सुशिक्षित शेतकरी देणार विषमुक्त भाजी !

सुशिक्षित शेतकरी देणार विषमुक्त भाजी !

सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असताना शेतकरी कुटुंबातील अशा तरुणांसाठी कणेरी येथील सिद्धगिरी मठाच्या पुढाकाराने विषमुक्त (सेंद्रिय) भाजी मार्केटचे नेटवर्क उभे केले जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला. येत्या महिनाभरात १४ शेतकऱ्यांच्या शेडनेटमधून भाजीचे उत्पादन सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात अशा भाजी उत्पादन केंद्रांची संख्या वाढवली जाणार असून, मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहेत. 

सिद्धगिरी मठाने आजवर अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले आणि यशस्वी केले. सुशिक्षित बेरोजगार तरुणाईसाठी सेंद्रिय भाजी मार्केटचा हा प्रकल्प किमान दहा गुंठे शेती असणाऱ्या तरुणांसाठी राबवला जातो आहे; मात्र संबंधित शेतकऱ्याचे पाणी व वीज कनेक्‍शन स्वतःचे हवे. दहा गुंठ्यांपैकी पाच गुंठे क्षेत्रात भाजी उत्पादन केंद्र असेल. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने येथे भाजीचे पीक घेतले जाईल. एका शेतकऱ्याला पावणेदोन लाख रुपयांचे अर्थसाह्य केले जाईल. त्यापैकी निम्मी रक्कम त्याने भाजी विक्रीच्या नफ्यातून परतफेड करायची आहे

प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. महिन्याभरात पहिल्या टप्प्यातील सर्व शेडनेटमधून भाजी उत्पादनाला प्रारंभ होईल. पहिल्या टप्प्यात काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या दुरुस्त करून दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होईल.
- काडसिद्धेश्‍वर स्वामीजी

 

ठाण्यातही प्रयोग...!
रासायनिक खतांचा वापर आणि शेतीमालातील रासायनिक अंश हा विषय आता जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरतो आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सेंद्रिय विषमुक्त शेतीची चळवळ वाढत असताना अशा शेतीमालाला हमीभाव आणि मार्केटसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठीच सिद्धगिरी मठाचा प्रकल्प कोल्हापूर परिसरात महत्त्वाचे योगदान देणारा ठरणार आहे. ठाण्यात २०१४ साली सतीश सूर्यवंशी आणि गिरीश आवटे या मित्रांनी मिळून ८० हून अधिक शेतकऱ्यांना एकत्र आणले आणि सेंद्रिय शेतीचा ‘सात्विक’ हा प्रकल्प सुरू केला. सध्या २० ते २५ प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्या या प्रकल्पातून थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोच होतात.

असे असेल नेटवर्क
शेती उत्पादक सोसायटीच्या माध्यमातून भाजीची विक्री होईल. शेतकऱ्याला भाजीचा वर्षभर एकच हमीभाव दिला जाईल. सोसायटी आणि ग्राहकांच्या वर्षासाठी भाजी खरेदीचे करार होतील. खरेदीचा दरही वर्षभर एकच असेल. बाजारात चढउतार झाले तरी या दरात बदल होणार नाही.

सोसायटीने दिलेल्या यादीनुसारच शेतकरी पालेभाजी, फळभाज्यांचे पीक घेतील. सर्व भाजी उत्पादन केंद्रातून भाजी एका ठिकाणी एकत्रित केली जाईल. सोसायटीच्या माध्यमातून आठवड्यातून दोन वेळा ग्राहकांना भाजी घरपोच होईल.  खरेदी आणि विक्रीमध्ये प्रति किलो दहा रुपयांचा फरक असेल. या दहा रुपयांतून वितरण व्यवस्था सक्षम केली जाईल. मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध भाजी व त्याचे दर याबाबतचे अपडेटस्‌ही इतर ग्राहकांना मिळतील. मागणीनुसार वितरण केले जाईल. 

असाही एक अहवाल
नॅशनल ॲक्रिटेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबरोटरीज- ‘एनएबीएल’ने तीन वर्षापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात शाकाहारी आहार रासायनिक खतांच्या वापरामुळे अपायकारक ठरत असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. ‘एनएबीएल’ने पुणे आणि परिसरातील भाजी विक्रेत्यांकडील भाजीचे नमुने तपासले. त्यात कारली, वांगी, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, काकडी आदी भाज्यांमध्ये कीटकनाशकांचे अंश सापडले. त्यामुळे पोटविकारापासून ते हार्मोन्स बदल आणि किडनी-लिव्हरच्या तक्रारींपासून कॅन्सरपर्यंतचे विकार उद्‌भवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com