राधानगरीत गव्याच्या हल्ल्यात महिला ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

राधानगरी - हत्तीमहल येथील वनकर्मचारी वसाहतीमध्ये आज सकाळी गव्याच्या हल्ल्यात वनकर्मचाऱ्यांची नातेवाईक असलेली वृध्द महिला रमाबाई रामभाऊ शेळके (वय 65) ठार झाल्या.

राधानगरी - हत्तीमहल येथील वनकर्मचारी वसाहतीमध्ये आज सकाळी गव्याच्या हल्ल्यात वनकर्मचाऱ्यांची नातेवाईक असलेली वृध्द महिला रमाबाई रामभाऊ शेळके (वय 65) ठार झाल्या.

कोल्हापूर-कणकवली राज्यमार्गालगत हतीमहल येथे वन्यजीव क्षेत्रातच वन्यजीव विभागाचे कार्यालय व कर्मचारी वसाहत आहे. येथे वन्यजीव विभागात कार्यरत असलेले वनरक्षक नितिन नलवडे वास्तव्यास आहेत. ते व त्यांच्या पत्नी रंजनाही वनरक्षक आहेत. त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी श्री. नलवडे यांच्या सासू व रंजनाच्या आई रमाबाई येथे आल्या होत्या. आज सकाळी सहा वाजता त्या अंगणाची झाडलोट करत असतानाच रात्री शेतीक्षेत्रात गेलेला गवा वन्यजीव क्षेत्राकडे जात असताना त्याने त्यांना जोराची धडक दिली. त्याचवेळी शेजारी राहात असलेल्या वनक्षेत्रपाल आजित साजणे फिरावयास बाहेर पडले असताना त्यांना गव्याची चाहूल लागली. त्याचवेळी अंगणात रमाबाई अंगणात बेशुध्दावस्थेत पडलेल्या दिसल्या. इतर कर्मचाऱ्यांना हाका मारून त्यांनी बोलावले. रमाबाई यांना तातडीने उपचारासाठी राधानगरीतील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्या मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

वनरक्षक नलवडे वास्तव्यास असलेल्या निवासस्थानाच्या शेजारूनच जाणाऱ्या रस्तायाने गव्यांची वन्यजीव क्षेत्रातून राज्यमार्गापलीकडील शेतीमध्ये ये-जा सुरु असते. या निवासस्थानाच्या मागील बाजूस वन्यपशूंना पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी सिमेंटचा कुंड बांधला आहे. त्याठिकाणीही उन्हाळ्यात गवे पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे वन्यजीव कर्मचारी वसाहत सद्यस्थितीत गवा उपद्रवप्रवण ठरत आहे. गेल्या आठवडयातही याचठिकाणी गव्याचा कळपच पाण्याच्या शोधात आला होता.

रमाबाई यांचा मृतदेह त्यांच्या मूळगावी भीमदरी (जि. नगर) येथे नेण्यात आला आहे. घटनास्थळी विभागीय वन्यजीव अधिकारी विजय खेडकर, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पाटील, यांनी भेट देवून माहिती घेतली. 

Web Title: Kolhapur News one woman dead in Gava attack in Radhanagairi