शिरोळ तालुक्‍यात केवळ 270 शेतकऱ्यांना कर्जमाफी 

गणेश शिंदे
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

जयसिंगपूर -  आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत असलेल्या शिरोळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आशेवर पाणी पडले आहे. तालुक्‍यातील 6578 शेतकऱ्यांनी फॉर्म भरुनदेखील केवळ 270 शेतकरीच कर्जमाफीस पात्र ठरले आहेत.

जयसिंगपूर -  आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत असलेल्या शिरोळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आशेवर पाणी पडले आहे. तालुक्‍यातील 6578 शेतकऱ्यांनी फॉर्म भरुनदेखील केवळ 270 शेतकरीच कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. लाभ कमी आणि गोंधळच अधिक अशी स्थिती कर्जमाफी योजनेची बनली आहे. या गोंधळात अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आशाच सोडून दिल्याचे चित्र तालुक्‍यात निर्माण झाले आहे. 

कर्जमाफीसाठी सरकारने 1 एप्रिल ते 31 मार्च 2016 मुदत घालून दिली. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. कर्जमाफीच्या रांगेतील बहुतांश शेतकरी ऊस उत्पादक आहे. तालुक्‍यातील 6578 शेतकऱ्यांनी 66 रकान्यांचा फॉर्म भरुन कर्जमाफीची अपेक्षा बाळगली होती. यातील केवळ 270 शेतकऱ्यांनाच कर्जमाफी झाल्याने तालुक्‍यातील दिडशे संस्थांच्या 6308 शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेतून सरसकट कर्जमाफी केली जावी यासाठी शिरोळ तालुक्‍यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य पक्षांचा अजेंडा होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या मागणीसाठी राज्य आणि देशभर आंदोलने करुन सरकारला सरसकट कर्जमाफीसाठी दबाव टाकला. मात्र, हि आंदोलने सरकारने फारशी गांभीर्याने घेतली नसल्याचे कर्जमाफीच्या यादीवरुन स्पष्ट होते.

चार नद्यांनी समृध्द असणाऱ्या शिरोळ तालुक्‍यातील शेती व्यवसाय आज अनेक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. सर्वाधिक ऊस पिकानंतर भाजीपाल्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ऊसाचा वाढता उत्पादन खर्च आणि त्या तुलनेत नसलेला दर, ऊस पिकासाठी पाण्याचा वारेमाप वापर केल्यामुळे जमीनीचा ढासळणारा पोत यामुळे ऊस उत्पादकांना मोठी चिंता सतावत आहे. वर्षभर शेतात ऊसाची निगा राखूनही लांबलेला पाऊस, वीजेचे भारनियमन आणि परतीच्या पावसाने केलेली दैना यामुळे ऊसाच्या उताऱ्यात यंदा सुमारे 35 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. 

शिरोळ तालुक्‍यात क्षारपड जमिनीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी जयसिंगपूर-उदगाव बॅंकेच्या माध्यमातून क्षारपड जमीन पिकाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करुन क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न कौतूकास्पद आहेत. क्षारपड जमीन पिकाखाली आल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्त्रोत उंचावण्यास मदत होणार आहे. मात्र, क्षारपड जमिनीवर प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जाचाच आधार घ्यावा लागणार आहे. 

भाजीपाला पिकाच्या क्षेत्राची अवस्थाही वेगळी नाही. किडनाशके, खतांची दरवाढ, निसर्गाचा लहरीपणा यामुळे भाजीपाला उत्पादकही अडचणीत आला आहे. अनिश्‍चित दर आणि राज्यातील मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला निर्यातीच्या कोलमडलेल्या गणितामुळे स्थानिक आणि नजीकच्या बाजारपेठेत भाजीपाला जाऊ लागल्याने याचा दरावर परिणाम झाला आहे. ऊस आणि भाजीपाला पिकांतून आर्थिक प्रगती साधताना शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे उभी राहिली आहेत. 
कर्जमाफीतून शेतकऱ्यांना उभारी मिळेल अशी आशा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना होती. 

तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफ करुन अडचणीतील शेतकऱ्यांना सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सध्या कर्जमाफीपेक्षा गोंधळच अधिक जाणवत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशा सोडल्याचे चित्र तालुक्‍यात पहायला मिळत आहे. 

महसूलाच्या तुलनेत शासनाची सोयीसवलती कमी

शिरोळ तालुक्‍यातून सर्वाधिक महसूल शासनाच्या तिजोरीत जातो. मात्र, त्या तुलनेत इथल्या शेतकऱ्याला शासनाकडून म्हणाव्या तितक्‍या सोयीसवलती मिळत नाहीत. चार नद्यांनी समृध्द असणाऱ्या या तालुक्‍यातील शेतकरी आज अनेक समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. सर्वाधिक महसूल देणाऱ्या इथल्या शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी शासन पातळीवर मात्र फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही याचे मोठे शल्य शेतकऱ्यांना वाटत आहे. 

Web Title: Kolhapur News Only 270 farmers in Shirol taluka have debt waiver