रचनात्मक प्रशिक्षणातून यशस्वी होण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - योग्य मार्गदर्शन आणि रचनात्मक प्रशिक्षणातून तरुणांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तसेच उद्योजक किंवा कार्यकुशल कर्मचारी बनवण्याची संधी देणाऱ्या लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमची आज जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत घोषणा करण्यात आली. सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या (एसआयएलसी) पुढाकाराने ‘सिमॅसिस’ आणि ‘यंग इन्स्पिरेटर नेटवर्क’ (यिन) यांच्या माध्यमातून हा लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे. वर्गाच्या भिंतींच्या चौकटीपलीकडे जाऊन प्रशिक्षण हे या अभ्यासक्रमाचे वेगळेपण आहे.  

कोल्हापूर - योग्य मार्गदर्शन आणि रचनात्मक प्रशिक्षणातून तरुणांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तसेच उद्योजक किंवा कार्यकुशल कर्मचारी बनवण्याची संधी देणाऱ्या लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमची आज जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत घोषणा करण्यात आली. सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या (एसआयएलसी) पुढाकाराने ‘सिमॅसिस’ आणि ‘यंग इन्स्पिरेटर नेटवर्क’ (यिन) यांच्या माध्यमातून हा लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे. वर्गाच्या भिंतींच्या चौकटीपलीकडे जाऊन प्रशिक्षण हे या अभ्यासक्रमाचे वेगळेपण आहे.  

आज केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बापूजी साळुंखे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्‍नॉलॉजी, सायबर कॉलेज, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्‍निक, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्‍निकल या महाविद्यालयांत याची माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. भोगावती महाविद्यालय येथे महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक घेऊन त्यांनाही याची माहिती देण्यात आली. चीफ मॅनेजर कम्युनिटी नेटवर्क, सकाळ माध्‍यम समूह तेजस गुजराथी, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, कुणाल क्षीरसागर, शाम माडेवार यावेळी उपस्थित होते.  

या प्रोग्रॅममध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव व प्रात्यक्षिकांमधील कौशल्ये शिकवण्यात येणार असून, त्याद्वारे प्रशिक्षणार्थींना उद्योजक किंवा कुशल कर्मचारी म्हणून भविष्यात करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतील. बारा महिन्यांचा हा अभ्यासक्रम आहे. समाजात सकारात्मक व शाश्‍वत परिणाम घडवून आणणे, स्वतःचा आणि कुटुंबाचा परिपूर्ण विकास, नावीन्यपूर्ण व क्रांतिकारक उपाययोजना, प्रशिक्षणार्थींचे यशस्वी उद्योजकात किंवा कार्यक्षम कर्मचाऱ्यांत रूपांतर करणे, ही या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहेत.

कौशल्य विकासासाठी सुयोग्य व्यासपीठ असून, यामध्ये तुम्हाला मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून कोठूनही व कधीही शिकण्याची मुभा असणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष कार्यशाळेत सहभाग, लाइव्ह वेबिनार्स, इंटर्नशिप, प्रोजेक्‍ट, व्यावसायिक कौशल्यविकास प्रशिक्षण, मेन्टॉरशिप आणि इनक्‍युबेशन किंवा सीड फंडिंगच्या माध्यमातून यामध्ये सहभागी होऊ शकता. या बारा महिन्यांच्या अभ्यासक्रमात आठ महिने व्हिडिओ, वेबिनार्स, असेसमेंट्‌स आणि स्टडी मटेरिअल या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. एक महिना पूर्णपणे प्रकल्पावर काम किंवा इंटर्नशिप आणि तीन महिन्यांची स्टार्टअप स्पर्धा किंवा व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. 

प्रत्यक्ष व्यवहारात सहजपणे वापरता येऊ शकेल, अशा प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण यातून मिळेल. या उपक्रमाद्वारे ध्येयवादी विद्यार्थी व प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून मूल्याधारित समाजाची निर्मिती होईल. 

कोण कोण सहभागी होऊ शकते...
महाविद्यालय स्वतः विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवू शकतात
संगणक संस्था, सहकारी व खासगी बॅंका, शैक्षणिक संस्था आपल्या सभासदांच्या मुलांसाठी हा उपक्रम राबवू शकतात
औद्योगिक, व्यापारी संस्था आपल्या कर्मचारी व कामगारांच्या मुलांसाठी हे राबवू शकतात.
ज्या तरुणांना स्वतःहून यामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी ‘यिन’चे सूरज चव्हाण ८८५६०५२५५६ यावर संपर्क साधावा.