होय... चांगल्या कामाची सुरवात आमच्या घरापासूनच 

होय... चांगल्या कामाची सुरवात आमच्या घरापासूनच 

कोल्हापूर - शहर स्वच्छ राहिले पाहिजे, कचरा उठाव वेळेत झाला पाहिजे, हे म्हणायला ठीक आहे; पण शहर स्वच्छ ठेवायचं झालं, तर त्याची सुरवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे, या जाणिवेने येथील पेट्युनिया टॉवर्स (अपार्टमेंट) मधील 66 कुटुंबांनी आपल्या घरातल्या कचऱ्याचा एक कपटाही बाहेर जाणार नाही असे नियोजन केले आहे. अपार्टमेंटमधील ओल्या कचऱ्याच्या साहाय्याने स्वयंपाकासाठी गॅसनिर्मिती करून, दोन कुटुंबांना तो गॅस पुरवला जाणार आहे. एवढेच काय सर्व कुटुंबांत महिन्याला जमा होणारी रद्दी व प्लास्टिकच्या वापरलेल्या वस्तू एकत्रित करून त्या पुनर्निर्माणासाठी दिल्या जात आहेत. रद्दीचे पैसे वैयक्तिक स्वरूपात न घेता, ते अपार्टमेंटच्या मेंटेनन्ससाठी वापरले जाणार आहेत. "चांगल्या कामाची सुरवात आपल्या घरापासून' हे ब्रीदवाक्‍य त्यासाठी त्यांनी निश्‍चित केले आहे. 

या अपार्टमेंटमध्ये मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय रहिवासी आहेत. साधारण असा अनुभव आहे, की काही अपार्टमेंटमध्ये सुशिक्षित रहिवासी असले, तरी बऱ्याच बाबतींत त्यांच्यात एकमत होत नाही. संपूर्ण अपार्टमेंट या विचारापेक्षा माझे, तुझे या मुद्‌द्‌यावरच चर्चा होत असल्याने अपार्टमेंटचा मेंटेनन्सही वेळेत होत नाही. काही ठिकाणी वादातून वीज, पाणी बिलेही वेळेत भरली जात नाहीत. या सर्व वातावरणाचा कळत-नकळत सर्वच रहिवाशांना त्रास होत राहतो. "कशाला आलो असल्या अपार्टमेंटमध्ये राहायाला,' असाही सूर ऐकू येऊ लागतो. 

या पार्श्‍वभूमीवर पेट्युनिया अपार्टमेंटमध्ये मात्र बऱ्यापैकी सर्वांचे विचार जुळले व प्राधान्याचा मुद्दा म्हणून सर्वांनी कचरा निर्मूलन या विषयावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी गेल्या महिन्यात सर्वांना कचरा साठवण्यासाठी बकेट देण्यात आल्या. गॅस तयार करण्यासाठी खड्डा व इतर उपकरणे जोडण्यात आली. गॅस तयारीची पूर्वतयारी म्हणून खड्ड्यात शेणकाला घातला गेला. गॅस तयार होण्यासाठी या शेणात काही जैविक प्रक्रिया होणे आवश्‍यक असते. ती प्रक्रिया या दोन दिवसांत पूर्ण झाली, तर 15 ऑगस्टपासून दोन कुटुंबांना हा गॅस दिला जाणार आहे. 

या अपार्टमेंटमधील प्लास्टिकचा कचरा घंटागाडीवाल्याला देऊन प्लास्टिक कचऱ्याच्या डोंगरात आपली भर घालायची नाही, असाही निर्णय येथील रहिवाशांनी घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक प्लॅटमधील प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, टुथपेस्ट, सौंदर्य प्रसाधनाच्या ट्यूब, तेलाचे कॅन, खेळणी, इतर निकामी झालेले प्लास्टिकचे साहित्य अपार्टमेंटमधील एका खोलीत एकत्र करून प्लास्टिकचा पुनर्वापर करणाऱ्या एका व्यक्तीला ते विकत दिले जाते. हीच खबरदारी रद्दीच्या बाबतीत घेतली जाते. 

त्यामुळे या क्षणी या अपार्टमेंटमधल्या कचऱ्याचा एक कपटाही बाहेर जात नाही किंवा शहरातल्या वाढत्या कचऱ्याच्या ढिगात येथील रहिवासी कपट्याचीही भर घालत नाहीत. 

सॅनिटरी नॅपकिन हा कचऱ्याचा प्रकार तर शहराला डोकेदुखी झाला आहे. शहरातील तुंबलेले ड्रेनेज साफ करताना त्यात सॅनिटरी नॅपकिनचे पुंजकेच मिळत असल्याने स्वच्छता कर्मचारी वैतागले आहेत. बहुतेक ठिकाणी ही परिस्थिती आहे; पण या अपार्टमेंटमधल्या रहिवाशांनी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणारे उपकरण बसवले आहे. 

घरफाळ्यात मिळणार सूट 
सोलर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचऱ्यापासून गॅस, सॅनिटरी नॅपकिनची योग्य विल्हेवाट याचा फायदा घरफाळ्यात सूट मिळण्यासाठी होणार आहे. साधारण वर्षाला प्रत्येक फ्लॅटधारकाला 350 रुपये घरफाळा सूट मिळू शकेल. याशिवाय रद्दी, प्लास्टिक याचे पैसे सर्वांत मिळून मिळतील. दोन फ्लॅटमध्ये कचऱ्यापासून निर्माण केलेला गॅस वापरल्यास त्याचे शुल्कही मिळेल. या सर्वांचा उपयोग अपार्टमेंटच्या मेंटेनन्ससाठी होईल. याहीपेक्षा आपल्या अपार्टमेंटमधल्या कचऱ्याचा एक कपटाही बाहेर जात नाही याचे मोठे समाधान इथल्या रहिवाशांना आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com