शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचा बोजवारा 

राजेंद्र पाटील
मंगळवार, 27 जून 2017

कोल्हापूर - शिक्षणची वेबसाईट बंद राहणे, सर्व्हर डाऊन होणे, लॉगीन न होणे, व्हेरीफिकेशन वेळेत न होणे अशा वारंवारच्या तांत्रिक बिघाडामुळे शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचा बोजवारा उडाला आहे. बदलीच्या एकूण चार टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यातील संवर्गास ऑनलाईन अर्ज करण्यास तीनवेळा मुदत वाढवावी लागली तरीही अर्ज भरणे अपूर्णच आहे. बदलीच्या नवीन धोरणामुळे शिक्षक अस्वस्थ झाले आहेत. बदलीच्या अन्यायी धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षक संघटना करीत आहेत. 

ग्रामविकास विभागाने यावर्षी शिक्षकांसाठी बदल्यांचे नवे धोरण तयार केले असून राज्यस्तरावरूनच ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी शिक्षकांना सरल प्रणालीतील स्टाफ पोर्टल व ट्रान्स्फर पोर्टल यावर शिक्षकांना ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागत आहेत. 

2016-17 च्या संचमान्यतेनुसार अनेक शिक्षकांची नावे स्टाफ पोर्टवर नाहीत. बदली झालेल्या शिक्षकांची नावे संबंधित शाळेतून कमी केलेली नाहीत  व नवीन शाळेत अटॅच झालेली नाही. अनेक मुख्याध्यापकांची नावे शिक्षकाच्या पदावरच भरलेली आहेत. 

अनेक शिक्षकांच्या जिल्ह्यात हजर झालेल्या तारखेत बदल झाला आहे. सरल प्रणालीची हीच माहिती अद्ययावत नाही. या प्रणालीच्या ट्रान्स्फर पोर्टलमध्येच बदलीची माहिती भरावयाची आहे. त्यामुळे शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

बदल्यांच्या एकूण चार टप्प्यांपैकी विशेष संवर्ग भाग एकचे ऑनलाईन बदली अर्ज भरण्यास 17 जूनपासून सुरवात झाली.  21 जूनपर्यंत अर्ज भरावयाची होते. या वेळेत नेहमीच वेबसाईट बंद, सर्व्हर डाऊन राहिल्याने 24 जूनपर्यंत मुदत वाढविली. 

या काळातही हीच परिस्थिती राहिल्याने आता 28 जूनपर्यंत तिसरी मुदतवाढ केली आहे. परंतु गेले दोन दिवस बंद अवस्थेतील वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड कायमच आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरताना शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. ऑनलाईन बदली प्रक्रिया शिक्षकांना त्रासदायक ठरू लागली आहे. 

संवर्ग एकमधील शिक्षकांचे अर्ज भरणेस दहा दिवसांचा कालावधी पूर्ण झाला.तरी अद्याप काम बाकी आहे. शिक्षक संख्या जादा असलेल्या संवर्ग दोन, तीन, चारमधील शिक्षकांचे बदली अर्ज भरणेस किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही. 

बदली धोरणाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासन निर्णयावर अनेक ताशेरे ओढले आहेत. त्या अनुषंगाने बदली प्रक्रियेस स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. 
बाळकृष्ण तांबारे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक  शिक्षक संघ (थोरात गट)