कोल्हापूर जिल्ह्यात दम‘धार’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - पावसाने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा दमदार हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागात व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने राधानगरी धरण भरून धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे सकाळी उघडले. यातील दोन दरवाजे सायंकाळी सहाच्या सुमारास बंद झाले. 

कोल्हापूर - पावसाने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा दमदार हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागात व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने राधानगरी धरण भरून धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे सकाळी उघडले. यातील दोन दरवाजे सायंकाळी सहाच्या सुमारास बंद झाले. 

दरम्यान, राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीचे पाणी सकाळपर्यंत पात्राबाहेर पडण्याची शक्‍यता आहे. राजाराम बंधारा आज पुन्हा पाण्याखाली गेला. रात्री आठ वाजता पंचगंगेची पातळी २२ फूट सहा इंच होती. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत गगनबावड्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून या तालुक्‍यात १०४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

दोन दिवस पावसाने दडी मारल्यानंतर काल रात्रीपासून पुन्हा पाऊस सुरू झाला. रात्रीपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला तर पावसाने झोडपून काढले आहे. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्‍यांत पावसाचा जोर अधिक आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे यापूर्वीच भरली आहेत. काल काळम्मावाडी धरण भरल्याने धरणाची पाणी पातळी नियमित करण्यासाठी सांडव्यातून पाणी सोडण्यात आले. आज सकाळी राधानगरी धरणही पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे सकाळी उघडले. यावर्षीच्या पावसात पहिल्यांदाच धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे आज उघडले गेले. सायंकाळी सहाच्या सुमारास यातील दोन दरवाजे बंद झाले. तरीही पाच दरवाजांबरोबरच पॉवर हाऊसमधून सुमारे ९ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. 
पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने व राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेचे पाणी मध्यरात्रीनंतर पात्राबाहेर पडण्याची शक्‍यता आहे. जिल्हा प्रशासनाने पंचगंगा काठावरील गावांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. राधानगरीबरोबरच काळम्मावाडी धरणातूनही ४२०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील १३ बंधारे पाण्याखाली गेले असून यामध्ये पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी आणि शिंगणापूर; भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे; कासारी नदीवरील यवलूज; कुंभी नदीवरील शेणवडे आणि दूधगंगा नदीवरील सुळंबी या बंधाऱ्यांचा समावेश आहे.

आज सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २९.८३ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक १०४ मिलिमीटर पावसाची नोंद गगनबावडा तालुक्‍यात झाली आहे. परतीच्या पावसावर अवलंबून असलेल्या शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यातही गेल्या आठवडाभरात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्‍यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. 

पाटगाव बाजारपेठेत शिरलेले पाणी
कडगाव - मुसळधार पावसामुळे पाटगाव बाजारपेठेत वेदगंगा नदीचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पाटगाव व सुक्‍याचीवाडी बंधारा पाण्याखाली गेल्याने गावचा संपर्क तुटला आहे. मौनीसागर जलाशयात ३.७९ टीएमसी साठा झाला असून या धरणाच्या सांडव्यातून १६०० क्‍युसेक आणि वीज निर्मितीसाठी ४०० क्‍युसेक वेगाने असे एकूण २००० क्‍युसेक या वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने वेदगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परिसरात गेल्या २४ तासांत ११३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मौनीसागर जलाशय ३१ ऑगस्टला भरला. धरणात ३.७९ टीएमसी साठा झाला असून ६२६.८५ मीटर पातळी आहे. फये, कोंडूशी व मेघोली प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होतो. प्रकल्प परिसरात आजअखेर सरासरी ४५३० मि.मी. पाऊस झाल्याचे पर्जन्य मापक अंकुश राऊळ यांनी सांगितले. 

दुकानाचे छत कोसळून नुकसान
कडगाव - तांबाळे (ता. भुदरगड) येथे वादळी वाऱ्याने व मुसळधार पावसामुळे सुरेश ईश्‍वरा पाटील यांच्या आर्या कापड दुकानाचे छत कोसळून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. दुकानातील कपडे आणि टीव्ही प्रिंटरसह अन्य वस्तूंचे नुकसान झाले. या परिसरात जोरदार पावसामुळे ओढेनाले भरून वाहत असून या भागातील काही ठिकणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

कुंभी धोक्‍याच्या पातळीवरून
असळज - गगनबावडा तालुक्‍यात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. लखमापूर येथील कुंभी धरणक्षेत्रात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात तब्बल १८५ मिलिमीटर तर आजअखेर ५४२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुंभी धरणाच्या दरवाजातून ९०० क्‍युसेक तर वीजनिर्मितीसाठी ३५० क्‍युसेक असा एकूण १२५० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे कुंभी, धामणी व सरस्वती नद्यांच्या पातळीत वाढ झाली. अणदूर, मांडुकली, सांगशी व कातळी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्‍यातील अणदूर, वेसरफ व कोदे या सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कुंभी नदी धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. 

रताळी काढणीत व्यत्यय
आंबा - परिसराला आज पावसाने झोडपले. निनाई परळे, चांदोली, उदगिरी, आळतूर व विशाळगड भागात दिवसभर पावसाची संततधार होती. पावसामुळे कडवी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. पावसामुळे रताळी काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे अडचणीचे ठरले.

पन्हाळ्यात संततधार 
पन्हाळा - तालुक्‍यात आज दिवसभर पावसाच्या सरीमागून सरी कोसळत होत्या. आज सकाळी ८ पर्यंत पन्हाळ्यात ५५, कोडोली १८, वाडी रत्नागिरी १७, बाजार भोगाव ४१, तर कळे परिसरात २६ मि.मी. पावसाची नोंद झाली तालुक्‍यात सरासरी १०७१ मि.मी. पाऊस झाला आहे.

दृष्टिक्षेपात पाऊस...
 गगनबावड्यात अतिवृष्टी
 पंचगंगा पात्राबाहेर पडण्याची शक्‍यता
 राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली
 धरण क्षेत्रात धुवाँधार पाऊस
 पंचगंगेची पातळी २२ फूट ६ इंच
 १३ बंधारे पाण्याखाली
 गगनबावडा-वैभववाडी मार्गावर धुके
 नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तालुकानिहाय पाऊस असा (आकडे मिमीमध्ये) 
हातकणंगले ८.१२, शिरोळ ७, पन्हाळा २६, शाहूवाडी ३०.६७, 
राधानगरी ३३.८३, गगनबावडा १०४.५०, करवीर १७, कागल १५.५७, 
गडहिंग्लज १६.५७, भुदरगड २६, आजरा ३६.२५ व चंदगड ३५.५० 

‘राधानगरी’चे सात दरवाजे खुले
गगनबावड्यात अतिवृष्टी
पंचगंगेची पातळी वाढली

Web Title: kolhapur news rain