व्यंगचित्रे हे स्वातंत्र्याबरोबर मिळालेले लक्षवेधी गिफ्ट

अालोक निरंतर
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

‘सकाळ’च्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘पोलिटिकली करेक्‍ट’ हे राजकीय व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्‍यात आले आहे. १ ते ३ ऑगस्ट या काळात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालनात हे प्रदर्शन होईल. त्यानिमित्त एकूणच राजकीय व्यंगचित्रांच्या परंपरेविषयी...

क्रिकेट हा खेळ ब्रिटिशांनी भारतात आणला. व्यंगचित्र ही कलाही त्यांचीच. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वृत्तपत्रात तसेच साप्ताहिक, मासिकांत राजकीय व्यंगचित्राला मोठे करण्याचे काम शंकर्स विकलीचे शंकर आणि प्रसिद्ध चित्रकार व व्यंगचित्रकार दीनानाथ दलाल वगैरेंचे. त्यानंतरची पिढी अर्थातच आर. के. लक्ष्मण, ‘मार्मिक’कार बाळ ठाकरे, मारिओ मिरांडा, अबू इब्राहिम, सुधीर दास, कूटी वगैरे पिढीने गाजवली आणि भारतीय राजकारणात सत्ताधाऱ्यांना कायम चर्चेत आणि नैतिक धाकात ठेवत आपली व्यंगचित्र कारकीर्द गाजवली.

राजकीय व्यंगचित्र म्हणजे काय आणि त्याचे काम काय... तर जनतेचा प्रतिनिधी बनून सत्ताधाऱ्यांना प्रश्‍न विचारणे, त्यांच्या चुका दाखविणे, त्यांचा खोटेपणा दाखविणे आणि हे करीत असताना त्यांनी केलेल्या वाईट कामातून जनतेला हसविणे.
व्यंगचित्रांच्या ताकदीबद्दल काय म्हणावे... तर मागे एकदा मायकेल शुमाकरने क्रिकेटर सचिन तेंडुलकरला त्याच्या अद्वितीय कामगिरीबद्दल फेरारी नामक गाडी गिफ्ट दिली. ती भारतात आणण्यासाठी जो काही टॅक्‍स होता, तो माफ करण्यासाठी सचिनने विनंती केली होती. मामला कोर्टाच्या दरबारात होता... निर्णयाच्या दिवशी, लक्ष्मणचे पॉकेट कार्टून छापून आले... त्यात त्या कार्टूनच्या खाली फार मार्मिक भाष्य होते. त्यातील एक म्हातारा त्याच्या नातवाला म्हणतो, ‘तू क्रिकेटर हो म्हणजे तुला टॅक्‍स भरावा लागणार नाही.’ हे पॉकेट कार्टून बहुधा त्या संबंधित न्यायाधीशांनी त्या निर्णय देण्याच्या दिवशी पाहिले असावे आणि त्यांनीच निर्णय दिला तो असा - टॅक्‍स भरावाच लागेल. सर्वांना कायदा समानच. 

पूर्वीच्या राजकारण्यांना राजकीय व्यंगचित्राबाबत चांगली समज होती. तत्कालीन पंतप्रधान नेहरूंपासून आजच्या राजकीय मंचावरील अडवाणींपर्यंतचे काही अपवादात्मक नेते स्वतःवर टीकात्मक असलेली व्यंगचित्रे प्रसिद्ध झाल्यावर त्या-त्या व्यंगचित्रकारांकडून त्या चित्रांच्या ओरिजनल विनंती रूपाने मागवून घेत असत. एवढा व्यंगचित्राबद्दल सकारात्मक आदरभाव आज भारतीय राजकारणात अपवादच ठरेल. 

जागतिक राजकारणातही व्यंगचित्राबाबत एक प्रसंग कीर्तीच्या अत्युच्च स्थानावर असलेल्या व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांच्याबाबत घडून गेला. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळातला हा प्रसंग आहे. ब्रिटिश पंतप्रधान चेंबरलीनना जर्मनीच्या सर्वेसर्वा ॲडॉल्फ हिटलर एका डिप्लोमॅटिक भेटीत सांगतो, की तुमच्या चर्चिलची ती भाषणे आणि डेव्हिड लो यांची व्यंगचित्रे जर सोडली तर इंग्लंडशी युद्ध करण्यासाठी आमच्याकडे काही एक कारण नाही. पुढे अशा दोन-तीन झालेल्या डिप्लोमॅटिक चर्चेत हिटलरने हा विषय पुनश्‍च काढून डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रांचा टोन जरा खाली करायला लावा, असा तक्रारवजा मुद्दा उपस्थित करून डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रांची अनवधानाने धास्ती व्यक्त केली. अशाच एका भेटीनंतर पंतप्रधान चेंबरलीन जेव्हा ब्रिटनमध्ये परतले, तेव्हा डेव्हिड लो यांचे एक व्यंगचित्र ‘इव्हिनिंग स्टॅंडर्ड’ या वृत्तपत्रात प्रसिद्धीच्या पूर्वतयारीत असताना चेंबरलीन गव्हर्न्मेंटकडून ते रोखण्याचे एक विनंतीवजा पत्र त्या वृत्तपत्राला दिले गेले. कारण अर्थातच हिटलर या चित्राने दुखावला जाऊ नये, हेच होते. ते पत्र मिळताच इव्हिनिंग स्टॅंडर्ड वृत्तपत्राच्या संपादकांनी तातडीने चेंबरलीन प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना कळविले की जर ते चित्र उद्याच्या अंकात प्रसिद्ध झाले नाही तर संपूर्ण वृत्तपत्रच प्रकाशित होणार नाही. त्यानंतर पंतप्रधान चेंबरलीन यांना ब्रिटनच्या लोकशाहीत यापेक्षा काही करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे ते चित्र छापूनच आले. पण जर्मनीत मात्र हिटलरने डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्राच्या प्रसिद्धीवर बंदी आणली. याचे कारण त्या महायुद्धाच्या काळात डेव्हिड लोने जी जी व्यंगचित्रे काढली, ती ती सर्व जगभर प्रचंड गाजली आणि युद्ध संपेपर्यंत हिटलर आणि त्याची नाझी टोळी यांना आपल्या व्यंगचित्रातून त्याने कायम विरोधच केला. अत्यंत मार्मिक टिप्पणी असलेल्या त्या व्यंगचित्रातून त्याने हिटलर, गोअरिंग, हिमलर आणि गोबेल्स यांचे खरे रूप आणि त्यांचे विस्तारवादी विचार लोकांसमोर मांडून त्यांचे हसू केले. या व्यंगचित्राचा हिटलरवर इतका विपरीत परिणाम झाला, की डेव्हिड लो यांचे नाव त्याने त्याच्या ‘गेसटॅपो’ हिटलिस्टवर टाकले. जेव्हा युद्ध समाप्त झाले, तेव्हाच ही घटना डेव्हिड लो यांना समजली. 

भारतीय राजकारणात नेहरूंनी शंकरला सांगितले होते... ‘डोन्ट स्पेअर मी शंकर’. टीका करताना मलाही सोडू नको. असे चित्र आजच्या राजकारण्यांमध्ये अपवादानेच दिसून येते. शंकर्स विकलीचे शंकर जेव्हा ७३ वा वाढदिवस साजरा करीत होते, त्यानंतरच्या पाच आठवड्यांनंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली. त्याचा निषेध व्यक्त करीत शंकर यांनी आपले शंकर्स विकली हे २७ वर्षांचे साप्ताहिक बंद केले. याचे इंदिरा गांधींनाही दुःख झाले. त्या वेळी त्यांनी शंकर यांना निरोप पाठविला, ‘‘माझ्या वडिलांचे आवडते असलेले हे ‘शंकर्स विकली’ आपण बंद करू नका.’’ अर्थात, शंकर यांच्यावर त्याचा परिणाम झाला नाही. अशीही वृत्तपत्रातील व्यंगचित्रांची देण ही ब्रिटिशांनी स्वातंत्र्याबरोबर दिलेले लक्षवेधी गिफ्टच.

Web Title: Kolhapur News Political Cartoon Display from today