राजकीय वर्चस्ववादातून दोन खून

राजकीय वर्चस्ववादातून दोन खून

कोल्हापूर - अशोक पाटील यांच्या खुनानंतर त्याचा सूड म्हणून धनाजी गाडगीळ यांचा खून करण्यात आला. त्यामुळे संवेदनशील पाचगाव धुमसत राहिले. राजकीय वर्चस्ववादातून झालेल्या या खुनामुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता.

अशोक मारुती पाटील १३ फेब्रुवारी २०१३ ला न्यू महाद्वार रोडवरील (लाड चौकाजवळ) ॲक्‍सिस बॅंकेत दुपारी दीडला आले. या वेळी त्यांच्या मोटारीत उत्तम भोसले, रफिक मुबारक बंडवल, अरुण पाटील, निशांत ऊर्फ नंदकुमार माने होते. अशोक पाटील बॅंकेत निघाले असताना दुचाकीवरून आलेल्या दिलीप जाधव आणि अमोल जाधव यांनी गावठी पिस्तूलमधून गोळ्या झाडल्या. अमोल जाधवने डोक्‍यात गोळी झाडली व तेथून ते पळून गेले.

घटनास्थळी भेट देऊन येथील पंचनामा जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी केला; तर शवविच्छेदनाच्या ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील यांनी तपास केला. यानंतर अशोक पाटील यांचा मृतदेह ‘सीपीआर’मध्ये आणण्यात आला. तेथे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रताप मोपण आले. ‘सीपीआर’मध्ये मिलिंद पाटील यांची फिर्याद घेतली. त्यानंतर फिर्यादींच्या मागणीनुसार हा खटला राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला.

‘सीआयडी’चे तत्कालीन अधीक्षक शिवाजी शेलार, उपअधीक्षक स्वाती गायकवाड यांनी तपास केला. तपास सुरू असताना तत्कालीन पोलिस उपअधीक्षक महेश सावंत, पोलिस निरीक्षक संजय कुरुंदकर यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना कोगनोळी पेट्रोलपंपाजवळ १६ फेब्रुवारी २०१३ ला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त केले. त्याच्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार याच पिस्तुलातून अशोक पाटीलवर गोळ्या झाडल्याचा अहवाल प्राप्त झाला. तसेच, डॉ. दत्तात्रय घोडके, जी. बी. दळवी आणि डॉ. विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले. त्यांनीही गोळ्या झाडून मृत्यू झाल्याचा अहवाल दिला.

यानंतर १३ मे २०१३ ला दोषारोपपत्र दाखल केले. मार्च २०१४ मध्ये आरोपनिश्‍चिती केली. ११ मार्च २०१६ ला प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली. तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्याकडे सुनावणी झाली. त्यांच्या बदलीनंतर हा खटला न्यायाधीश बिले यांच्याकडे वर्ग झाला. यापूर्वी विशेष सरकारी वकील म्हणून कांबळे यांनी काम पाहिले. त्यानंतर विशेष सरकारी वकील विवेक शुक्‍ल यांनी पुढील खटला चालविला. त्यांनी एकूण ४३ साक्षीदार तपासले. यात २३ साक्षीदार फितूर झाले. 

२३ डिसेंबर २०१३ ला पाचगाव परिसरातील प्रगती कॉलनीतील ओंकार गॅरेजजवळील चौकात स्वप्नील कांबळेचा वाढदिवस सुरू होता. तेथे धनाजी गाडगीळ (वय ३५) उपस्थित होता. ही माहिती मिलिंद पाटीलला मिळाली. तो साथीदारांसह चौकात गेला. तेथे त्यांच्या हातात कोयता, खंजीर, तलवारी होत्या. त्यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात जाऊन धनाजीचा खून केला.

धनाजीचा मृतदेह ‘सीपीआर’मध्ये आणण्यात आला. या वेळी मित्र अमरने फिर्याद दिली. हल्ल्यात तोही जखमी झाला होता. करवीर पोलिस ठाण्यात याचा गुन्हा नोंद झाला. फिर्यादीत त्याने संशयित आरोपींची नावे सांगितली. त्यानुसार  २४ ते २९ डिसेंबरदरम्यान त्यांना अटक झाली. घटनास्थळी मिळालेला जांबिया पोलिसांनी जप्त केला. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला. मार्च २०१५ मध्ये याबाबतचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यापुढे सुनावणी सुरू झाल्यावर विशेष सरकारी वकील म्हणून सांगलीचे श्रीकांत जाधव यांची नियुक्ती झाली. त्यांना ॲड. विश्‍वजित घोरपडे यांनी सहकार्य केले. सुनावणीत एकूण २३ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी चार साक्षीदार फितूर झाल्याचे ॲड. घोरपडे यांनी सांगितले.

गर्दी तणाव आणि बंदोबस्त
न्याय संकुल परिसरात अपर पोलिस अधीक्षक, दोन उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षक व १०० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.

एकच प्रवेशद्वार उघडे...
न्याय संकुलात ‘आत’ आणि ‘बाहेर’ असे दोन प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी ‘आत’ या एकाच दरवाजातून येणारी-जाणारी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. छोट्या दरवाजातून सर्वांनाच तपासून आत सोडले जात होते. सर्वसामान्यांसह पक्षकारांच्या वाहनांचे पार्किंग न्याय संकुलासमोरील शाळेच्या मैदानावर करण्यात आले होते. दोन्ही गटांच्या समर्थकांची संख्या मोठी असल्याने ही दक्षता घेतली.

आरोपी पोलिस गराड्यात
आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतरही त्यांच्याभोवती साध्या वेशातील पोलिसांचा गराडा होता. शिक्षा जाहीर झाल्यानंतरही न्यायालयातून बाहेर काढताना पोलिस तैनात होते. आरोपींना न्यायालयातून बाहेर काढताना त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली. मात्र, पोलिसांनी समर्थकांना हाकलून लावले.

साक्ष महत्त्वाची ठरली
सोमेश साठे हा १३ फेब्रुवारी २०१३ ला ॲक्‍सिस बॅंकेसमोर उभा होता. त्याच्यासमोरच अशोक पाटीलवर गोळ्या झाडण्यात आल्या. पंधरा दिवस तो भीतीने गप्प राहिला. नंतर त्याने पोलिसांना याची सविस्तर माहिती दिली. न्यायालयातही त्याने सविस्तर घटनेची माहिती दिली. त्याच्या साक्षीवर पुरावा तयार झाला. साठेची साक्ष महत्त्वाची ठरल्याची माहिती ॲड. शुक्‍ल यांनी दिली.

फितूर झाले नाहीत...
फिर्यादीतील निशांत ऊर्फ मुन्ना नंदकुमार माने आणि अविनाश जांभळे हे साक्षीदार होते. ते साक्षीवर शेवटपर्यंत कायम राहिले. त्यामुळेच अशोक पाटील यांच्या खून खटल्यात आरोपींना शिक्षेपर्यंत पोचविता आल्याचे ॲड. शुक्‍ल यांनी सांगितले.

महिलांचा आक्रोश
जन्मठेपेचा निकाल जाहीर केल्यानंतर न्यायालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या महिलांनी एकच आक्रोश केला. त्यांना सुरक्षेच्या कारणावरून न्यायालयात सोडले नव्हते.

त्यांना हजर करा...
खटल्यातील सुनावणीदरम्यान तिघांची जामिनावर सुटका झाली होती. ते न्यायालयात हजर नव्हते. त्यामुळे त्यांना हजर करा, त्याशिवाय निकाल कसा देणार, असे पोलिसांना सुनावण्यात आले. यानंतर जामिनावर सुटलेले रहिम सनदी, माजी नगरसेवक अमोल माने, सुनील घोरपडे हे हजर झाले. त्यानंतर न्यायालयाने त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्याचे सांगितले. तसेच, शिक्षा झालेल्यांची नावे सांगितली. त्यांना शिक्षेबाबत काही सांगायचे आहे काय असे विचारले. तेव्हा आरोपींपैकी एक पुटपुटला. न्यायाधीश यांनी ते सर्व झाले आहे, आणखी काही सांगायचे आहे काय? अशी विचारणा केली आणि शिक्षा सुनावली.

निर्दोष सुटका...
माजी नगरसेवक अमोल माने, सुनील घोरपडे, रहिम सनदी या तिघांसह अजित कोरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, त्यांना जामीन मिळाला. त्यांच्यावर खुनाचा कट रचताना सहभाग असल्याचा गुन्हा होता. मात्र, तो सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे तिघांची निर्दोष मुक्तता झाली; तर कोरे हा मृत असल्याने त्याचा उल्लेख झाला नाही.

निकालाची प्रतीक्षा...
सकाळी अकराला न्यायाधीश बिले डायसवर आले. त्यानंतर थोड्या वेळाने विशेष सरकारी वकील विवेक शुक्‍ल न्यायालयात आले. त्यांनी आल्यानंतर कोणती सुनावणी पहिली घेणार, असे न्यायाधीशांना विचारले. तेव्हा न्यायाधीशांनी खटल्याचा क्रमांक सांगितला आणि त्यानंतर संबंधित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.

तुम्हाला काय सांगायचे आहे?
साधारण साडेअकराच्या सुमारास आरोपींना न्यायालयात आणण्यात आले. तेथे त्यांना तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. शिक्षेबाबत काही सांगायचे आहे काय, असे विचारले. आरोपींनी `काही नाही,` असे सांगितल्यावर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. 

असे गुन्हे... अशी कलमे...
दिलीप जाधव ऊर्फ डी. जे.सह इतरांवर खून आणि संगनमत केल्याचा आरोप होता. याचबरोबर खुनाचा कट रचणे, आर्म ॲक्‍टनुसार कलम ३ (१), २५, ३७ (३)सह १३५ आणि बॉम्बे ॲक्‍ट अशा कलमांनुसार गुन्हे दाखल झाले होते.

संबंधीत बातम्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com