ओपन बारवर तातडीने कारवाई करा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

कोल्हापूर - महामार्गावरील मद्याची दुकाने, बार जसे बंद झाले, तसे ओपन बारचे प्रमाण शहरासह जिल्ह्यात वाढू लागले आहे. अशा ओपन बारमुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या ओपन बारवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले. 

शहरातील मैदाने, मोकळ्या जागा, बगीचा, रस्त्यालगतचे बोळ अगर थेट रस्त्याकडेला बंद असलेल्या दुकानांच्या दारात तळीरामांचा सायंकाळनंतरच ओपन बार सुरू होतो. मद्याची नशा चढल्यानंतर शिवीगाळ अन्‌ त्यातून होणारी भांडणे याचा त्रास सामान्यांना सहन करावा लागतो. यात तरुण पिढी व्यसनाधीन होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अनेक तक्रारीही दाखल होत आहेत. याची दखल घेत नांगरे-पाटील यांनी सायंकाळनंतर मैदाने, मोकळ्या जागा, निर्जन स्थळे, बागा, नदीकाठ परिसर अशा ठिकाणी ओपन बारवर छापे टाकून त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार तातडीने या कारवाईस सुरवात होणार आहे. त्याचबरोबर येथे मद्य पुरविणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाणार आहे. मद्याचा साठा ज्यांच्याकडून हस्तगस्त होईल, यांच्यावर तडीपारीच्या कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचनाही नांगरे-पाटील यांनी दिल्या आहेत. मद्य तस्करीबाबतच्या जयसिंगपूर, शिरोळ, कोल्हापूर, इचलकरंजीतील सात ते आठ टोळ्यांवर तडीपारीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यांच्यावर येत्या 15 दिवसांत हद्दपारीची कारवाई करण्यात येईल, असेही नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.