सावधान... विषारी "रॅगवीड' तणाचा राज्यात शिरकाव 

सावधान... विषारी "रॅगवीड' तणाचा राज्यात शिरकाव 

कोल्हापूर  - "रॅगवीड' या विदेशी विषारी तणाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. सूर्यफुलांच्या बिया व पक्षी खाद्यातून होणाऱ्या आयातीतून त्याच्या बिया देशात पसरल्या असाव्यात, असा अंदाज आहे. या तणाचा प्रसार शेतातून ग्रामीण व शहरात झाल्यास माणसाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशी माहिती निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर व प्रा. दशरथ जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पेठ वडगावमधील विजयसिंह यादव महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शेतात 2015 मध्ये वनस्पतींचा अभ्यास करताना हे तण आढळल्याचेही त्यांनी सांगितले. 

डॉ. बाचूळकर म्हणाले, ""वनस्पती सर्वेक्षणावेळी हे तण आढळून आले आहे. "ऍम्बरोसिया ऍरटिमीसिफोलिया' हे तणाचे शास्त्रीय नाव आहे. ते ऍस्टरेसी म्हणजेच सूर्यफुल कुळातील आहे. ऍम्बरोसिया वनस्पती जातीच्या एकूण 41 प्रजाती आहेत. या प्रजाती समूहाला रॅगवीड नावाने जगभर ओळखले जाते. त्याचे मूळ स्थान उत्तर अमेरिका असून, ते युरोप खंडातील युरेशिया, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी, क्रोएशिया, बल्गेरिया देशांत प्रामुख्याने आढळते. त्याचा प्रसार दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, तैवान, चीन देशांमध्ये झाला आहे. भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड राज्यांत हे तण आढळते. त्याची नोंद केवळ ईशान्य भारतात झाली होती. उर्वरित भारतात झालेली नव्हती, हे स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबतचा रिसर्च पेपर "बायोसायन्स डिस्कव्हरी' आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केला होता. गेली दोन वर्षे या तणाचे नैसर्गिक पुनरुत्पादन व प्रसाराबाबत अभ्यास करून त्याच्या नोंदी ठेवल्या. हे विषारी तण इतरत्र पसरत असून, त्याची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून आले.'' 

प्रा. जगताप म्हणाले, ""या तणामुळे शेती उत्पादनात घट होते. ते विषारी असल्याने जनावरांच्या, माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्याचे परागकण ऍलर्जी निर्माण करणारे आहेत. परागकण माणसाच्या सान्निध्यात आल्यास नाक व घसा सुजतो. श्‍वसननलिकेस सूज येते व सर्दीचा त्रास होतो. डोळे खाजतात, सुजतात व लाल होतात. त्वचेवर तांबडे पट्टे (रॅशेस) तयार होऊन खाज येते. त्वचेवर गाठी तयार होऊन ताप येतो. दम्याचा व खोकल्याचा त्रास होतो. ऍलर्जीवरील औषधी उपचारांसाठी इटली व फ्रान्समध्ये दरवर्षी दोन दशलक्ष युरो खर्च करावे लागतात.'' 

असे आहे तण... 
- रोपवर्गीय तणाची वाढ 30 ते 90 सेंटिमीटरपर्यंत 
- त्याला उग्र वास असून, त्याच्या फांद्या सरळ किंवा जमिनीवर पसरतात 
- फुले येण्यापूर्वी तण कॉंग्रेस गवतासारखे दिसते 
- फुले लहान, पांढरट, पिवळसर रंगाची 
- एका रोपापासून वर्षभरात तीन हजार बिया तयार 

तण आढळल्यास हे करा... 
- ते त्वरित उपटून जाळून टाका 
- निसर्गमित्रमधील तज्ज्ञांशी संपर्क साधा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com