मेघडंबरीत अडकले राजर्षी शाहू समाधीस्थळ 

मेघडंबरीत अडकले राजर्षी शाहू समाधीस्थळ 

कोल्हापूर - आपल्या कारकिर्दीत राजर्षी शाहू समाधीस्थळ काम पूर्ण झाले नाही म्हणून महापौर हसिना फरास यांनी काल अर्धवट बांधकामाजवळ बसून चिंतन केले खरे; मात्र हे बांधकाम अपूर्ण राहण्यात मेघडंबरीची उभारणी खरे कारण ठरले आहे. ही मेघडंबरी ब्रॉंझ धातून ओतवण्यात आणि जोडण्यात येणार आहे आणि या कामाची पूर्तताच आज उद्या अशी होत असल्याने पुढील कामही थांबले आहे. मेघडंबरी बसल्यानंतरच इतर कामे करावी लागणार आहेत. आता हे काम 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करावी लागणार आहेत. 

समाधी स्थळाचे बांधकाम दगडी पायऱ्यांच्या टप्प्याच्या रचनेत केले आहे. वास्तुरचनाकार अभिजित जधव यांनी घडीव दगडाचा वापर करून समाधीस्थळाचा आराखडा तयार केला आहे. एक एक दगड घडवून तो या ठिकाणी रचला गेला आहे. चारही बाजूने दगडी चौथरा, त्यावर चारी बाजूने दगडी पायऱ्या अशी त्याची वेगळी शैली आहे. त्यावर 14 फूट उंचीची गोलाकार मेघडंबरी आहे. ती ब्रॉंझ धातून ओतवण्यात येत आहे. तिचे वजन साधारण तीन टन आहे. आणि ही मेघडंबरीच या स्मृतिस्थळाचा केंद्रबिंदू आहे. 

महापालिकेने या समाधी स्थळाचे बांधकाम मध्येच अर्धवट राहू नये, म्हणून निधीची तरतूद केली आहे. समाधी पर्यटकांसाठीही आकर्षण होणार असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे सतत या कामावर लक्ष राहीले. खुद्द आयुक्‍त अभिजित चौधरी यांनी या कामाचा वास्तुरचनाकार अभिजित जाधव, मेघडंबरीचे शिल्पकार किशोर पुरेकर यांच्याशी बोलून आढावा घेतला. 
हे लक्षवेधी काम आपल्या कारकिर्दीत पूर्ण व्हावे व त्याचा लोकार्पण सोहळा व्हावा, अशी महापौर हसिना फरास यांची इच्छा होती. त्यांनी त्यासाठी सगळी यंत्रणा हलवली; मात्र मेघडंबरीच पूर्ण न झाल्याने समाधी स्थळाचे पुढील इतरही काम थांबले व या समाधी स्थळाच्या लोकापर्ण सोहळ्याची हसिना फरास यांची संधी हुकली. 

मंगळवारी त्यांनी याची खंत व्यक्‍त करत आपला राजीनामा दिला. आपण आपल्या कारकिर्दीत हे काम पूर्ण करू शकलो नाही, याची खंत व्यक्‍त करत त्या डोळे मिटून दहा मिनिटे या समाधीस्थळाजवळ बसल्या. नंतर राजिनामा देण्यासाठी महापालिकेत गेल्या. या त्यांच्या कृतीमुळे समाधीस्थळाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. वर्षांनुवर्षे रखडलेले शाहू जन्मस्थळ भूमीपूजन होऊन चार वर्षे उलटली तरीही शाहू मिलच्या जागेची जैसे थी परिस्थिती हे दोन विषय टिकेचे झाले असताना आता समाधीस्थळही त्याच मार्गाने जाऊ नये, असाच सूर त्यामुळे शहरवासियांतून व्यक्‍त झाला. 

मेघडंबरी तयार करण्याची ऑर्डर दसऱ्याला मला दिली. मेघडंबरी 14 फूट उंच आहे. त्यावर कलाकुसर आहे. हे काम खूप आकर्षक असले तरीही त्याची जोखिमही तेवढीच आहे. त्यामुळे मी काम डोळ्यात तेल घालून करत आहे. कलाकुसलीचे काम, ओतकाम व जोडकाम यात घाई करून चालत नाही. म्हणून मेघडंबरी पूर्ण झालेली नाही. 26 जानेवारीपर्यंत ते काम पूर्ण होईल. 
- किशोर पुरेकर, शिल्पकार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com