गोव्यातील अपहृत तरुणांची सुटका

गोव्यातील अपहृत तरुणांची सुटका

कोल्हापूर - पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या गोव्यातील चार तरुणांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा लावून सुटका केली. कारवाईत अपहरणकर्ते सापडले नाहीत, पण त्यांची नावे, पत्ता व कौटुंबिक माहिती मात्र पोलिसांना मिळाली असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

गोवा येथील राहुल दिलीप धारगळकर (वय २०), त्याचे मित्र सावळो गोवकर, ज्ञानेश्‍वर गोकाकर, मनोज गावकर हे चौघे मोटारीतून शिर्डीला चालले होते. ८ डिसेंबरला ते गोव्याहून निघाले. १० डिसेंबरला राहुल याने एका मोबाईल फोनवरून आपल्या वडिलांना फोन करून २५ लाख रुपये घेऊन या, नाहीतर हे लोक मला मारतील, असे सांगितले. त्यानंतर अनोळखी व्यक्तीनेही राहुल याच्या वडिलांना २५ लाख रुपये द्या, नाहीतर चारही तरुणांना ठार मारण्याची धमकी दिली. यावरून आपल्या मुलासह त्यांच्यासोबत चौघांचेही अपहरण झाल्याचे पुढे आले.
सोमवार (ता. ११) राहुल याचे वडील दिलीप धारगांवकर यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

श्री. मोहिते यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांना तपास करण्याचे आदेश दिले. मोहिते यांनी धारगांवकर यांच्याकडून माहिती ऐकून घेऊन गुन्हा दाखल केला. आज दुपारी पुन्हा दीडच्या सुमारास अपहरणकर्त्यांचा फोन दिलीप यांना आला. खंडणीची रक्कम घेऊन त्यांनी जयसिंगपूर येथे त्यांना बोलवले. त्यानंतर श्री. मोहिते यांनी दोन पथके तयार करून जयसिंगपूर येथे सापळा लावला. त्यानंतर दोन तासांनी संशयितांनी पैसे घेऊन जे. जे. मगदूम कॉलेज येथे बोलवले; पण तेथे कोणीच नव्हते. पुन्हा दीड तासांनी संशयितांनी त्यांना नृसिंहवाडी येथे बोलवले. तोपर्यंत अंधार पडला. दरम्यानच्या मुदतीत अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या संशयितांची माहिती पोलिसांनी काढली. त्यांच्या घराची झडती घेण्याबरोबरच नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलवून चौकशी सुरू केली. तोपर्यंत राहुल हा स्वतःच्या फोनवरून वडीलांना पैसे नेण्यासाठी एकजण येईल, त्याच्याकडे पैसे द्या, असे सांगत होता.

नातेवाइकांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केल्याचे समजताच अपहरणकर्त्यांना पोलिस कारवाईचा संशय आला. तोपर्यंत पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपींचा माग काढण्यास सुरवात केली होती. त्यात त्यांच्याकडे व राहुलकडे असलेल्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचे काम सुरू होते. लोकेशनच्या आधारे या संशयितांचा पाठलागही सुरू केला होता. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी चारही तरुणांना सोडून देऊन पळ काढला.

फिल्मीस्टाईलने अपहरण
राहुलसह चार तरुण शिर्डीला जाताना अपहरणकर्त्यांनी त्यांच्या आडवी मोटार मारून थांबवली. त्यानंतर मागून एक मोटार या तरुणांच्या मोटारीमागे लावली. मागच्या मोटारीतून आलेल्या तरुणांनी राहुल व त्याचे मित्र बसलेल्या मोटारीच्या काचा फोडून त्यांना रिव्हाल्व्हरचा धाक दाखवून त्यांना मोटारीतून उतरवून आपल्या मोटारीत बसवले व धूम ठोकली. एखाद्या फिल्मीस्टाईलने अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांकडील मोटार चोरीची असल्याचा संशय असून, त्या कारच्या चालकाला मारहाण करून ही कार चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. 

९ संशयितांचा सहभाग
अपहरण केलेल्या चारपैकी तीन तरुणांना खोलीत डांबून ठेवले होते, त्यांच्याजवळ तीन संशयित थांबले होते, तर दोन वाहनांत आणखी सहा संशयित फिरत होते, यापैकी एका वाहनात राहुलला बसवले होते. त्यामुळे या प्रकरणात नऊ आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

गुन्हा कागल पोलिसांत 
घटनेबाबत कागल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. आजच्या कारवाईत पोलिस निरीक्षक मोहिते यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम, फौजदार युवराज आठरे, अमोल माळी, राजेंद्र सानप आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com