भाताला १५५० हमीभावासह ५०० रुपये बोनस द्या - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

बांबवडे -  शासनाने भात उत्पादकाला प्रतिक्विंटल १५५० रुपये हमीभावासह ५०० रुपये बोनस द्यावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. बांबवडे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित तिसऱ्या भात परिषदेत ते बोलत होते.

बांबवडे -  शासनाने भात उत्पादकाला प्रतिक्विंटल १५५० रुपये हमीभावासह ५०० रुपये बोनस द्यावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. बांबवडे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित तिसऱ्या भात परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘बाजारपेठ भावनेवर नाही, तर मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालते. सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करून खरेदी केल्यास शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल. जगामध्ये भाताचे उत्पादन यावर्षी २० कोटी टनाने कमी होणार असल्याने देशातील भाताचे उत्पादनातही घटले आहे. 

खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असून, एम.एस.पी.पेक्षा कमी दराने भात खरेदी करणाऱ्या व ताणकाट्याचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. उत्पादन खर्चावर आधारभूत शेती उत्पादनास हमीभाव देऊन आवश्‍यक ठिकाणी भात खरेदी केंद्रे सुरू करावीत. सरकारच्या आयात निर्यातबाबत चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. जर सरकारने सातबारा उतारे कोरे केले नाहीत, तर शेतकऱ्यांची एकजूट करुन सातबारा कोरा केल्याशिवाय सरकारला सोडणार नाही.’’

रविकांत तुपकर म्हणाले, भाजप सरकारसोबत आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर युती केली होती; मात्र भाजप सरकारने याबाबत निराशा केली आहे. प्रा. जालंदर पाटील, राजू गड्यान्नावर, भगवान काटे, सयाजी मोरे , विक्रम पाटील यांची भाषणे झाली. सावकर मादनाईक, शुभांगी शिंदे, ज्येष्ठ नेते जयकुमार कोले, सागर शंभूशेटे, तानाजी साठे, वसंत पाटील उपस्थित होते. वसंत पाटील यांनी स्वागत केले. 

ऊस परिषद २८ ऑक्‍टोबरला 

‘स्वाभिमानी’ची १६वी ऊस परिषद २८ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर येथे होणार असल्याची माहिती श्री. शेट्टी यांनी दिली.