कळंबा कारागृह अधिकाऱ्यावर कैदी मृत्यूप्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - कळंबा कारागृहातील कैद्याच्या मृत्यूप्रकरणी तत्कालीन कारागृह अधिकारी, कर्मचारी व बॅरेकमधील संबंधित बंदीजनांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली. कैद्याच्या उपचाराबाबत आणि कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवल्याचे अधीक्षक शेळके यांनी सांगितले. 

मुंबईतील अल्गू मुत्तू शंकर पाडीयन ऊर्फ मोहमंद आयुब (बंदी क्रमांक ५००९) यास गुन्ह्यात २००८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. कळंबा कारागृहात त्याला २००९ मध्ये हलवण्यात आले. तो १५ ऑगस्ट २०१३ ला कारागृहातील दवाखाना विभागाच्या बरॅक क्रमांक ३ मध्ये रात्री आठच्या सुमारास शौचालयाला गेला होता. त्यावेळी तो पाय घसरून शौचालयाच्या लोखंडी दरवाजावर पडून जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्याच्या शरीरावर जखमा असल्याने याची नवी दिल्लीतील राष्ट्रीय मानवी हक्क आयोगातर्फे चौकशी झाली. त्याबाबतचा अहवाल त्यांनी अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा विभागाला पाठवला. 

त्यानुसार कारागृह महानिरीक्षकांनी संबंधित तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश कारागृह अधीक्षकांना दिले. त्यानुसार अधीक्षक शेळके यांनी कैदी आयुबवर मानसिक आजाराबाबत योग्य ते उपचार केले नाहीत. शौचालयाचा दरवाजा तुटलेला असतानाही त्याची वेळीच दुरुस्ती केली नाही. तसेच घटनेच्या आधी चार दिवसांपूर्वी आयुबला अधिकारी, कर्मचारी व बॅरेकमधील बंदिजनांनी केललेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याबाबतची फिर्याद दिली. त्यानुसार १५ ऑगस्ट २०१३ मध्ये कार्यरत असणारे संबधित अधिकाऱ्यांनी बरॅक क्रमांक ३ मधील बंदीविरोधात निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर कलम ३०२ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी व बंदींची चौकशी होणार असून पुढील तपास सीआयडीमार्फत केला जाईल, असे शेळके यांनी सांगितले.