शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवा - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

जयसिंगपूर - शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्णायक पाऊल उचलले आहे. १ मे रोजीच्या ग्रामसभेत ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करणारा ठराव करण्याचे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. 

जयसिंगपूर - शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्णायक पाऊल उचलले आहे. १ मे रोजीच्या ग्रामसभेत ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करणारा ठराव करण्याचे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. 

राज्यातील २० हजार ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार करून खासदार शेट्टी यांनी हे आवाहन केले आहे. दरम्यान १ मे पासून सुरू होणाऱ्या ‘मी आत्महत्या करणार नाही..लढणार’ या अभियानातून १ लाख शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून घेऊन त्यांना लढण्याचे बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी खासदार शेट्टी यांनी शेती प्रश्‍नांवर देशपातळीवर चळवळ करणाऱ्या शेतकरी संघटनांना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून एकत्रित केले. समितीतर्फे दिल्लीच्या संसदीय मार्गावर २० व २१ नोव्हेंबर २०१७ रोजी किसान मुक्ती संसद आयोजित केली.

दोन दिवसांच्या चर्चेनंतर संसदेने शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दोन विधेयकांचा मसुदा तयार केला. शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमुक्ती मिळण्याचा अधिकार व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळवून देण्याचा अधिकार विधेयक २०१७ ही दोन विधेयके तयार केली. या दोन्ही मसुद्यांवर देशपातळीवर चर्चा घडवून अनेक नामवंत वकील, समाजसेवक, बुद्धिवादी, शेतकरी नेते यांच्याशी चर्चा विनिमय करून अंतिम मसुदा तयार केला आहे.

२८ मार्चला दिल्लीतील कॉन्टिट्यूशन क्‍लबमध्ये शेतकरी गोलमेज परिषद आयोजित केली. गोलमेज परिषदेला ३२ विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या सर्वांनी एकमुखाने दोन्ही विधेयकांना मान्यता दिली. या विधेयकांना मंजुरी देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची विनंती राष्ट्रपतींना भेटून करण्याचेही ठरले.

संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करणारा ठराव करून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांना पाठविण्याचे आवाहन पत्रात केले आहे. २० हजार पत्रे पाठविण्याची धांदल खासदार शेट्टी यांच्या जयसिंगपूर येथील कार्यालयात सुरू आहे.

धुळे येथील धरमा पाटील यांच्या गावापासून १ मे रोजीच्या ‘मी आत्महत्या करणार नाही...लढणार’ या अभियानाला प्रारंभ होणार आहे. अभियानात १ लाख शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या न करता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर लढण्याचे बळ त्यांना देणार आहे.  
- खासदार राजू शेट्टी

Web Title: Kolhapur News Raje Shetty comment