पावसाची दडी अन्‌ पिकांची कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे डौलदार उगवलेले भात, भुईमुग, सोयाबीनसह इतर खरिपातील पिके पाण्याअभावी वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा अंदाज घेऊन ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिकांना रासायनिक खतांचा डोस दिला आहे, त्यांना आता पाणी मिळत नसल्याने त्यांचा जीव कासावीस झाला आहे. 

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ६४ हजार १४९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली. अनेक ठिकाणी चिखलगठ्ठा पद्धतीने भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, मृग नक्षत्रात पावसाने लावलेल्या हजेरीनंतर पेरणी केलेली सर्व पिके डौलदार आणि दमदारपणे उगवली. दरम्यान, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुका वगळता इतर ठिकाणी उगवलेल्या पिकांना पाऊस नसल्याने धोका निर्माण झाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी पिकांमधील आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. 

पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने आता पिकांना वीजपंपाद्वारेच पाणी द्यावे लागणार आहे. पंधरा ते वीस दिवस पावसाने दांडी मारल्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. 

आडसाल ऊसलागण 
२०१७-१८ मध्ये हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा, कागल व करवीर तालुक्‍यामध्ये ४ हजार ६३६ हेक्‍टर आडसाली लागण पूर्ण झाली आहे. आडसालचे ऊसलागणीसह एकूण जिल्ह्यात १ लाख ४३ हजार ९०५ हेक्‍टर क्षेत्रावर ऊसपीक आहे.

Web Title: kolhapur news rain