वयोवृद्ध तक्रारदाराचा पोलिस ठाण्यात मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - बॅगेतील रक्कम चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आलेल्या वयोवृद्धाला आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बंडू बाळकू पाटील (वय 70, रा. धुंदवडे, ता. गगनबावडा) असे त्यांचे नाव आहे. ही घटना समजल्यानंतर नातेवाइकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. 

कोल्हापूर - बॅगेतील रक्कम चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आलेल्या वयोवृद्धाला आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बंडू बाळकू पाटील (वय 70, रा. धुंदवडे, ता. गगनबावडा) असे त्यांचे नाव आहे. ही घटना समजल्यानंतर नातेवाइकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. 

पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः धुंदवडे येथे बंडू पाटील कुटुंबासोबत राहतात. पाटील आज सकाळी दहाच्या सुमारास घरातून बॅग घेऊन बाहेर पडले. बॅगेत 67 हजार रुपये होते. ते एस. टी. बसने कोल्हापूरला आले. शहरातील कामे आटोपून ते दुपारी तीनच्या सुमारास रंकाळा बस स्टॅंडवर गेले. बसमध्ये चढत असताना चोरट्याने बॅग कापून त्यातील 67 हजारांची रक्कम हातोहात लंपास केली. बसमध्ये बसल्यानंतर बॅग दोन्ही बाजूने कापून त्यातील रक्कम चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसे ते घाबरून गेले. त्यांनी याची विचारणा प्रवासी, चालक-वाहकाकडे केली. त्यांनी चोरट्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर पाटील शहरातील मित्र सराफ अनिल पोतदार यांच्याकडे गेले. तेथे त्यांना चांगलाच घाम फुटला होता. पोतदार यांनी त्यांना पाणी पिण्यास देऊन धीर दिला. "तब्येत सांभाळा, आपण पोलिसांकडे जाऊ' असे सांगितले. त्यानंतर दोघे जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आले. पोतदार, त्यांना घेऊन थेट पोलिस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांच्या कक्षात गेले. पाटील खुर्चीवर बसले. हातातील बॅग दाखवत चोरट्याने 67 हजारांची रक्कम लंपास केल्याचे ते भुजबळ यांना सांगत होते. त्याचवेळी त्यांना दरदरून घाम फुटला. तसे ते खुर्चीवरून खाली पडले. निरीक्षक भुजबळ त्यांच्या मदतीला धावले. ठाण्यातील जुबीन शेख, पंडित पोवार, डोंगरसाने व सुहास पोवार यांनी रुग्णवाहिकेला फोन केला. त्यातून पाटील यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

धक्का बसलेल्या पोतदार यांनी ही माहिती पाटील कुटुंबीयांना दिली. सायंकाळपर्यंत सीपीआरमध्ये नातेवाईक जमा झाले. आमदार चंद्रदीप नरके, अजित नरकेही आले. त्यांनी नातेवाइकांची चौकशी केली. याबाबत तक्रार आहे का, याची विचारणा केली. पोलिस ठाण्यात मृत्यू झाल्याने त्याचा पंचनामा तहसीलदारांकडून केला जातो. त्यासाठी करवीरचे नायब तहसीलदार पी. जी. उरकुडे यांना सीपीआरमध्ये बोलवून घेण्यात आले. त्यांनी पंचनामा केला; मात्र शवविच्छेदन मिरजेत इन कॅमेरा करावा लागणार होते. मिरजेत दुपारी चारनंतर शवविच्छेदन केले जात नाही. उद्या गणेशोत्सव असल्याने शवविच्छेदन सीपीआरमध्येच करावे, अशी विनंती आमदारांनी थेट गृहराज्यमंत्र्यांकडे केली. याबाबत पोलिस प्रशासनाकडूनही हालचाली सुरू होत्या. रात्री सीपीआरमध्येच शवविच्छेदन करण्यात आले. पाटील यांच्या मागे सात विवाहित मुली, जावई, नातवंडे, दोन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, दक्षता म्हणून शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे व फौजफाटा बंदोबस्तासाठी होता. त्यामुळे सीपीआरला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. 

आमची तक्रार नाही... 
पाटील यांच्या हृदयावर तीन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया (बायपास) करण्यात आली होती. त्यांना सांधेदुखीचा त्रास होता. मोठी रक्कम चोरट्याने लंपास केली. त्याचा त्यांना धक्का बसला होता. त्यातूनच ही घटना घडली. याबाबत आमची कोणावरही तक्रार नसल्याचे नातेवाइकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांनी दमदाटी केल्यासंदर्भात व्हायरल झालेल्या पोस्टला पूर्णविराम मिळाला. 

पाटील यांच्या नातेवाइकांशी चर्चा करू. याबाबत त्यांची काही तक्रार असल्यास त्याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगू. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास करावा, अशी विनंतीही करू. 
चंद्रदीप नरके, आमदार 

तपास सीआयडीच करणार... 
पोलिस ठाण्यात किंवा परिसरात तक्रारदार, फिर्यादी, संशयित किंवा पोलिसाचा मृत्यू झाला तर त्याचा पंचनामा तहसीलदारांकडून केला जातो. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. शवविच्छेदन इन कॅमेरा केले जाते. ते काम वैद्यकीय समितीतर्फे केले जाते. या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीआयडीमार्फत केला जातो. पाटील यांच्या मृत्यूबाबत कोणतीच तक्रार अद्याप नातेवाइकांकडून आलेली नाही. 
संजय मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक