महाराष्ट्रात पंजाबमधील बनावट खत विक्री करणारी टोळी सक्रिय

निवास चौगले
बुधवार, 30 मे 2018

कोल्हापूर - महाराष्ट्रात विक्रीसाठी परवानगी नसलेली व पिकांसाठी हानिकारक असलेल्या खतांच्या विक्रीचे रॅकेट पश्‍चिम राज्यात कार्यरत झाले आहे. आठवडाभरात कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात ही बाब उघड झाली असून पंजाबच्या एका कंपनीची ही खते कोल्हापूरसह सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात चोरून विकणारी टोळीच सक्रिय झाल्याचे पुढे आले आहे.

कोल्हापूर - महाराष्ट्रात विक्रीसाठी परवानगी नसलेली व पिकांसाठी हानिकारक असलेल्या खतांच्या विक्रीचे रॅकेट पश्‍चिम राज्यात कार्यरत झाले आहे. आठवडाभरात कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात ही बाब उघड झाली असून पंजाबच्या एका कंपनीची ही खते कोल्हापूरसह सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात चोरून विकणारी टोळीच सक्रिय झाल्याचे पुढे आले आहे.

राज्यात एखाद्या परराज्यातील खतकंपनीला खतांची विक्री करायची झाल्यास त्यासाठी कृषी विभागाकडून अधिकृत परवाना घेणे बंधनकारक आहे. हा परवाना देताना संबंधित कंपनीच्या खतांची तपासणी गुणनियंत्रण विभागाकडून करून घेतली जाते. तपासणीत या खतांत पिकांसाठी किंवा फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घातक अशी रसायने आहेत का, हे तपासले जाते. घातक रसायने असलेल्या खतांना विक्रीची परवानगी नाकारली जाते. कोल्हापुरात मात्र पंजाबस्थित मेसर्स गी-पी बायोफर्ट कंपनीने एजंट नेमून कंपनीच्या खतांची बेकायदेशीर विक्री सुरू केली आहे. आपले खत सेंद्रिय असल्याचे कंपनी सांगते. प्रत्यक्षात या खतांत घातक रसायने असल्याचे तपासणीत आढळले आहे.

कंपनीला खत तयार करण्याचा परवाना पंजाबचा आहे; पण विक्रीचा महाराष्ट्रातील परवाना नाही. अशाच पद्धतीच्या पाच ते सहा कंपन्यांनी कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात आपल्या खतांच्या विक्रीचा धडाका सुरू केला आहे. या रसायनांचा पिकांवर तर परिणाम होतोच; पण ते फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही घातक असल्याचे पुढे आले आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कृषी अधीक्षकांना यासंदर्भात चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. 

कृषी उपसंचालक भाग्यश्री फरांदे-पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल (ता. २८) कणेरकरनगर येथे एका घरात छापा टाकून कृषी विभागाने ३५ हजारांचे बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेले खत जप्त केले. हे खत द्राव्य स्वरूपात आहे, ते सेंद्रिय असल्याचा दावा हे खत विक्रीसाठी आणलेल्या व्यक्तीने केला; पण तपासणीत त्यात घातक रसायन असल्याचे उघड झाले. अशा प्रकारे जिल्ह्यात ५० ते ६० एजंटांकडून तर सांगली जिल्ह्यातही तेवढ्या एजंटांमार्फत या खताची राजरोस विक्री सुरू असल्याची माहिती पुढे आली.

कंपनीचे आष्टा हे केंद्र
महाराष्ट्रात विनापरवाना खतविक्री करणाऱ्या या कंपन्यांचे आष्टा हे केंद्र आहे. आज आष्टा येथेही याच कंपनीच्या एका अनाधिकृत खतविक्री करणाऱ्या केंद्रावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून असलेले खत जप्त केले. आष्टा येथून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात या बोगस व घातक खतांचा पुरवठा होत असल्याचे पुढे आले आहे. 

अशा कंपन्यांची माहिती मिळाल्यानंतर कारवाई सुरू केली आहे. कोल्हापुरात एका केंद्रावर काल छापा टाकला. अशा प्रकारची खते, बियाणे शेतकऱ्यांनीही खरेदी करू नयेत, याशिवाय अशा घातक खतांबाबत माहिती मिळाल्यास जिल्हा अधीक्षक कृषी विभागाशी संपर्क साधावा. 
- भाग्यश्री फरांदे-पवार,
कृषी उपसंचालक 

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील पीकस्थिती

  •   पिकाखालील एकूण क्षेत्र- ४ लाख ५ हजार हेक्‍टर
  •   रब्बी हंगामाखालील क्षेत्र- ४२,९९९ हेक्‍टर
  •   खरिपाखालील क्षेत्र - २ लाख ६३ हजार ३५७
  •   लागणारे एकूण खत - १ लाख ५१ हजार टन 
  •   अधिकृत कृषी सेवा केंद्रे- ३२००
Web Title: Kolhapur News raid on bogus fertilizer selling gang