गाजत बाहेर पडला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास मिरवणूक पापाची तिकटी येथे आली. दरम्यान रुकडी ते लक्षतीर्थ वसाहतकडे जाणारी केएमटी बस त्या मिरवणुकीत घुसली. यात तानाजी साठे (वय 50) आणि सुजल अवघडे (वय 14) हे दोघे ठार झाले तर 22 जण जखमी झाले. जखमींत आनंदा बापू राऊत (वय 60), पृथ्वीराज सहारे (वय 14), बाळकृष्ण हेगडे (वय 23), स्वप्निल साठे (वय 22), विनोद पाटील (वय 23), आकाश तानाजी साठे (वय 25), सचिन साठे (वय 25), अनुराग भंडारे (वय 14) सुमित फाळके (वय 10), करण साठे (वय 19), योगेश कवाळे (वय 26), अमर कवाळे (वय 17), कुणाल साठे (वय 29), सनी घारदे (वय 28) आणि दत्ता केरबा साठे (सर्व रा. राजारामपुरी तिसरी गल्ली) यांचा समावेश होता. यातील राऊत यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारसाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. 

उपचार सुरू असताना राऊत यांचा आज दुपारी मृत्यू झाला. तसे नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. तशी राजारामपुरीतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली. तसा तणाव निर्माण झाला. यापूर्वीच परिसरासह सीपीआरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.