सीपीआरमध्ये लिफ्टअभावी हाल

सीपीआरमध्ये लिफ्टअभावी हाल

कोल्हापूर - सीपीआरमधील लिफ्ट बंद असल्यामुळे रुग्णांना रेस्टरूमपर्यंत नेण्यासाठी नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे. हृदय रुग्ण विभागाच्या बाह्यरुग्ण विभागातील तुलसी इमारतीत हा अनुभव रोज शेकडो नातेवाईक घेत आहेत. अनेक वेळा रुग्णांना खांद्यावरून, पाठीवरून तर स्ट्रेचर घेऊन पायऱ्यांवरून चार मजले चढावे लागत आहेत. उत्तम सेवा मिळूनही केवळ लिफ्ट बंद असल्यामुळेही नातेवाईक आणि वॉर्डबॉय यांना त्रास सहन करावा लागत आहे.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अर्थात थोरला दवाखाना. याच सीपीआरमधील पाच इमारतींमध्ये चारही मजल्यांवर रुग्ण उपचार घेतात. त्यांना वॉर्डात ने-आण करण्यासाठी वॉर्डबॉय स्ट्रेचरचा वापर करतात. वॉर्डबॉय व नातेवाईक रुग्णाला स्ट्रेचरवरून चार मजले चढून वर-खाली घेऊन जातात. दिवसातून किमान सात-आठ रुग्णांना तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर घेऊन जावे लागते. काही वेळा अत्यावश्‍यक रुग्णांना त्यांच्या नातेवाइकांसह वॉर्डबॉय पायऱ्यांवरून स्ट्रेचरने घेऊन जातात. त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना जिना चढून जाण्याची वेळ येते. हा त्रास रोजचा झाल्याने कर्मचारीही थकले आहेत. ‘साहेब, बघा की जरा याकडे’ असे ते सांगत असतात. सीपीआर रुग्णालयातील तुलसी इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेने सीपीआरमधील लिफ्टच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. दरम्यान याच परिसरातील दुधगंगा इमारतीत लिफ्ट सुरू असली, तरी तीही रामभरोसे आहे. इंडिकेटर, बेल बंद आणि लिफ्ट बंद पडणे, दरवाजा लॉक न होणे असे प्रकार दररोज घडत आहेत. येथे लिफ्टमन नाही. सीपीआरमध्ये येणारे रुग्ण व नातेवाईक सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील असल्याने त्यांना लिफ्ट वापराचा सराव नसतो. परिणामी लिफ्ट वापरताना त्यांना  अडचणी येतात. एक लिफ्ट सुरू आहे; मात्र ती फक्त खास डॉक्‍टरांसाठीच आहे.

दोन वर्षांपूर्वी लिफ्टमन पाहिजेत, असा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिला आहे; मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. लिफ्टमनची पदे मंजूर नसल्यामुळेच लिफ्ट बंद ठेवाव्या लागत आहेत. 
- शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक 

हृदयरुग्णांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना विश्रांतीसाठी विभागाजवळच असलेल्या तुलसी इमारतीत ठेवले जाते; मात्र अत्यंत महत्त्वाच्या या विभागातीलच लिफ्ट बंद आहे. त्याचा त्रास रुग्णांच्या नातेवाइकांना आणि वॉर्डबॉय यांना होत आहे. लिफ्ट दुरुस्त करून तातडीने लिफ्टमन येथे मिळाला पाहिजे.
 - संजय माने, रुग्णाचे नातेवाईक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com