शेतकऱ्यांच्या खात्यांवर साडेसहा हजार कोटी जमा - फडणवीस

वारणानगर : येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेजारी मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनय कोरे.
वारणानगर : येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेजारी मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनय कोरे.

कोल्हापूर - वारणा ब्रेकिंगसाठी राखून ठेवलेली घोषणा, असे म्हणत राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आजच साडेसहा हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने मुंबईत पहिले जिल्हा भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

वारणा विविध उद्योग समूह आणि शिक्षण संकुलातर्फे वारणानगर येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर रात्री वारणा परिवाराशी मुक्‍त संवाद ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ प्रश्‍नोत्तर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. या वेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना मुख्यमंत्र्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. सुमारे सव्वा तास संवाद चालला. व्यासपीठावर पालकमंत्री 
चंद्रकांत पाटील होते. या निमित्ताने वारणा परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘ऊस उत्पादक शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज परत करत असतो. त्यामुळेच ग्रामीण भागातील सोसायट्या टिकून आहेत. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपये देतो. या रकमेत निश्‍चितपणे वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुळात कर्जमाफी ही योजना नाही तर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला ती मदत आहे. गेल्या वेळच्या कर्जमाफीत अनेक नेत्यांनी आपले हात धुऊन घेतले. तसा प्रकार होऊ नये आणि लोकांचा पैसा वाया जाऊ नये म्हणून अतिशय पारदर्शीपणे ही योजना राबविण्यासाठी आम्ही काही निकष लावले. त्यातून १५ लाख ४२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आजच साडेसहा हजार कोटी रुपये जमा केले आहेत. येत्या दहा-पंधरा दिवसांत कर्जमाफीचे काम संपेल. आनंदराव भोसले यांनी यासंदर्भात प्रश्‍न विचारला होता.

सागर मोहिते यांनी शैक्षणिक धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘सध्याच्या शिक्षण पद्धतीत केवळ पदव्या दिल्या जातात. संस्था बेरोजगारी निर्माण करणारे कारखाने आहेत. आजही अभियांत्रिकीची पदवी घेतलेले तरुण बेरोजगार आहेत. कारण त्यांच्यामध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची उणीव आहे. त्यासाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्यासाठी शासन व्यवस्था उभी करत आहे.’’

दूध दराबाबत धनाजी चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘‘दूध व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. बाजारपेठेत दुधाच्या पावडरचे दर पडले तर त्याचा दुधाच्या दरावर परिणाम होत असतो. त्यामुळे दूध पावडरचा पूरक आहार किंवा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. यामुळे मुलांचे पोषणही चांगले होईल आणि दूध उत्पादकाला भाव देखील चांगला मिळेल. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती सर्व बाबींचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे.’’

कृषी पंपांच्या बिलाबाबत विक्रम पाटील यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘वाढीव बिलाला आपणच अंतिम स्थगिती दिली आहे. याबाबत पूर्वीप्रमाणेच बिले आकारण्यात येतील. वारणा उजवा कालवा रद्द करून शिरोळ येथे उपसा जलसिंचन करण्यास परवानगी देण्याबाबत तसेच दालमिया साखर कारखान्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.’’ 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने मुंबईत भवन उभारण्यासाठी मुंबईत जागा उपलब्ध करून देण्यात येईल. दिल्लीत प्रत्येक राज्यांची जशी भवन आहेत, तसे मुंबईत प्रत्येक जिल्ह्याचे भवन उभारणे शक्‍य नाही; मात्र कोल्हापूर जिल्ह्यासाठी शाहू भवन उभारू. त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे श्री. फडणवीस यांनी डॉ. रिया सांगळे यांच्या प्रश्‍नावर सांगितले.

शिक्षकांच्या बदल्या मेमध्येच करण्यात येतील. विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल, तेथे एसटी बस उपलब्ध करून दिल्या जातील. माथाडी कामगारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. गावठाणलगतची शासकीय जागा विकासासाठी उपलब्ध करून दिली जाईल. त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

जिल्ह्याच्या पर्यटन विकासाठी आत्तापर्यंत जोतिबासाठी २५ कोटी, पन्हाळ्यासाठी ८ कोटींचा निधी दिला आहे. पर्यटन वाढीसाठी जी मदत लागेल, ती शासन करण्यास तयार आहे. महिला बचत गटाची चळवळ अतिशय चांगली सुरू आहे. १५ हजार बचत गटांना १०२ कोटीचे कर्ज मिळवून दिले आहे. त्याची वसुलीही शंभर टक्‍के होत आहे. या चळवळीतील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी बचत गटाच्या मालांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मॉल उभारण्यात येतील, असेही श्री. फडणवीस यांनी विविध प्रश्‍नांना उत्तर देताना सांगितले.

नितीन पाटील, सुनीता पाटील, कृष्णात खोत, युवराज पाटील, आम्रपाली कांबळे, अशोक कुंभार, दिनकर पाटील यांनी प्रश्‍न विचारले.

जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांनी, प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका विषद केली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, विश्‍वेश कोरे, वारणा बॅंकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे, वारणा कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे, सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी आदी उपस्थित होते.

नाभिक समाजाची माफी
नाभिक समाजाचा अनादर करण्याचा आपला मुळीच हेतू नव्हता. त्यामुळे आपल्या बोलण्याने कोणाच्या भावाना दुखावल्या असतील तर यापूर्वीच मी दिलगिरी व्यक्‍त केली आहे. या कार्यक्रमातही आपण माफी मागतो, असे म्हणत त्यातूनही जर त्याच्या आडून राजकारण करावयाचे असेल तर त्याला मी काही म्हणू शकत नाही, असे श्री. फडणवीस यांनी सुनील काशीद यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर स्पष्ट केले.

वारणा नव्हे, प्रेरणा
समारोप करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘वारणा हे प्रेरणा देणारे आहे. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच वारणेत होत आहे. एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात येथून झाली. यामुळे मलाही काही प्रश्‍न समजण्यास मदत झाली. हा उपक्रम असाच पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करू.’’

त्यांनाही जरा दुर्गम बघू दे
शिक्षकांच्या बदल्या मेमध्येच होतील. दुर्गममध्ये दहा-पंधरा वर्षे काढलेल्यांना सुगममध्ये जाण्याची संधी द्या आणि सुगमवाल्यांनाही दुर्गम भागात कसं असतंय ते पाहू दे, असे श्री. फडणवीस यांनी राजाराम वरुटे यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com