कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४३ टक्केच पावसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

कोल्हापूर - जिल्ह्यात यावर्षी जुलैअखेर वार्षिक सरासरीच्या ४३.६८ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात मात्र सरासरीच्या १०२ टक्के पाऊस झाला आहे. आज दिवसभर मात्र पावसाने विश्रांती घेतली. 

कोल्हापूर - जिल्ह्यात यावर्षी जुलैअखेर वार्षिक सरासरीच्या ४३.६८ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात मात्र सरासरीच्या १०२ टक्के पाऊस झाला आहे. आज दिवसभर मात्र पावसाने विश्रांती घेतली. 

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १७७२.३९ मिलिमीटर पाऊस पडतो. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, आजरा व भुदरगड तालुक्‍यांत सर्वाधिक पावसाची नोंद होते. जुलै महिन्यात वर्षाला सरासरी ७५७.४२ मिलिमीटर पाऊस पडतो. यावर्षी जुलै महिन्यातच ७७४.१९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के हे प्रमाण आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात खऱ्या अर्थाने पावसाने दमदार हजेरी लावली. 

पन्हाळा, शाहूवाडी, कागल व भुदरगड तालुक्‍यांत वार्षिक सरासरीच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र इतर आठ तालुक्‍यांत २१ ते ४४ टक्केच पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गगनबावडा तालुक्‍यात आतापर्यंत केवळ ३४.२८ टक्केच पाऊस झाला आहे.

गगनबावड्यात दरवर्षी सरासरी तब्बल ५६२९ मिलिमीटर पाऊस पडतो. जुलैअखेर या तालुक्‍यात १९३० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यावर्षी शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, कागल, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्‍यांत जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. 

आज शहरासह जिल्ह्यात पावसाची उघडीपच राहिली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी काल (ता. २९) धरणातून प्रती सेकंद २२०० क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत अडीच फुटांनी वाढ होऊन ही पातळी २२.१० इंचावर पोचली. पावसाचा जोर कमी झाल्याने या पातळीत पुन्हा घट झाली असून, सायंकाळी पंचगंगेची पातळी २२.२ फूट होती. 
आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४.६५ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक १९.५० मिलिमीटर पावसाची नोंद गगनबावडा तालुक्‍यात झाली आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यांत २४ तासांत पावसाची नोंद नाही. 
 

तालुकानिहाय पाऊस असा (आकडे मिलिमीटरमध्ये)
पन्हाळा - २.५७  शाहूवाडी - १४.१७  राधानगरी - ४.३३  करवीर - ०.७२ कागल - ०.१४  गडहिंग्लज - ०.१४  भुदरगड - ५  आजरा - ३.७५  चंदगड - ५.५०.

Web Title: kolhapur news rain 43% register