संजय साडविलकरविरोधात समीर दाखल करणार तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदार संजय साडविलकर याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सध्या जामिनावर असलेला या प्रकरणातील संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. शंभर फुटी रोड, सांगली) याला आज (ता. २१) कोल्हापुरात येण्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिल्ले यांनी परवानगी दिली.

कोल्हापूर -  ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदार संजय साडविलकर याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सध्या जामिनावर असलेला या प्रकरणातील संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. शंभर फुटी रोड, सांगली) याला आज (ता. २१) कोल्हापुरात येण्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिल्ले यांनी परवानगी दिली. आज (ता. २१) सकाळी ११ ते ५ या वेळेत समीर हा साडविलकर याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहे.

समीरचे वकील ॲड. समीर पटवर्धन यांनी ही माहिती दिली. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने समीरला सांगलीतून अटक केली होती. त्यानंतर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक डॉ. विरेंद तावडे यालाही अटक केली. सप्टेंबर २०१६ मध्ये डॉ. तावडेला पानसरे हत्या प्रकरणात अटक केली होती. या दोन्हीही हत्या प्रकरणात एसआयटीने कोल्हापुरातील संजय अरुण साडविलकर याचा साक्षीदार म्हणून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर जबाब नोंदवला होता.

सीबीआयने डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी जानेवारी २०१६ मध्ये, तर पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीने १४ जुलै २०१६ मध्ये श्री. साडविलकर याचा जबाब नोंदवला. डिसेंबर २०१६ मध्ये एसआयटीने तावडेविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या दोषारोपपत्राची प्रत समीर गायकवाडला मिळाली होती. 
समीरला १७ जूनला सशर्त जामीन न्यायालयाने मंजूर करत त्याला नऊ अटी घातल्या होत्या. त्यात न्यायालयीन कामकाज व एसआयटीसमोरील दर रविवारची हजेरी सोडून त्याला कोल्हापूर जिल्ह्यात बंदी घातली होती. 

श्री. साडविलकरविरोधात तक्रार देण्यासाठी कोल्हापुरात येण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज समीरतर्फे ॲड. पटवर्धन यांनी आज न्यायालयात दाखल केला. या अर्जासोबत श्री. साडविलकर याने एसआयटीला दिलेल्या जबाबाची प्रत जोडली होती. मंगळवार, बुधवार किंवा गुरुवारी समीरला कोल्हापुरात येण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. न्यायमूर्ती बिल्ले यांनी उद्याच (ता. २१) समीरला परवानगी दिली. 

साडविलकर अवैध शस्त्रांचा विक्रेता
श्री. साडविलकर याने या दोन्हीही हत्या प्रकरणात साक्षीदार म्हणून जबाब देताना उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने १९८५ ते १९८८ या काळात गावठी पिस्तूल व रिव्हाल्व्हर विक्री व दुरुस्तीचे काम करत असल्याचे म्हटले आहे. समीरला डॉ. तावडे यांच्याविरोधात दाखल झालेल्या दोषारोप पत्रातून ही माहिती मिळाली. साडविलकरने अशाप्रकारे शस्त्रे कोणाला विकली, त्यातून कोणी कोणी गुन्हे केले? याचा तपास होण्याची गरज असल्यानेच समीरला साडविलकरविरोधात तक्रार द्यायची आहे, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Pansare, Dabhaolkar murder case