आता एकच मागणी : हटाव पुजारी; कोल्हापुरात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

महालक्ष्मी मंदिर श्रीपूजकांविरोधात आंदोलन 
 

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी मूर्तीची हेळसांड करणाऱ्या आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या श्रीपूजकांना मंदिरातून हटवा, या मागणीसाठी आज शिवसेनेसह विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी श्री महालक्ष्मीला साकडे घातले. 'अंबाबाईच्या नावानं चांगभलं', 'अंबा माता की जय', 'आता एकच मागणी- हटाव पुजारी' अशा घोषणांनी सुमारे तासभर मंदिर परिसर दणाणून गेला. 

श्री महालक्ष्मीस घागरा-चोली परिधान करून पूजा बांधल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या असल्याच्या भूमिकेतून गेली अकरा दिवस विविध पक्ष, संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याला श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजकांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून उत्तरेही दिली. मात्र, श्रीपूजकांनी गुन्हा नोंद झाल्याने आंदोलनकर्त्यांच्या समन्वय बैठकीच्या मागणीला नकार दिला.

त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय काल झालेल्या संयुक्त बैठकीत झाला. त्याचा पहिला टप्पा म्हणून आज श्री महालक्ष्मीला साकडे आंदोलन झाले. जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अद्यापही याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याबद्दल यावेळी तीव्र भावना व्यक्त झाल्या. याबाबत बुधवारी (ता. 21) जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय झाला.