कोल्हापूरच्या तीर्थक्षेत्र आराखड्यावर शिक्कामोर्तब

कोल्हापूरच्या तीर्थक्षेत्र आराखड्यावर शिक्कामोर्तब

कोल्हापूर - गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ८० कोटींच्या श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या झालेल्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये भक्त निवास, वाहनतळ आणि दर्शन मंडप या कामाचा प्रामुख्याने समावेश आहे. विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीनही वाहनतळावर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या वेळी केली.

अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी २००८ पासून प्रयत्न सुरू आहेत. मंदिर परिसर विकासासाठी सुरुवातीला २५५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा शासनाला मंजुरीसाठी पाठविण्यात आला; मात्र एवढा निधी शासनाकडून मिळणे शक्‍य नसल्याने या आराखड्याचे टप्पे पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात अत्यावश्‍यक गोष्टींचा समावेश करून आराखडा सादर करण्यास सांगितले. त्यानुसार ११० कोटीचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र या आराखड्याला मान्यता देण्यास शासनाने असमर्थता दर्शविली. त्यामुळे आणखी कमी रकमेचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा नव्याने आराखडा तयार करण्यात आला.

नवीन आराखडा ७२ कोटींचा तयार करण्यात आला. त्यावर नागरिकांच्या सूचनाही मागविण्यात आल्या. त्यानंतर या आराखड्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. तो मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने त्याला तांत्रिक मंजुरी दिली. तांत्रिक मंजुरी देतानाही काही किरकोळ बदल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आराखड्यात बदल करण्यात आला. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे पाठविण्यात आला. यापूर्वी दोन वेळा या समितीच्या बैठका आयोजित केल्या होत्या; मात्र काही कारणास्तव या बैठका होऊ शकल्या नाहीत.
आज मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथिगृहात शिखर समितीची बैठक झाली.

बैठकीस महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, आमदार आमदार सतेज पाटील, महापौर स्वाती यवलुजे, मुख्य सचिव सुमित मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान आशीषकुमार सिंह, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसेविका शोभा कवाळे आदी उपस्थित होते. या बैठकीत आराखड्यास मान्यता देण्यात आली.

या वेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘बिंदू चौक वाहनतळ ते मंदिर परिसर या पादचारी मार्गावर इलेक्‍ट्रिकल वाहने वापरण्यात यावीत. तसेच भक्त निवासमध्ये सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठी सोय करावी. मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्तीसाठी विशेष यंत्रणा उभारण्यात यावी. जेणेकरून हा परिसर स्वच्छ राहील. तसेच मंदिरात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे तेथेच विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यात यावी.’’

‘‘विकास आराखड्यातील कामांवर संनियंत्रणासाठी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी. या समितीने आराखड्यानुसार काम करून घ्यावे. यासंदर्भात काही तक्रारी असल्यास समितीचे अध्यक्ष पालकमंत्री श्री. पाटील यांच्याशी चर्चा करावी,’’ असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. या वेळी महानगपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. हा परिसर विकास आराखडा ८० कोटींचा असल्याचे सांगितले.

असा आहे आराखडा
दर्शन मंडप : (क्षमता साडेबाराशे भाविक) : ८.७३ कोटी - यामध्ये शौचालय, पिण्याचे पाणी, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था
भक्‍त निवास : २१.४८ कोटी -  व्हिनस कॉर्नरजवळ ८५०० चौ.मी. क्षेत्रावर - यात १३८ खोल्या, १० सूट, १८ हॉल (डॉरमेटरी) 
बहुमजली पार्किंग : २४० क्षमतेचे बहुमजली वाहनतळ ११.०३ कोटी - यात डायनिंग हॉल, समुदाय, दुकाने आदींचाही समावेश.
बहुमजली पार्किंग : बिंदू चौक ४.८९ कोटी. ४८४१ चौ.मी. बहुमजली वाहनतळ - १७० चारचाकी व ३१५ दुचाकीची व्यवस्था.
बहुमजली पार्किंग : सरस्वती थिएटर ७.०१ कोटी. २२०० चौ. मी. क्षेत्रात बहुमजली वाहनतळ - १४० चारचाकी व १४५ दुचाकीची क्षमता. पादचारी मार्ग : मंदिराभोवताली पादचारी मार्ग व बिंदू चौक ते भवानी मंडपापर्यंत पादचारी मार्ग २.६५कोटी.
दिशादर्शक फलक : शहरात दिशादर्शक फलक लावण्यासाठी ०.०६ कोटी.
सार्वजनिक सुविधा : शौचालय, पिण्याचे पाणी आदी सार्वजनिक सुविधा १.७८ कोटी.
मंदिरच्या आसपास क्षेत्राचे सौंदर्यीकरण : ०.९४ कोटी.
आपत्ती व्यवस्थापन सुविधा : १.६०कोटी 
सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी : १.३१कोटी.
सेवा वाहिनी स्थलांतर २.९१कोटी.
आरोग्य सुविधा : ५२ लाख

पर्यटनाची नवी संधी खुली - पालकमंत्री
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे जिल्ह्याला विकासाची नवी दिशा मिळणार आहे. एकूण २२५ कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. पहिल्या टप्प्यात ८० कोटींची कामे केली जाणार आहेत. आराखड्यात ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणे, पर्यटकांना विविध प्रकारच्या सुविधा देणे, आपत्ती व्यवस्थापन, पार्किंग, युटिलिटी शिफ्टिंग, आरोग्यविषयक सुविधा, सार्वजनिक व्यवस्था यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात भक्तनिवास, पार्किंग आणि दर्शन मंडपची सोय केली जाणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा ११६ कोटींचा आहे तर तिसरा टप्पा ६७ कोटींचा असणार आहे. मंदिरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून त्यांना सुविधा देणे गरजेचे आहे. जिल्ह्याचाही विकास साधला जाणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा सतत पाठपुरावा सुरू केला. आराखड्याच्या प्रत्येक बैठकीत सुचनांचा पाठपुरावा करत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मंजुरी दिली.’’​

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

  • पर्यटकांची संख्या लक्षात घेता प्लास्टिकवर प्रक्रिया करणार प्रकल्प उभारावा.

  • अपंग व ज्येष्ठ व्यक्‍तींना मंदिरापर्यंत जाण्याची सुविधा करावी.

  • सर्व ठिकाणची पार्किंग स्मार्ट करावीत.

  • भक्‍त निवासस्थानी सौर ऊर्जेचा वापर करावा.

श्री महालक्षमी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचा जिल्हास्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल. त्यानंतर मंजूर झालेल्या ८० कोटीपैकी निधी उपलब्ध होईल. त्यानुसार तातडीने कामे सुरू करण्यात येतील. 
- डॉ. अभिजित चौधरी,
आयुक्‍त

शासनाकडे २००८ पासून प्रलंबित असलेल्या श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकात पाटील यांचे अभिनंदन. या आराखड्यात तीन ठिकाणी पार्किंग असल्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. दुसऱ्या टप्प्यातील आराखड्यासही लवकरच शासन मंजुरी देईल. मंदिरातील दुकानदारांची व्यवस्था दर्शन मंडपात करण्याचा विचार आहे. 
- महेश जाधव,
अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी बरेच वर्षे संघर्ष केल्यानंतर अंशतः काही तरी निधी मंजूर झाला आहे. सुरुवातीला हा आराखडा दोन हजार कोटींचा होता. त्यातील ८० कोटी मंजूर झाले आहेत. किमान सुरुवातीच्या टप्यातील कामाला तरी यामुळे सुरुवात होईल. कोल्हापुरात पर्यटकांची वाढती संख्या पाहता आराखडा पूर्वीच मंजूर होणे अपेक्षित आहे. ‘देर से आए दुरुस्त होके आए’, असे म्हणायला हरकत नाही. लवकरात लवकर निधी हाती पडून कामाला सुरुवात होणे गरजेचे आहे.
- राजेश क्षीरसागर,
आमदार

तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मंजूर होणे आणि प्रत्यक्ष काम यात फार मोठा फरक असतो. त्यामुळे शासनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर होणे ही काळाजी गरज होती. त्यातून पर्यटनाला चालना मिळेल. आराखड्याची तातडीने अंमलबजावणी झाल्यास त्याचा आनंद अधिक होईल.
- सतेज पाटील,
आमदार

विधानसभा निवडणुकीत टोल आणि महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासाचा आराखड्याचा मुद्दा होता. त्यानुसार टोल यापूर्वीच हद्दपार केला आहे. आता श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडाही मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यातील आराखडा मंजूर करण्यात यश आले आहे. विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात झालेल्या जाहीर सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करण्याचे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्तताही या निमित्ताने झाली आहे. विकास आराखडा मंजूर झाल्याने पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळणार आहे. हा आराखडा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन
- अमल महाडिक,
आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com