गावकीचे धुमशान

गावकीचे धुमशान

गडहिंग्लज -  गावे  ३४
उमेदवार निश्‍चितीत गाावपुढाऱ्यांची कसोटी
गडहिंग्लज - 
ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आणि गावच्या शिखर संस्थेवर झेंडा फडकविण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. तालुक्‍यातील ३४ गावांत रणधुमाळी उडाली आहे. उमेदवारीसाठी खुल्या गटात चुरस अन्‌ आरक्षित गटात शोध अशीच परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारी निश्‍चित करताना गावपुढाऱ्यांची कसोटी लागत आहे. सत्तेचे गणित सोडविताना सरपंचपदाचा प्रश्‍न जटिल होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच बहुतांश गावात उमेदवारीच्या निर्णयाचा ‘हातचा’ अद्याप राखून ठेवला आहे.

तालुक्‍याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या महागाव, कडगाव, नेसरी, भडगाव या मोठ्या गावांत टोकाची ईर्षा होण्याची चिन्हे पहिल्या टप्प्यातच दिसत आहेत. भडगाव, कडगावसह तावरेवाडी, सरोळी, डोमेवाडी, हिडदुग्गी, बिद्रेवाडी, जखेवाडी, यमेहट्टी, बटकणंगले, शिप्पूर तर्फ नेसरी, हसूरवाडी येथे खुल्या गटातील सरपंचपदाने निवडणुकीत रंग भरले आहेत. गावागावांतील पुढारी उमेदवारी निश्‍चित करण्यात मग्न आहेत. खुल्या जागेवर अनेक इच्छुकांतून एकाला संधी देताना मतांचे गणित मांडले जात आहे. याउलट आरक्षित जागेवर उमेदवारांचा शोध सुरू आहे. जनता दलाच्या मेळाव्यात माजी आमदार श्रीपतराव शिंदे तर राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन करीत कार्यकर्त्यांतील ऊर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

आघाड्यांनाच प्राधान्य...
अलीकडच्या काळात स्वयंघोषित नेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक गावात सर्वच पक्ष आणि पक्षांतर्गत दोन-तीन गट निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत विजयाचा लंबक आपल्याकडे झुकविण्यासाठी आघाड्यांनाच प्राधान्य दिले जाण्याची शक्‍यता सध्या तरी दिसत आहे.

-------------------------------------------------------------------

आजरा - गावे  ३७
आजरा, उत्तूरमध्ये सरपंचपदासाठी ‘टशन’
आजरा -
 ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षीय पातळीवरची नसली तरी तालुक्‍यात भाजप विरोधात राष्ट्रवादी असे लढतीचे संकेत मिळत आहेत. लोकसभा व विधानसभा या निवडणुकापूर्वी ग्रामपंचायतीच्या रणांगणात हे पक्ष आपली ताकद अजमावणार असल्याचे दिसते, पण काही गावात स्थानिक पातळीवरच राजकारण जोरात असल्याने येथे स्थानिक गटांत मोठा संघर्ष अटळ आहे. याचबरोबर काँग्रेस व शिवसेनेची भूमिकाही काही गावांत महत्त्वाची ठरणार आहे.   

सरपंचपद हे थेट जनतेतून होणार असल्यामुळे यंदाची निवडणूूक वेगळी ठरणार आहे. आजरा व उत्तूरचे सरपंचपद खुले असल्याने या गावात ‘टशन’ होणार आहे. सोशल मीडियावरून निवडणुकीला आताच रंग भरू लागले असून चर्चेची उडाणे सुरू झाली आहेत. या वेळी तालुक्‍यात आजरा, उत्तूरसह ३५ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.

आजरा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेले आजरा कारखाना अध्यक्ष अशोक चराटी यांना नगरपंचायत करण्यात अजून यश आलेले नाही. त्यांच्यासह भाजप नेत्यांना या शहराची निवडणूक प्रतिष्ठेची असेल. उत्तूरमध्ये दुरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे. येथे शाहू आघाडी ही राष्ट्रवादी की काँग्रेस या कोणाशी युती करणार यावर येथील चित्र स्पष्ट होणार आहे. येथील सरपंचपद खुले असल्याने मोठी चुरस  अपेक्षित आहे.

‘भाजप’ पाया रोवणार?
आजरा शहर वगळता भाजपचा तसा तालुक्‍यातील अन्य गावातील ग्रामपंचायतींच्या सत्तेत तितकासा प्रभाव नव्हता. काही गावांत शिवसेनेची सत्ता होती, पण तालुक्‍यातील राजकीय गट भाजपमध्ये जात असल्याने होणाऱ्या निवडणुकीत प्रथमच भाजप ग्रामीण राजकारणात आपला पाया रोवू पाहत आहे.

-------------------------------------------------------------------

करवीर - गावे  ५३
मोठ्या गावांत घमासान
कुडित्रे -
 करवीर तालुक्‍यातील ५३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे कुरुत्रेक्ष जाहीर झाले आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या १५ मोठ्या गावांत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने येथे मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीमध्ये स्थानिक गट समोरा-समोर उभे राहिले आहेत, असे चित्र असले तरी अप्रत्यक्षरीत्या शिवसेना विरुद्ध काँग्रेस, तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. 

यंदा थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने राजकीय व स्थानिक गटातून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. लोकसंख्येने व विस्ताराने मोठी गावे असणाऱ्या वडणगे, सांगरूळ, गोकुळ शिरगाव, कळंबे तर्फ ठाणे, वळीवडे, वसगडे, पाचगाव या गावांतून आतापासूनच व्यूहरचना आखायला सुरवात झाली आहे. तसेच नागाव, सरनोबतवाडी, शेळकेवाडी, बोलोली, हासूर दुमाला, नेर्ली, विकासवाडी व निटवडे या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या गावातही कार्यकर्ते जुळणीला लागले आहेत. बहुतांश गावे करवीर मतदारसंघात येत असल्याने अशी गावे आमदार चंद्रदीप नरके यांचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात आहेत, तर काही मोठी गावे काँग्रेसचीही गड म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अंतिम टप्प्यात शिवसेना विरुद्ध काँग्रेस असे चित्र राहील. 

दक्षिणमध्ये सतेज विरुद्ध महाडिक
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वळीवडे, पाचगाव, वसगडे, गोकुळ शिरगाव या गावांत सतेज पाटील विरुद्ध महाडिक अशी लढत लक्षवेधी ठरणार आहे, तर करवीर विधानसभा मतदारसंघातील वडणगे, सांगरूळ या गावांवर कोण भावी आमदार हे ठरविण्याची ताकद असल्याने शिवसेना विरुद्ध काँग्रेस, विरुद्ध भाजप अशा तिरंगी लढतीचे चित्र आहे.

-------------------------------------------------------------------

राधानगरी - गावे  ६६
गावागावांत वातावरण टाईट
 राधानगरी
तालुक्‍यातील ६६ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असल्याने गावागावांत निवडणूक ज्वर वाढू लागला आहे. राजकीय घडामोडी स्पष्ट दिसून येत नसल्यातरी  खलबते सुरू झाले आहेत. प्राथमिक पातळीवर बिनविरोध करण्यासाठीही अनेक ठिकाणी प्रयत्न सुरू झाले असून, या वेळी जनतेतून सरपंच असल्याने नेत्यांची ‘हवा टाईट’ झाली आहे. तालुक्‍यातील राशिवडे, राधानगरी, तारळे, धामोड, घोटवडे, कौलव, सोळांकूर या गावांमध्ये नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागणार आहेत. या निवडणुकांवर भोगावतीच्या झालेल्या आणि बिद्रीच्या होणाऱ्या निवडणुकीचे सावट राहणार आहे. 
 जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका झाल्यानंतर खरेतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जुळवाजुळव दिसू लागल्या. यातूनच स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या ग्रामसभा गाजल्या. ६६ गावांमध्ये विशेष करून राशिवडे येथे निवडणूक कळीची ठरणार आहे. येथील सरपंच पदाभोवतीच गेली पाच वर्षे न्यायालयीन लढाई झाली, ईर्षा पेटली आता तीच ईर्षा दिसणार आहे. येथे गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे व भोगावतीचे माजी संचालक अविनाश पाटील यांचा कस लागेल, तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना सोळांकूर आणि राधानगरी या गावांवर वर्चस्वासाठी कंबर कसावी लागेल. धामोड, कसबा तारळे, कौलव, घोटवडे येथेही घमासान होणार आहे. निवडणुकीला सामोरे जाणारी गावं अशी ः अर्जुनवाडा, आपटाळ, आमजाई व्हरवडे, आवळी बुद्रुक, आवळी खुर्द, ओलवन, आटेगाव, आकनूर, बनाचीवाडी, चाफोडी तर्फ तारळे, चंद्रे, चांदे, दुर्गमानवाड, धामणवाडी, धामोड, लाडवाडी, ढेंगेवाडी, घोटवडे, घुडेवाडी, हसणे, कुंभारवाडी, कुडुत्री, केळोशी बुद्रुक, केळोशी खुर्द, कसबा तारळे, कपिलेश्‍वर, करंजफेन, कारिवडे, कासारपुतळे, कोते, कौलव, कांबळवाडी, खामकरवाडी, मौजे कासारवाडा, मल्लेवाडी, मुसळवाडी, माजगाव, मोघर्डे, मोहडे, मजरे कासारवाडा, मानबेट, मांगोली, पडसाळी, पडळी, पुंगाव, पिरळ, सावर्धन, पिंपळवाडी, पाट पन्हाळा, राधानगरी, राशिवडे बुद्रुक, राशिवडे खुर्द, सोन्याची शिरोली, सोळांकूर, सुळंबी, सावर्दे, सिरसे, शेळेवाडी, शिरगाव, तळगाव, तरसंबळे, तुरंबे, तारळे खुर्द, ठिकपुर्ली, येळवडे, वाघवडे, आडोली, तिटवे.

-------------------------------------------------------------------

चंदगड - गावे  ४१
सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच

चंदगड - तालुक्‍यातील ४१ ग्रामपंचायतींच्या ३२१ जागांसाठी १४ ऑक्‍टोबरला मतदान होत आहे. यामध्ये चंदगड या तालुक्‍याच्या गावासह अडकूर, नागनवाडी, दुंडगे, कुदनूर, राजगोळी बुद्रूक, नागरदळे, शिनोळी बुद्रुक या मोठ्या गावांचा समावेश आहे. थेट जनतेतून सरपंच निवडणुकीची ही पहिलीच वेळ असल्याने मतदारांत उत्सुकता आहेच, इच्छुकांचाही कस लागणार आहे. सरपंचपदाला दिलेले अधिकार आणि चौदावा वित्त आयोग यामुळे मोठ्या गावांतून या पदासाठीच लक्षवेधी लढती होणार आहेत. 

चंदगड, शिरगाव, हिंडगाव, इनाम म्हाळुंगे, कोकरे, गवसे, अलबादेवी, अडकूर, विंझणे, डुक्करवाडी, सातवणे, आसगोळी, केंचेवाडी, नागनवाडी, कोरज, कोनेवाडी, हेरे, पार्ले, खालसा गुडवळे, हल्लारवाडी, करंजगाव, जंगमहट्टी, जेलुगडे, मोटणवाडी, खालसा कोळींद्रे, दुंडगे, कागणी, कुदनूर, राजगोळी खुर्द, तेऊरवाडी, नागरदळे, कडलगे बुद्रूक, लकीकट्टे, निट्टूर, ढेकोळी, सरोळी, कोलीक, खालसा म्हाळुंगे, शिनोळी बुद्रूक, महिपाळगड, तडशिनहाळ या गावांची निवडणूक होत आहे. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, आरपीआय आदी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते तालुक्‍यात आहेत. कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर निवडणूक लढवणे आणि यश मिळवणे शक्‍य नाही. गावागावात सोयीच्या युतीचे राजकारण पाहायला मिळणार आहे. भाजपचे प्रदेश सदस्य गोपाळराव पाटील यांच्याकडून संजय गांधी निराधार योजना समितीचे पद काढून घेतल्याने नाराजी आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्याकडूनही नियोजन राबवण्यात येत आहे. माजी राज्यमंत्री भरमू पाटील, ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांच्याकडून आपापल्या गटाच्या यशस्वितेचे राजकारण केले जाणार आहे. अलीकडच्या काळात शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही अग्रेसर झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्यात दुंडगे, कुदनूर, कागणीसह ढेकोळी, सरोळी, कोलीक, म्हाळुंगे या गावच्या निवडणुका होत असून तिथे संघटना आक्रमक  राहणार आहे.

-------------------------------------------------------------------

शिरोळ - गावे  १७
पक्षापेक्षा गटातटांतच टक्कर
जयसिंगपूर -
 शिरोळ तालुक्‍यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पक्षापेक्षा गावागावांत गटातटांना महत्त्व आले असून थेट सरपंच निवडीमुळे घोडेबाजारालाही लगाम बसणार आहे. 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील नेत्यांनी कंबर कसली असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवेसनेने स्वबळाचा नारा दिला आहे. शिरोळ तालुक्‍यातील औरवाड, कवठेसार, कनवाड, चिंचवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, अब्दुललाट, लाटवाडी, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड, खिद्रापूर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीमुळे या गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या गावांमध्ये सर्वच पक्षांनी सत्ता काबीज करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. सर्वच १७ गावांमध्ये चुरशीच्या निवडणुका पाहायला मिळणार आहेत. यामध्ये संभाजीपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

तालुक्‍यातील ही पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेली ग्रामपंचायत आहे. स्वाभिमानी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सत्तेची फिल्डिंग लावली आहे, मात्र कोथळीकर गटाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

स्थानिक नेत्यांची लगबग...
 आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवार निश्‍चित करण्यासाठी स्थानिक नेत्यांची लगबग सुरू आहे. 

-------------------------------------------------------------------

गगनबावडा - गावे २१ 
काँग्रेस, सेना, भाजपमध्ये चढाओढ
असळज -
 गगनबावडा तालुक्‍यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या ऑक्‍टोबरमध्ये होत आहेत. यंदा प्रथमच सरपंचपदाची निवडणुक थेट जनतेतून होत असल्याने तालुक्‍यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जवळपास १० ग्रामपंचायतींत काटाजोड लढती पाहावयास मिळणार आहेत. पक्षीय पातळीबरोबरच स्थानिक गटा-तटांचे राजकारण ढवळून निघणार आहे. ही निवडणूक म्हणजे विधानसभा व लोकसभेची रंगीत तालीम ठरणार असल्याने अधिकाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्ष व गटाच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. थेट सरपंच निवडीमुळे गटा-तटांचे महत्त्व वाढले आहे. वॉर्डनिहाय बांधणी करण्याचे काम सुरू असले तरी सरपंच निवडीच्या उमेदवाराचा शोध घेण्यासाठी सर्वच गटांची दमछाक होणार आहे. गगनबावडा तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वेळोवेळी आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके व जिल्हा बॅंकेचे संचालक पी. जी. शिंदे या तीन पारंपरिक गटांतच होत असल्याचा अनुभव येथील जनतेला आहे. पक्षीय पातळीचा विचार करता राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व भाजप या तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांची फळी निर्णायक ठरली आहे. तालुक्‍यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर आमदार सतेज पाटील गटाचे प्राबल्य आहे. गगनबावडा, असळज, तिसंगी या मोठ्या ग्रामपंचायतींवरही या गटाचेच वर्चस्व आहे. गतवेळी झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत वर्चस्व राखून हे सिद्ध केले आहे.   

निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती 
मांडुकली, खोकुर्ले, तळये बुद्रुक, मार्गेवाडी, अणदूर, साखरी, खेरीवडे, कडवे, बावेली, तिसंगी, जर्गी, शेळोशी, निवडे, बोरबेट, कोदे बुद्रुक, धुंदवडे, वेसर्डे, असळज, शेणवडे, मणदूर, साळवण.

-------------------------------------------------------------------

भुदरगड - गावे ४४
सक्षम उमेदवाराचा शोध
गारगोटी - 
 भुदरगड तालुक्‍यातील ४४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. बिद्री साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यात राजकीय वातावरण तापले आहे. यात ग्रामपंचायत निवडणुकांनी भर घातली आहे. यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच रंगत भरणार आहे. 

आपला गट, पक्ष व भाऊबंदकी यावर राजकीय जुळवाजुळव होणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने प्रत्येक गट प्रभावी उमेदवारांच्या शोधात आहेत. मडिलगे बुद्रुक, मुदाळ, आकुर्डे, कूर, वाघापूर, कडगाव, आरळगुंडी, शेणगाव, शेळोली, अंतिवडे, अंतुर्ली, अनफ खुर्द, करडवाडी, कारिवडे, कोळवण, कोनवडे, टिक्केवाडी, तांबाळे, तिरवडे, दारवाड, दिंडेवाडी, देवर्डे, देवकेवाडी, देऊळवाडी, न्हाव्याची वाडी, पडखंबे, पाल, पारदेवाडी, पाचवडे, पिंपळगाव, पुष्पनगर, भाटीवडे, महालवाडी, मडिलगे खुर्द, मडूर, मानवळे, मिणचे बुद्रूक, राणेवाडी, वेंगरूळ, वेसर्डे, वरपेवाडी, सोनारवाडी, हेदवडे, व्हनगुती या गावांच्या निवडणुका होत आहेत. 

प्रमुख नेत्यांच्या गावांत निवडणुका 
माजी आमदार के. पी. पाटील यांचे मुदाळ, जि. प. सदस्य जीवन पाटील व उपसभापती अजित देसाई यांचे कूर, ‘बिद्री’चे माजी संचालक सुनील कांबळे, दत्तात्रय उगले, माजी सभापती नंदकुमार ढेंगे, सदस्य संग्राम देसाई यांचे मडिलगे बुद्रुक, धनाजी देसाई यांचे कडगाव, माजी आमदार दिनकरराव जाधव, के. जी. नांदेकर यांचे तिरवडे, ‘गोकुळ‘चे संचालक विलास कांबळे यांचे कारिवडे, माजी उपसभापती विश्‍वनाथ कुंभार, सदस्या स्नेहल परीट यांचे पिंपळगाव, भाजपचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, अशोक भांदीगरे यांचे आकुर्डे, भाजप नेते देवराज बारदेस्कर व सुरेश नाईक यांच्या शेणगावमध्ये निवडणुका होणार आहेत.

-------------------------------------------------------------------

कागल - गावे २६
आमदारकीची रंगीत तालीम
कागल -
 तालुक्‍यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी २४० सदस्य निवडून दिले जाणार आहेत. ही निवडणूक युती करूनच लढविली जाईल, असे चित्र आहे. तालुक्‍यात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, भाजपचे समरजितसिंह घाटगे, शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे व सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक हे चार प्रमुख नेते  ग्रामपंचायतीवरील वर्चस्वासाठी स्थानिक कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून युतीचा निर्णय घेतील. ही निवडणुक आमदारकीची रंगीत तालीमच  ठरणार आहे. तालुक्‍यातील सेनापती कापशी, हसूर बुद्रुक, बाचणी, नंद्याळ, बोळेघोल, काळम्मा बेलेवाडी, हणबरवाडी, बोरबडे, चिमगाव, पिराचीवाडी फराकटेवाडी, निढोरी, दौलतवाडी, मुगळी, जैन्याळ, आनूर, व्हनाळी, रणदेवीवाडी, हमिदवाडा, करड्याळ, अवचितवाडी, अर्जुनवाडा, कसबा सांगाव, ठाणेवाडी, बोळावी, बामणी या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सदस्यांची एकूण संख्या 
२४० आहे. 

-------------------------------------------------------------------

शाहुवाडी - गावे  ४९
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
शाहूवाडी -
शाहूवाडी तालुक्‍यात ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी उडाली आहे. त्यामध्ये तालुक्‍यातील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या सरूड, भेडसगाव, साळशी, कडवे, बांबवडे, शाहूवाडी, कोतोली, रेठरे या गावांचा समावेश असल्याने निवडणुका अधिकच प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. तालुक्‍यात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या सरूड गावची निवडणूक होत आहे. बांबवडे ग्रामपंचायतीवर यापूर्वी कर्णसिंह गायकवाड गटाचे वर्चस्व होते. भेडसगाव येथे गतवेळा जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील यांनी सत्ता मिळविली. जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्या साळशी गावात महादेव पाटील गटाचे वर्चस्व आहे. कडवे गावच्या ग्रामपंचायतीत जनसुराज्यचे तालुका अध्यक्ष नामदेव खोत यांच्या गटाची सत्ता आहे. शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या आकांक्षा पाटील, जनसुराज्याचे विजय खोत व काँग्रेसचे अमर खोत हे तिन्ही लोकप्रतिनिधी यावेळी येथे असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. 

-------------------------------------------------------------------

पन्हाळा - गावे ५०
तिरंगी लढतीचा रंगतदार सामना

तालुक्‍यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने गावागावांत वातावरण ढवळणार आहे.  तालुक्‍यात बहुतांशी ग्रामपंचायतीत तिरंगी लढती होण्याची शक्‍यता आहे. ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे पोहाळे तर्फ आळते, आकुर्डे, आळवे, आंबवडे, आसगाव, आसुर्ले, बहिरेवाडी, बोंगेवाडी, कसबा बोरगाव, चव्हाणवाडी, घरपण, दरेवाडी, घोटवडे, गिरोली, गोलीवडे, गोठे, जाखले, काखे, माले, करंजफेण, किसरूळ, कोलीक, कोतोली, कोलोली, कुंभारवाडी, कुशिरे तर्फ ठाणे, मानवाड, मरळी, मोरेवाडी, पडळ, पणोरे, पणुत्रे, परखंदळे, पाटपन्हाळा, पिंपळे तर्फ सातवे, ठाणे, पोर्ले तर्फ बोरगाव, राक्षी, साळवाडी, सावर्डे/असंडोली, तांदूळवाडी, वालोळी, वाघुर्डे, वेतवडे, बांदिवडे, मल्हारपेठ, कोतोली माळवाडी, मिठारवाडी, शहापूर, यवलूज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com