सरकारकडून केवळ शब्दांचा खेळ - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

कोल्हापूर - शेतकऱ्यांना सारखी-सारखी कर्जमाफी मिळावी या मताचा मी नाही; परंतु शेतकरी नैसर्गिक संकटात असताना त्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे. जाहीर झालेल्या कर्जमाफीचे दररोज नियम आणि निकष बदलून शब्दांचा खेळ केला जात आहे. सध्याच्या कर्जाची परतफेड करा, मगच तुम्हाला 2016 च्या कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी अट घालून शेतकऱ्यांची अडचण केली जात असेल, तर विधानसभेत आवाज उठविला जाईल, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज येथे दिला. शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, 'राष्ट्रवादीने चांदा ते बांदापर्यंत संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर अनेक संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर आसूड यात्रा, शिवार यात्रा, संवाद यात्रा, पदयात्रा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली, त्यामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. पुणतांब्यासारख्या गावामध्ये तर शेतकऱ्यांनीच संप पुकारला. देशाच्या इतिहासात कोणतेही सरकार असताना शेतकऱ्यांनी संप केला नाही, तो संप भाजप- शिवसेनेच्या सत्तेत झाला. सरकारविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला, त्यानंतर कर्जमाफी जाहीर झाली; पण कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार शब्दांचा खेळ करत आहे. त्यांनी हा खेळ थांबवला नाही, तर येत्या अधिवेशनात आवाज उठविला जाईल.''