नेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये

लुमाकांत नलवडे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पाचगावच्या वर्चस्व वादाला लागलेल्या राजकीय किनारामुळे झालेले नुकसान अनेक पाचगावकरांसह कोल्हापूरने अनुभवले. ज्या नेत्यांच्या ईर्षेतून हे घडले, ते मात्र ए.सी.त आहेत. कार्यकर्त्यांचे आयुष्य मात्र आता अंधाऱ्या कोठडीत जाणार आहे. एकेकाळचे अशांत पाचगाव आता तरी कायमचे शांत होणार काय? हाच प्रश्‍न आहे.

कोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. पाचगावच्या वर्चस्व वादाला लागलेल्या राजकीय किनारामुळे झालेले नुकसान अनेक पाचगावकरांसह कोल्हापूरने अनुभवले. ज्या नेत्यांच्या ईर्षेतून हे घडले, ते मात्र ए.सी.त आहेत. कार्यकर्त्यांचे आयुष्य मात्र आता अंधाऱ्या कोठडीत जाणार आहे. एकेकाळचे अशांत पाचगाव आता तरी कायमचे शांत होणार काय? हाच प्रश्‍न आहे.

पिण्याच्या पाणीप्रश्‍नावरून राजकीय धुलवड करण्याचे काम नेत्यांनी केले. राजकारणात कोणी कशाची संधी घेईल, हे सांगता येत नाही. असाच प्रकार पाचगावात घडला. पिण्याचे पाणी तापले आणि नेत्यांनी राजकारणाची किनार दिली. जिल्ह्यातील दोन मोठे नेते ‘दक्षिण’च्या राजकारणातून येथे कधी घुसले आणि थंड पाणीही पेटले, हे कळलेच नाही. दोन नेत्यांनी आपापल्या पद्धतीने येथे ताकद लावली. त्यांची डोकी भडकली आणि पाण्याचे राजकरण थेट ‘सरपंच’ पदापर्यंत पोचले.

घटनाक्रम

 •  १३ फेब्रुवारी २०१३ ः गोळ्या झाडून अशोक पाटील यांचा खून
 •  १५ फेब्रुवारी २०१३ ः तपास ‘सीआयडी’कडे वर्ग
 •  १६ फेब्रुवारी २०१३ ः पाच जणांना अटक
 •  १३ मे २०१३ ः दोषारोपपत्र
 •  २०१४ ः आरोप निश्‍चिती
 •  ११ मार्च २०१६ ः प्रत्यक्षात सुनावणी सुरू
 •  १८ एप्रिल २०१८ ः सुनावणी समाप्त
 •  २३ एप्रिल २०१८ ः निकाल ः पाच आरोपींना आजन्म कारावास
 •  २३ डिसेंबर २०१३  ः धनाजी गाडगीळचा खून, गुन्हा दाखल
 •  २४ ते २९ डिसेंबर ः आरोपी अटक
 •  मार्च २०१५ ः दोषारोपपत्र
 •  २३ एप्रिल २०१८  ः निकाल ः सहा आरोपींना आजन्म कारावास

दिलीप जाधव ऊर्फ डी.जे. विरुद्ध अशोक पाटील यांचे गट येथे राजकरणात सक्रिय झाले. एकाच्या बाजूने मंत्री, तर एकाच्या बाजूने आमदार अशी त्यांची विभागणी झाली. किरकोळ कारणांवरूनही तेथे वातावरण तापू लागले आणि छोट्या-मोठ्या गोष्टीत राजकारण घुसू लागले. पाण्याची टाकी असो किंवा नागरी सुविधा असो, तेथे राजकारण झाले. त्यानंतर हीच ईर्षा पुढे कायम राहिली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट दिलीप जाधव विरुद्ध अशोक पाटील यांचे वैमनस्य आमने-सामने आले. पाटील यांच्या गटाचे निवडणुकीत वर्चस्व राहिले; मात्र सरपंचपद महिला मागासवर्गीय पदासाठी होते. यासाठी त्यांनी शोभा भालकरना रिंगणात उतरविले. त्यांचा विजय निश्‍चित मानला जात होता; मात्र जाधव यांच्या गटाकडून राधिका खडके यांनी मागासवर्गीय असल्याचा जातीचा दाखला ऐनवेळी मिळविला आणि त्या रिंगणात उतरल्या. एवढंच नव्हे, तर त्या विजयीसुद्धा झाल्या. 

न भूतो, अशा पद्धतीने पाचगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. दगडफेक झाली आणि बघता बघता राजकारणाने शांत पाचगाव अशांत झाले. 

पाचगावात सरळ सरळ दोन गट निर्माण झाले. यात जाधव आणि पाटील यांचे वर्चस्व होते. निवडणुकीच्या माध्यमातून येथे  धुसफुसू लागलेले राजकारण पुढे थेट खुनापर्यंत पोचले. अशोक पाटील हा कोल्हापुरात न्यू महाद्वार रोडवर लाड चौकाजवळील एका बॅंकेत १३ फेब्रुवारी २०१३ आला तेव्हा त्याच्यावर दोन फुटांवरून गोळीबार झाला. भरदिवसा दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आणि पेटलेल्या पाण्याचे राजकारण थेट खुनापर्यंत गेले. अशोक पाटीलचा खून गोळ्या घालून झाल्यावर अशांत पाचगावात वणवा पेटला. नेत्यांनी खुनाचेही राजकारण केले.

सीपीआरमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांना सहानुभूती देण्यासाठी आलेल्या तत्कालीन आमदारांनी मंत्र्यांवर गुन्हा दाखल व्हावा, असे वातावरण तयार केले आणि खुनाच्या गुन्ह्याची फिर्याद घेण्याचे काम अर्धवट सोडून तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न हाताळावा लागला. सीपीआर राजकीय अड्डा बनला. नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तेथेच घोषणाबाजी सुरू केली आणि बघता बघता अख्खा परिसर अशांत बनला. पोलिसांच्या फौजफाट्याने सीपीआरला पोलिस ठाण्याचे स्वरूप आले. दगडफेक सुरू झाली. सीपीआर परिसरातील चौकात वाहनांवर दगडफेक झाली. रास्ता रोको झाला आणि पाचगावचा प्रश्‍न राज्यभरात चर्चेला आला.

तत्कालीन मंत्री आणि आमदारांचे राजकारण राज्यभर चर्चेत आले. खुनाला नाव जोडले जाऊ नये, म्हणून आटापिटा सुरू झाला. कोणत्याही परिस्थितीत गुन्ह्याच्या मागे मंत्र्यांचाच हात असल्याचे सांगण्यात येऊ लागले. कार्यकर्ते मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका त्या वेळी घेतली. कागलचे नेते मध्यस्थीसाठी धावले होते. मंत्री आणि आमदाराचे गट आमने-सामने येऊ लागले. पोलिसांची तारांबळ उडाली. अखेर रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.

तरीही वातावरण तणावपूर्ण राहिले. अखेर हा तपास सीआयडी (राज्य गुन्हे शाखेकडे) दिला. त्यांनी याबाबतचा तपास केला. आरोपींना अटक केली; मात्र चार्जशीट (दोषारोप) मध्ये मंत्र्यांचे नाव आलेच नाही. झालेल्या तक्रारी, अर्जांवर स्वतंत्र सुनावणी झाली आणि मंत्र्यांचा यात काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. हा वाद जितका ताणवता येईल तितका ताणवला. सर्व घडले ते राजकीय उद्देशानेच होते, हे कार्यकर्ते, नेते आणि कोल्हापूरकरांनाही माहिती आहे. वातावरण शांत होते न होते तोच पाचगावात दुसरा खून झाला.

राजकीय वादातून झालेल्या या खुनाचा बदला बरोबर दहा महिन्यांनी २३ डिसेंबर २०१३ ला घेतला. धनाजी तानाजी गाडगीळ (वय ३५, रा. पाचगाव) याचा खून केला. या खुनात मृत अशोक पाटील याच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल झाला. स्वप्नील कांबळेचा वाढदिवस सुरू असतानाच अशोक पाटलांच्या गटातील तरुणांनी त्यांच्यावर खुनी हल्ला केला. यात धनाजी गाडगीळचा खून झाला. राजकीय वर्चस्वाची किनार येथे ‘खून का बदला खून’ इथपर्यंत पोचली.

वडिलांच्या खुनाचा बदला घेतला. राजकारणाने टोकाची ईर्षा गाठली. नेत्यांनी त्यांची पोळी भाजून घेतली. खुनाचा मुद्दा पुढे न्यायालयीन बनला. साक्षीदार फितूर झाले, काही कायम राहिले. तपास अधिकाऱ्यांचे, डॉक्‍टरांचे जबाब झाले. साक्षी झाल्या आणि अखेर आज त्याचा निकालही झाला. ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी डोकी फोडून घेतली, त्या अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ते आजन्म कारागृहात राहणार असल्याचे वकिलांनी सांगितले. त्यांचे संसार आज उघड्यावर आले.

आता तरी कार्यकर्ते धडा घेणार?
राजकारण सगळीकडेच असते; पण पाचगावच्या राजकारणात डोकी फुटली, ती  कार्यकर्त्यांची, घरे उद्‌ध्वस्त झाली ती कार्यकर्त्यांची, संसार उघड्यावर आले ते कार्यकर्त्यांचे; मात्र चौकाचौकात यात्रा, जत्रा, वाढदिवसांना डिजिटल फलकांवर झळकणारे नेते आज ‘एसी’त राहिले. त्यांना आजच्या निकालाचे काहीच सोयरसुतक नाही. त्याचे राजकारण सुरूच राहणार आहे. बळी गेला तो फक्त कट्टर समर्थकांचा. या निकालाने कार्यकर्ते धडा घेणार काय?

दोन्ही खुनांचा निकाल एकाच दिवशी
दोन्ही खुनांतील कालावधी साधारण १० महिन्यांचा होता. दोन्ही खुनांना राजकारणाची झालर होती. दोन्ही खुनांतील आरोपी पूर्ववैमनस्यातील होते. त्यामुळे पाचगाव अशांत होते. एकाचा निकाल जाहीर झाल्यावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्‍यता होती; मात्र आज दोन्ही निकाल एकाच दिवशी लागले. एका गटाच्या पाच जणांना, तर दुसऱ्या गटाच्या सहा जणांना जन्मठेप झाली. त्यामुळे पाचगाव हादरून गेले.

‘शेंडी’ आणि ‘चप्पल’...
जोपर्यंत खुनाचा बदला घेत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ पाचगावातील एका कट्टर समर्थकाने घेतली होती. एकाने तर शेंडी राखली होती. जोपर्यंत निकाल लागत नाही, आरोपी सुटत नाहीत तोपर्यंत शेंडी काढणार नाही, अशीही एकाने शपथ घेतली होती.

Web Title: Kolhapur News Pachagon Murder case special