पेट्रोल पंपावर राजरोस मापात पाप

पेट्रोल पंपावर राजरोस मापात पाप

कोल्हापूर - पेट्रोल-डिझेलमध्ये मापात पाप होणार आणि गाडीला ॲव्हरेज कमी पडते म्हणून ग्राहक कंपन्यांच्या नावे ओरडणार, ही वस्तुस्थिती आहे. आधुनिकता आली 

आणि मापात पाप करण्याची टेक्‍नॉलॉजीही बदलली. नगरसेवक सत्यजित कदम यांच्या कोल्हापूर-हुपरी रोडवरील साई एजन्सीजच्या पेट्रोल पंपावर काल ठाण्यातील पोलिसांनी छापा टाकला. तेथे साधारण ५ लिटरला १४० ते १६० मि.ली. कमी तेल मिळत असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. यानंतर त्यांनी पंप सील केला. या छाप्यामुळे जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलच्या मापात पापाची चर्चा पुन्हा सुरू झाली 
आहे. मापात पाप म्हणजे काय होते? या विषयी थोडक्‍यात...

डिजिटल पल्सर कार्डद्वारे मापात पाप...
पेट्रोल-डिझेलचे पंप आधुनिक पद्धतीने चालतात. त्यामुळे पंपाच्या मशीनमध्येच इलेक्‍ट्रिक सर्किटने तयार केलेले पल्सर कार्ड बसविले जाते. ते ठराविक लिटरमागे कमी तेल सोडते. प्रत्यक्षात मीटर पूर्ण रकमेचे फिरते. यातून ग्राहकांची लूट केली जाते. ही लूट साधारण लिटरला तीन टक्‍क्‍यांनी केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे दुचाकीच्या ॲव्हेरजमध्ये काही किलोमीटरचा फरक पडू शकतो. डिजिटल पल्सर कार्ड हे मशीनमध्ये असल्यामुळे ते सहजासहजी कोणालाही  ओळखून येत नाही.

डिजिटल तरीही नॉबवर हात...
सध्या पेट्रोल-डिझेल पंप डिजिटल आहेत. मीटरवर अपेक्षित रुपयांची रक्कम दिसली तर पुन्हा गनचा नॉब हातात धरण्याची गरज नसते. मात्र पंपावरील कर्मचारी वारंवार अधूनमधून नॉब दाबत असतो. त्यामुळे तेल मिळत नाही, मात्र रुपयांचा आकडा फिरत राहतो. त्यामुळे  प्रत्यक्षात ग्राहकाला कमी तेल मिळते. लूट करण्याची हीसुद्धा एक पद्धत कर्मचाऱ्यांकडून अवलंबली जाते. याबाबतची एक क्‍लिपही सोशल मीडियावर सध्या फिरत आहे.

पेट्रोलला २.६० तर डिझेलला १.६० रुपये कमिशन
जिल्ह्यात एकूण २५६ पेट्रोल-डिझेल पंप आहेत. हे सर्व बीपीसी, एचपीसी आणि आयओसी कंपनीचे आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यात रिलायन्स आणि एस्सार या दोन कंपन्यांचेही सुमारे पंधरा-वीस पंप आहेत. पंपचालकांना पेट्रोलला लिटरला २.६० रु. तर डिझेलला १.६० रुपये कमिशन मिळते, असे पेट्रोल डिझेल असोसिशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी सांगितले.  

कारवाईचा उलटा प्रवास
पेट्रोल-डिझेल पंपांमध्ये ‘पल्सर कार्ड’ बसविल्यानंतर पाच लिटरला तुम्हाला जितके पाहिजे तितके तेल कमी करण्याचा फंडा एका इंजिनिअरने शोधून काढला. त्यानुसार त्याने राज्यातील काही पंपांवर पल्सर कार्ड बसविलेली आहेत. ठाण्यातून ही पद्धत उघडकीस आणण्यात आली. त्यानंतर राज्यात ज्या ज्या ठिकाणी संबंधितांनी असे पल्सर कार्ड बसविले आहे त्याची माहिती ठाणे पोलिसांनी मिळविली आहे. त्यानुसारच ते कोल्हापूर जिल्ह्यात कारवाई करीत असल्याचे समजते. याबाबत ठाण्याचे पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही.

पूर्वी गिअर बदलून फसवणूक...
पेट्रोल-डिझेलमध्ये काही प्रमाणात तूट अपेक्षित असते. मात्र याचाच फायदा घेऊन जादा तूट दाखवून ग्राहकांची लूट केली जाते. पूर्वी उद्यमनगरात गिअर बनवून मिळत. हा गिअर पंपाच्या मशीनमध्ये बसविला की, आपोआपच पाच लिटरमागे अर्धा लिटर पेट्रोल-डिझेल ग्राहकाला कमी मिळत होते. त्यामुळे पेट्रोल कमी आले की, गिअर बसवलाय का, असे सहज म्हटले जात होते. आता पेट्रोल-डिझेल पंपावर अधुनिकता आली. त्यामुळे मापात पाप करण्याची पद्धतही बदलली आहे.

रॉकेल भेसळ रोखली...
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत अनेक वेळा पेट्रोल-डिझेलमध्ये रॉकेल भेसळीची प्रकरणे फार गाजली आहेत. त्यामुळे काही पंपांवर ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागते. कोणत्या पंपावर भेसळ होते हे सर्वज्ञात झाल्यामुळे तेथे ग्राहक जात नाही. मात्र अलीकडे शासनाने रॉकेल (केरोसिन) विक्रीच बंद केल्यामुळे या पद्धतीच्या भेसळीला लगाम बसल्याचे सांगण्यात येते.

काय आहे वस्तुस्थिती...
साधारण एक लिटर पेट्रोलमागे ०.७ ते ०.८ आणि डिझेलला ०.२ टक्के तूट ग्राह्य मानली जाते. पेट्रोल-डिझेलचे बाष्पीभवन होऊन ही तूट झाली, असे मानले जाते. ग्राहकांसाठी पाच लिटरमागे २५ मिली तूट मान्य असते. म्हणजे साधारण एक लिटरला पाच मिली तूट समजली जाते. प्रत्यक्षात पंपचालकांकडून ही तूट १४० ते १६० मिलीपर्यंत वाढविली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. यातूनच पंपचालक ग्राहकांची फसवणूक करत आहेत.

लूट रोखण्यासाठी...
भेसळ किंवा मापात पाप होत असल्याचा संशयही ग्राहकाला आला तर त्यांनी संबंधितांची तक्रार करणे आवश्‍यक आहे. अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा हत्तीमहाल रोडवरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. किंबहुना पंपावरच तक्रार करण्यासाठीचे फोन नंबर आणि अधिक माहिती दिली असता तेथेही संपर्क साधता येऊ शकतो. ग्राहकांनी जागृती दाखविल्यास यांचे पितळ उघडे होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com