विचारेमाळ परिसरात दोन गटांत दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  विचारेमाळ परिसरात एकमेकांकडे बघण्यावरून आज सायंकाळी दोन गटांनी एकमेकावर दगडफेक केली. त्यात पाचजण जखमी झाले. जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. येथे दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

कोल्हापूर -  विचारेमाळ परिसरात एकमेकांकडे बघण्यावरून रविवारी सायंकाळी दोन गटांनी एकमेकावर दगडफेक केली. त्यात पाचजण जखमी झाले. जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. येथे दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी - विचारेमाळ परिसरात सायंकाळी काही तरुण रस्त्यावर उभे होते. त्यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. वाद चिघळत त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरातील महिला व नागरिकांनी आरडाओरड करत धावाधाव सुरू केली. त्यामुळे गोंधळाचे, तणावाचे वातावरण निर्माण झाले. दगडफेकीत शशिकुमार बसवंत वडर (वय २४), रियाज सय्यद (२१), सद्दाम पटवेगार (२४), फिरोज शेख (२०) यांच्यासह पाचजण जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी भांडण सोडवले. त्यानंतर जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. तेथे दोन्ही गटाचे समर्थक जमा झाले. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी येथे तातडीने बंदोबस्त देऊन तणाव दूर केला.