पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी - सतेज पाटील

पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी - सतेज पाटील

कोल्हापूर - जिल्ह्यातील पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टतर्फे केली जाईल, अशी घोषणा माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी आज येथे केली. ‘सकाळ’ आणि डी. वाय. पाटील ट्रस्ट आयोजित तंदरुस्त बंदोबस्त या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. अलंकार हॉलमध्ये आज हा कार्यक्रम झाला. तालीम-मंडळांचा ‘पान सुपारी’  हा समाजभिमुख पारंपरिक कार्यक्रम झाला.

‘सकाळ’चे माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, डी. वाय. पाटील ट्रस्टचे ट्रस्टी ऋतुराज पाटील, गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने प्रमुख उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टचे अध्यक्ष संजय पाटील यांच्याकडून आणलेले वैद्यकीय तपासणीसाठीचे पत्र सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्री. पवार यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक श्री. मोहिते यांच्याकडे देण्यात आले.  

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘मी मंत्री असताना मुंबईत ३१ डिसेंबरच्या रात्री सर्व पोलिसांना दूध आणि बिस्किटे देण्याचा उपक्रम केला. तीन वर्षे तो चालविला. २४ बाय ७ तास पोलिस तणावाखाली असतात. त्यांना नेमके काय अपेक्षित आहे, हे ‘सकाळ’ने डॉक्‍टरांच्या सल्ल्याने शोधून काढले आणि चिक्कीचे संशोधन त्यांनी शोधून काढले. हाताळण्यास सोपे आणि लोह देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा स्तुत्य उपक्रम साकारला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे. आभार मानायला पाहिजे. कोल्हापूरला समाजिक किनार आहे. येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना पाणी, नाश्‍ता, जेवणही दिले जाते. माणूस माणसाच्या मदतीला धाऊन येत आहे.

यावरून माणूसकी आजही शिल्लक  आहे, तीच उपयोगी पडणार असल्याचे येथे दिसून येते. ‘सकाळ’ने आज पोलिसांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. चांगला उपक्रमात सातत्य राहावे, यासाठी या उपक्रमाला कायमस्वरूपी सहकार्य करण्याची भूमिका डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टने घेतली आहे. यापूर्वीही मी ते जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी ४५ वर्षांपुढील सर्व पोलिसांची आरोग्य तपासणी करून घेण्याचे आदेश दिले आहे. त्याचा सर्व खर्च गृहविभाग करणार आहे. या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. अभिनंदन करतो; मात्र जिल्ह्यातील तीन हजार दोनशे पोलिसांपैकी केवळ ९३२ पोलिस कर्मचारी ४५वर्षांच्या पुढील आहेत; मात्र त्याखालील पोलिसांचे काय? असा प्रश्‍न माझ्यासमोर आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिसांची आरोग्य तपासणी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत करून दिली जाईल. 

मुख्य संपादक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘मुंबई पोलिसांच्या प्रकृतीसाठी ‘सकाळ’ने एक सर्वेक्षण केले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिसांचे डबे तपासले तेव्हा वडापाव हेच त्यांचे मुख्य खाणे असल्याचे दिसून आले. त्यांचे खाणे वडापाव असेल, तर त्यांचे आरोग्य काय असेल, याची  जाणीव ‘सकाळ’ने करून दिली. तेव्हापासून राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांसाठी बंदोबस्तात चिक्की देण्याचा उपक्रम ‘सकाळ’ने हाती घेतला. पुण्यातील दगडूशेट हलवाई, मुंबईतील लालबागचा गणपती अशा अनेक ठिकाणी मंडळांनी पोलिसांना चिक्की देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

कोल्हापुरात या उपक्रमाला डी. वाय. पाटील ट्रस्टने सहकार्य केले आणि आज चौथ्यावर्षी आपण पोलिसांना चिक्की वाटपाचा उपक्रम साकारतोय. चिक्की वाटपामुळे पोलिसांच्या आहाराचा कायमचा प्रश्‍न निकाली निघणार नाही, याची जाणीव आम्हालाही आहे; मात्र पोलिसांच्या आरोग्याकडे आम्ही सर्वांचे लक्ष वेधले. त्यातूनच हा चिक्की वाटपाचा उपक्रम राज्यभर झाला.

याचबरोबर तालीम मंडळांचा पानसुपारी हा पारंपरिक उपक्रम आम्ही सामाजिक भावनेतून सुरू ठेवला आहे. सामाजिक सलोखा राहण्यासाठी तो आजही महत्त्वाचा आहे, असे वाटते.’’

अधीक्षक संजय मोहिते म्हणाले,‘‘आमदार सतेज पाटील  २०१० मध्ये मंत्री असताना नागपूरच्या अधिवेशनात २१ दिवस त्यांच्यासोबत होतो. त्यांनी तेव्हापासून आजपर्यंत एकदाही अपमानास्पद वागणूक दिली नाही. पोलिसांविषयी नेहमीच आपुलकी असणारे ते एक आहेत. पोलिसांनाही मी सांगू इच्छितो की आजी-आजोबा जे खात होते ते भाकरी, ठेचा खा... झिप्पाबर्गर, वडा पाव खात नव्हते.  अनेक फ्लॅट सध्या शिल्लक आहेत, ते पोलिसांना स्वस्तात देण्यासाठी मी बिल्डरांना विनंती करणार आहे.

पोलिसांसाठी ‘सकाळ’ने चिक्की वाटपाचा उपक्रम केला आहे, तो स्तुत्य आहे. ‘सकाळ’ नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी पुढाकार घेत आहे. त्यांचै कौतुक आहे.’’

‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर उपस्थित होते. कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांनी आभार मानले, जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
 
आवाजाबाबत सुवर्णमध्य काढावा - पाटील 
सध्या कोल्हापुरात आवाजाचा मुद्दा गाजत आहे, मात्र पोलिसांनी ही समन्वयाची भूमिका घ्यावी, वर्षातून दोन-तीन दिवस सण असतो. तेथे आवाजाची मर्यादा पाळून स्पीकर वाजविण्यास पोलिसांची काहीच हरकत राहू नये, असे वाटते. पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सुवर्णमध्य काढावा, अशी पोलिस प्रशासनाला माझी विनंती आहे, असेही आमदार सतेज पाटील यांनी पोलिस अधीक्षक मोहिते यांच्याकडे पाहून भाषणात जाहीर केले.
 
‘सकाळ’ ने आदर्श घातला 
केवळ बातम्या देऊन न थांबता त्यापुढे पाठपुरवा करणारे दैनिक म्हणून ‘सकाळ’ची वाहवाह करावी वाटते. काही महिन्यांपूर्वी शहरातील वारसास्थळांची स्वच्छता मोहीम, राधानगरीतील स्वच्छता मोहीम, पंचगंगा नदी स्वच्छता असे उपक्रम राबविणाऱ्या ‘सकाळ’ ने आज पानसुपारीचा उपक्रम घेऊन समाजाला आदर्श घालून दिल्याचेही आमदार पाटील यांनी जाहीर केले. या वेळीही सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

पानसुपारी कार्यक्रमात ‘सकाळ’चे आभार 
सामाजिक सलोख्यासाठी पारंपरिक पानसुपारीचा कार्यक्रमही येथे झाला. वरिष्ठ बातमीदार सुधाकर काशीद यांनी पानसुपारीचे महत्त्व सांगितले. आजही जुना राजावाडा पोलिस ठाण्यात खजिनाचा गणपती म्हणून त्याची प्रतिष्ठापना केली जाते. एकमेकांच्या तालमीत पानसुपारी देऊन सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे काम या उपक्रमांतून होत आहे. हाच  उपक्रम ‘सकाळ’ने सुरू ठेवल्याचे सांगितले. शहरातील प्रिन्स क्‍लबच्या महिला कार्यकारिणीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पानसुपारी  देऊन कार्यक्रमाला सुरवात झाली. येथे खंडोबा तालीम मंडळ, फिरंगाई तालीम मंडळ, सरदार तालीम मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, महालक्ष्मी भक्त मंडळ, एस. पी. बॉईज मित्र मंडळ, राजारामपुरी युवक मित्र मंडळ, शाहूपुरी युवक मंडळ, अवचित पीर तरुण मंडळ, मराठा महासंघ यांच्या कार्यकारिणीला पानसुपारी देण्यात आली. पानसुपारीचा उपक्रम वैयक्तिक सुरू ठेवण्यात योगदान असलेले लाला गायकवाड, बाबा महाडिक यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी अनेकांनी मनोगतात ‘सकाळ’ने ही परंपरा कायम ठेवल्याबद्दल आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com