गर्दी अंत्यसंस्काराला नव्हे.. रक्षाविसर्जनाला...!

गर्दी अंत्यसंस्काराला नव्हे.. रक्षाविसर्जनाला...!

कोल्हापूर - अंत्यसंस्कारानंतर रक्षा विसर्जनासाठी ‘चांगला दिवस’ या भावनिक मुद्द्यामुळेच पंचगंगा स्मशानभूमी ‘ओव्हरफ्लो’ होत आहे. अंत्यसंस्कार झाले की जास्तीत जास्त सहा तासांत त्या मृतदेहाची राख होते, अशी कोल्हापुरातील चिता रचनेची पद्धत आहे. आणि जर दुसऱ्या दिवशी लगेच रक्षाविसर्जन विधी झाले, तर स्मशानभूमीत एक-दोनच काय, एका वेळी २० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले तरी अंत्यसंस्कार होऊ शकतील, अशी प्रत्यक्षात परिस्थिती आहे.

स्मशानभूमीत सरासरी रोज नऊ ते दहाच मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कार होतात; मात्र त्यापूर्वी झालेल्या अंत्यसंस्कारानंतर रक्षाविसर्जन झाले नसल्याने जागा अडून राहते व एखाद्या मृतदेहावरील अंत्यसंस्काराला वेटिंग करावे लागते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन हा चांगला मार्ग आहे. पण ‘चांगला दिवस’ असला तरच रक्षाविसर्जन हा मुद्दा भावनिक आहे. आणि या मुद्द्याला हात घालायचा कोणी? हा प्रश्‍न आहे.

साधारण मंगळवार, शुक्रवार, शनिवार, संकष्टी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण, सणाचा दिवस असेल, तर कोल्हापुरात त्या दिवशी रक्षाविसर्जन होत नाही. उदाहरणच घ्यायचे झाले, तर शुक्रवार व शनिवार या सलग दोन दिवशी रक्षाविसर्जन करत नाहीत. 

पुन्हा गुरुवारी अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एखाद्या सणाचा दिवस असला तर सलग तीन दिवस रक्षाविसर्जन हात नाही व त्यानंतर जो रविवार येतो त्या दिवशी रक्षाविसर्जनासाठी प्रचंड गर्दी होते. गर्दी एवढी की कोण कोणाच्या रक्षाविसर्जनासाठी आलंय हेच समजत नाही. त्याच वेळेत आणखी एखादा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला तर त्याची चिता रचायला जागा नसते व स्मशानभूमीत ओव्हरफ्लोची स्थिती निर्माण होते.

अर्थात हा प्रसंग रोज येत नाही. कधी तरी एखाद्या रविवारीच येतो. स्मशानभूमीत एका वेळी ४० मृतदेहावर अंत्यसंस्कार करायची सोय आहे आणि आजपर्यंत एकाच दिवशी चाळीस मृतदेहावर अंत्यसंस्कार अशी वेळ कधीही आलेली नाही. पंचगंगा, बावडा, कदमवाडी, बापट कॅम्प या स्मशानभूमीत चिता रचण्याची पद्धत खूप वैज्ञानिक आहे. खाली १२० किलो लाकूड, त्यावर मृतदेह व त्यावर ४०० ते ५०० शेणी अतिशय व्यवस्थित रचल्या जातात. जेणेकरून दोन शेणीच्यामधून हवा खेळती राहू शकेल. त्या शेणीवर कापूर ठेवून त्यावर जळत्या शेणीचे तुकडे ठेवले जातात व वरून खाली या पद्धतीने चिता पेटत राहते. मध्येच कधीही विझत नाही. वरून मृतदेह जळत येत असताना खालून लाकडाच्या ज्वाला बाहेर पडू लागतात व मृतदेह पूर्ण म्हणजे सहा तासात त्याची राख होते. मृतदेह अर्धाकच्चा जळाला आहे, म्हणून त्यावर रॉकेल ओतले जात आहे, टायरी पेटवून टाकल्या जात आहेत, असे एकदाही स्मशानभूमीत घडलेले नाही. त्यामुळे प्रत्येक मृतदेह सहा तासांत पूर्ण जळतो. पण त्याची राख चांगल्या दिवसाच्या प्रतीक्षेत चार ते पाच दिवस पडून राहते व स्मशानभूमीची जागा मृतदेहामुळे नव्हे तर राखेमुळे व्यापते. आता ४० मृतदेहांवर अंत्यसंस्काराची सोय आहे. त्यात आणखी आठ जादाची सोय केली जाणार आहे.

आजवर कधीही एका दिवशी दहाच्या वर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आलेले नाहीत. (अपवाद करूळ घाटातील अपघात २० ठार) २४ ते ३१ नोव्हेंबर या काळात मात्र रोज दहा मृतदेह म्हणजे आठवड्यात १०० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले. शुक्रवार, शनिवार हे सलग दोन दिवस रक्षाविसर्जन करत नाहीत. त्यामुळे मंगळवार, शुक्रवार, शनिवार या दिवसाचे रक्षाविसर्जन एकदम आले की गर्दी उडते. ही गर्दी अंत्यसंस्कारासाठी नव्हे तर रक्षाविसर्जनाची असते. रक्षाविसर्जन हा भावनिक मुद्दा आहे. त्यामुळे लगेच रक्षा विसर्जन करा, असे महापालिका म्हणू शकत नाही.
- डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, मनपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com