रंकाळा तलाव पुन्हा प्रदूषित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

ब्ल्यू ग्रीन अलगीचा प्रादुर्भाव - पाणी हिरवेगार; प्रदूषणमुक्तीचे प्रयत्न फोल 
कोल्हापूर - शहराचे वैभव असलेला रंकाळा तलाव पुन्हा एकदा प्रदूषणाच्या खाईत सापडला आहे. ब्ल्यू ग्रीन अलगी या वनस्पतीने पाय पसरल्याने पाणी हिरवेगार झाले आहे. गडद हिरव्या रंगामुळे रंकाळ्याचा चेहराच बदलून गेला आहे. प्रदूषण रोखण्यासाठीचे अनेक प्रयोग होऊनही पुन्हा तलाव हिरवागार कसा झाला, असाच प्रश्‍न पडला आहे.

ब्ल्यू ग्रीन अलगीचा प्रादुर्भाव - पाणी हिरवेगार; प्रदूषणमुक्तीचे प्रयत्न फोल 
कोल्हापूर - शहराचे वैभव असलेला रंकाळा तलाव पुन्हा एकदा प्रदूषणाच्या खाईत सापडला आहे. ब्ल्यू ग्रीन अलगी या वनस्पतीने पाय पसरल्याने पाणी हिरवेगार झाले आहे. गडद हिरव्या रंगामुळे रंकाळ्याचा चेहराच बदलून गेला आहे. प्रदूषण रोखण्यासाठीचे अनेक प्रयोग होऊनही पुन्हा तलाव हिरवागार कसा झाला, असाच प्रश्‍न पडला आहे.

क्रशर चौक ते दुधाळीपर्यंत ड्रेनेज लाईन टाकून तलावात मिसळणारे सांडपाणी वळविण्यात आले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाचीही परीक्षा पाहणारे काम तब्बल चार वर्षे चालले. श्‍याम सोसायटीपासून मिसणारे सांडपाणी जमिनीत खोलवर पाईप टाकून दुधाळीकडे वळविण्यात आले. सांडपाण्याचा सर्वात मोठा प्रवाह रोखल्याचा दावा पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागाकडून केला गेला. पावसाळ्यात सांडपाण्यासोबत पावसाचे पाणी वाहून जात असल्याने हे पाणी रोखणे शक्‍य नाही. ते शंभर टक्के सांडपाणी आहे, 

असे म्हणता येणार नाही, असा दावा केला जातो. पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेलेल्या सांडपाण्याचे परिणाम दिसू लागले आहेत. श्‍याम सोसायटीसह, सरनाईक कॉलनी, रंकाळ्याच्या पाठीमागील बाजूने मिसळणारे सांडपाणी याचे स्त्रोत पूर्वीप्रमाणे कायम आहेत. ड्रेनेज लाईनचे इतके मोठे काम झाले. त्याचे उद्‌घाटनही जोरात झाले. मात्र, ‘रिझल्ट’ दिसण्यापेक्षा उलटेच परिणाम दिसू लागले आहेत. 

मुंबईस्थित आयसीटीचे प्राचार्य आणि कोल्हापूरचे सुपुत्र जी. डी. यादव यांनी खाणीतील पाणी स्वच्छ करून दाखविले. महापालिकेचा एक रुपयाही न घेता माजी विद्यार्थी संघटना असलेल्या संस्थेने प्रदूषणाच्या खाईत सापडलेली खाण मुक्त केली. आजही खाणीचे पाणी स्वच्छ आहे. डॉ. यादव यांनी रंकाळ्याचे पाणी पिण्यायोग्य करून दाखवू, असे सांगितले होते. त्यांना येथूनच अपेक्षेप्रमाणे साथ मिळाली नाही.

ब्ल्यू ग्रीन अलगीमुळे पाण्याला उग्र वास येत आहे. कठड्यालगत दाट असा हिरव्या रंगाचा थर साचून राहिला आहे. पावसाळ्यानंतर कडक ऊन पडले की ब्ल्यू ग्रीन अलगीचा प्रादुर्भाव सुरू होतो. त्यामुळे पाणी हिरवेगार झाल्याचा दावा केला जात आहे. महापालिकेकडे इतके तज्ज्ञ अभियंता आणि अधिकाऱ्यांची फौज असताना ज्यांनी ड्रेनेजलाईनच्या कामाचे डिझाईन केले, त्यांनी काम पूर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी घेतली का, तसे असेल तर प्रदूषण का थांबले नाही, साडेचार कोटी पाण्यात गेले का, असा प्रश्‍न पडला आहे.

दृष्टिक्षेपात रंकाळा...
रंकाळा तलाव सुमारे अडीचशे एकरात पसरला आहे.
अजित पवार यांच्यामुळे तलावातील गाळ काढला गेला
श्‍याम सोसायटी, सरनाईक कॉलनीतील सांडपाणी थेट तलावात
ड्रेनेज लाईनसाठी साडेचार कोटींचा खर्च, काम चालले चार वर्षे