शौचालयाला दारे बसवायला तरी निधी द्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - टेंबलाईवाडी प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची दारे मोडल्यामुळे महिला चौकटीला साडीचा आडोसा करून शौचास बसतात. नगरसेवक म्हणून निवडून येऊन दोन वर्षे झाली; पण निधी नसल्याने काही काम करता आलेले नाही. प्रशासन निधी देत नाही, त्यामुळे काम करता येत नाही. माता-भगिनींची ही कुचंबणा पाहून शरमेने मान खाली जाते. अशी हतबलता व्यक्त करत नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी दुसरे काहीही काम नको; पण शौचालयाला दारे बसवायला तरी निधी द्या, असे म्हणत हातात कटोरा घेऊन महापौर हसीना फरास आणि आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर निधीसाठी हात पसरला.

कोल्हापूर - टेंबलाईवाडी प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची दारे मोडल्यामुळे महिला चौकटीला साडीचा आडोसा करून शौचास बसतात. नगरसेवक म्हणून निवडून येऊन दोन वर्षे झाली; पण निधी नसल्याने काही काम करता आलेले नाही. प्रशासन निधी देत नाही, त्यामुळे काम करता येत नाही. माता-भगिनींची ही कुचंबणा पाहून शरमेने मान खाली जाते. अशी हतबलता व्यक्त करत नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी दुसरे काहीही काम नको; पण शौचालयाला दारे बसवायला तरी निधी द्या, असे म्हणत हातात कटोरा घेऊन महापौर हसीना फरास आणि आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर निधीसाठी हात पसरला. अत्यंत तळमळीने आणि पोटतिडकीने प्रश्‍न मांडणाऱ्या भोपळे यांच्यासमोर महापौर आणि आयुक्तही क्षणभर निरुत्तर झाले. भोपळे यांच्या या तळमळीसाठी अखंड सभागृहाने टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.

कमलाकर भोपळे म्हणाले, ‘‘मी शेजारच्या वडणगे गावातील, व्यवसायानिमित्ताने टेंबलाईवाडीत स्थायिक झालो. हाडाची काडे केली, रक्ताचे पाणी केले आणि या निवडणुकीत निवडून आलो. दोन वर्षे झाली निवडून येऊन, पण महापालिकेच्या कामकाजाची पद्धत पाहून कंटाळलो आहे. आयुक्तांकडे फाईल घेऊन आलो, तर आयुक्त म्हणाले, ‘‘कामाचे फोटो काढा. पुन्हा फोटो आणि फाईल घेऊन गेलो, तर समजुतीचा नकाशा करायला सांगितला. समजुतीचा नकाशा घेऊन गेलो, तरी त्यांचे समाधान होईना, पुन्हा त्रुटींची यादी आली. दोन वर्षे हा केवळ ताकतुंबाच सुरू आहे. दोन वर्षांत दोन आण्याचेही काम झाले नाही. सकाळी पाच वाजता प्रभागात फिरतो, नागरिक आता म्हणतात नुसतीच फिरती करता काम काही होईना.

महापालिकेत जाऊन गोट्या तरी खेळा. आता मला सांगा मी गोट्या कोणाबरोबर खेळू. प्रभागातील माताभगिनींना सार्वजनिक शौचालयाशिवाय दुसरा आधार नाही. त्या सार्वजनिक शौचालयात जातात. या शौचालयाची दारेच तुटली आहेत. ही दारे बसवायला निधी दिला जात नाही. माताभगिनी दारे नसल्याने दाराऐवजी साडीचा आडोसा करतात आणि शौचास बसतात. हे पाहिल्यावर लाज वाटून मान खाली जाते. नगरसेवक म्हणून निवडून येऊन तरी आमचा काय उपयोग? नुसता ताकतुंबा सुरू आहे. त्यामुळे आता बास आता कोणतीच कामे करू नका, फक्त एकच काम करा..माझ्या माताभगिनींना सुरक्षित शौचास जाता यावे, यासाठी किमान शौचालयाला दारे बसवायला तरी निधी द्या, असे म्हणत भोपळे यांनी महापौर आणि आयुक्तांसमोर निधीसाठी कटोराच पुढे केला.

हागणदारीमुक्त शहराचा तरी विचार करा
कोल्हापूर हे हागणदारीमुक्त असलेले राज्यातील पहिले शहर आहे. या शहरातही सार्वजनिक शौचालयांची किती दुरवस्था आहे, हे नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी मांडलेल्या प्रश्‍नावरून ध्यानात येते. टेंबलाईवाडी येथील हे उदाहरण प्रातिनिधिक आहे. शहरात बहुतांशी दाटवस्ती आणि झोपडपट्टी विभागात सार्वजनिक शौचालयांची अशीच अवस्था आहे. राज्य शासन आणि महापालिका यांनी हागणदारीमुक्त शहर असा नावलौकिक मिळविलेल्या शहराला तरी खास बाब म्हणून जादा निधी द्यावा, अशी मागणीही आता नागरिकांतून होत आहे.