पूजा महाडिक खून प्रकरणी कोल्हापूरकरांचा मूक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - अल्पवयीन मुलाने खून केलेल्या पूजा महाडिक यांना न्याय मिळण्यासाठी आज कोल्हापूरकरांनी पुढाकार घेऊन मूक मोर्चा काढला. मला न्याय द्या... खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा, असे फलक घेऊन महिला मोर्चात सहभागी झाल्या. बिंदू चौकातून निघालेला मोर्चा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात विसर्जित झाला. 

कोल्हापूर - अल्पवयीन मुलाने खून केलेल्या पूजा महाडिक यांना न्याय मिळण्यासाठी आज कोल्हापूरकरांनी पुढाकार घेऊन मूक मोर्चा काढला. मला न्याय द्या... खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा, असे फलक घेऊन महिला मोर्चात सहभागी झाल्या. बिंदू चौकातून निघालेला मोर्चा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात विसर्जित झाला. 

येथे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना निवेदन दिले. योग्य तो तपास करून खटला फास्ट ट्रॅक (जलदगती न्यायालयात) चालविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन अमृतकर यांनी दिले.

शास्त्रीनगरातील पूजा महाडिक यांचा खून अल्पवयीन मुलाने केल्याचा आरोप आहे. हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालविला जावा, विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अल्पवयीनच्या वयाचा दाखला विचारात न घेता न्यायालयामध्ये ‘बोन टेस्ट’ करण्याची मागणी करावी, अशा मागणीसाठी  हा मोर्चा निघाला. यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. दुपारी साडेअकराच्या सुमारास बिंदू चौकातून मोर्चाला सुरवात झाली. शिवाजी चौक, माळकर तिकटी मार्गे मोर्चा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आला. मोर्चाला विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिलांसह तरुणांचाही सहभाग होता. 

मोर्चा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आल्यानंतर तेथे उपअधीक्षक अमृतकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. मागण्या वाचून अमृतकर यांनी आरोपीची ‘बोन टेस्ट’ घेतली आहे. तो १६ वर्षांच्या वरील आहे याची खात्री केली जात आहे. तपासात कोणतीही कसूर केली जाणार नाही. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल यासाठी आम्ही प्रयत्न करू; पण सरकारी वकील नेमणे, कोणत्या न्यायालयात खटला चालविणे हे आमच्या हाती नाही. आम्ही तपासाचे काम योग्य पद्धतीने करून न्यायदान करण्याचे काम न्यायालयाचे आहे, असे स्पष्ट केले. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, निरीक्षक निशिकांत भुजबळ उपस्थित होते.

मोर्चात पूजा महाडिक यांचे नातेवाईक ऋतुजा राणे, स्मिता उरणकर, शैलेश महाडिक, अर्चना भोसले, यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रज यांच्यासह राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, मनसेच्या श्रद्धा महागावकर, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर, वंदना आळतेकर, गीता हासूरकर, स्वाती साठे, प्रिया पाटील, शुभांगी साळोखे, जहिदा मुजावर, दीपाली शिंदे, सुजाता सोहणे, बाबा पार्टे, जितेंद्र सलगर, सुनील मोदी, वसंतराव मुळीक, अमर इंगवले, जयकुमार शिंदे, विराज ओतारी, बाळासाहेब देशमुख, राजू यादव, राजू सांगावकर, शिवाजी खोत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

लक्षवेधी फलक
महिलांच्या हातात पूजा महाडिक यांच्या छायाचित्रासह मला न्याय द्या, खटला जगदगती न्यायालयात चालवा, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, असे फलक सर्वांचे लक्ष वेधत होते.