कोल्हापूरातील प्रादेशिक योजनेतील आरक्षणे उठविली

डॅनियल काळे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - कोल्हापूर, इचलकरंजी प्रादेशिक योजनेत शहरालगतच्या मोक्‍याच्या शेकडो एकर जागेवरील प्रादेशिक उद्यानांची (नो डेव्हलपमेंट झोन) आरक्षणे उठवून, या जागा रहिवास व औद्योगिक पट्ट्यात समाविष्ट केल्या आहेत.

कोल्हापूर - कोल्हापूर, इचलकरंजी प्रादेशिक योजनेत शहरालगतच्या मोक्‍याच्या शेकडो एकर जागेवरील प्रादेशिक उद्यानांची (नो डेव्हलपमेंट झोन) आरक्षणे उठवून, या जागा रहिवास व औद्योगिक पट्ट्यात समाविष्ट केल्या आहेत.

याउलट प्रादेशिक उद्यानाचे क्षेत्र वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर प्रादेशिक उद्यानांची आरक्षणे टाकून, त्यांच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही योजना जिल्ह्याच्या विकासाची आहे की बड्या धेंडांच्या विकासाची? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनाचा विचार प्रादेशिक आराखड्यात केला जातो. १९७८ च्या मंजूर कोल्हापूर, इचलकरंजी योजनेमध्ये प्रादेशिक उद्यानासाठी जवळपास २२० चौरस किलोमीटर इतके क्षेत्र हातकणंगले, (तमदलगे, मजले, आळते, तासगाव) पन्हाळा, (सादळे, मादळे, मनपाडळे, गिरोली, जोतिबा, आंबवडे, पन्हाळा, जाखले), करवीर दक्षिण बाजू, (कंदलगाव, गिरगाव, कळंबा, नंदवाळ, कणेरी, नेर्ली) येथे प्रस्तावित केले होते. या प्रादेशिक उद्यानाचे उद्दिष्ट असफल झाल्यामुळे ते (रिजनल पार्क) या तीन तालुक्‍यांतील फक्त डोंगरी व डोंगरी पड जमिनीवर आरक्षित ठेवावे. त्यामुळे मागच्या योजनेतील ७५ टक्के आरक्षणे उठवून हा विभाग औद्योगिक आणि रहिवास विभागात समाविष्ट करण्याचा निर्णय नव्या प्रादेशिक योजनेत केला आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी कोल्हापूर आणि इचलकंरजी प्रादेशिक योजना तयार केल्याचा दावा प्रशासनाने आणि सरकारने केला असला; तरी ही जिल्ह्याच्या विकासासाठीची योजना होती की मागील प्रादेशिक आराखड्यात आरक्षणे पडलेल्या जमिनी सोडविण्याची योजना होती, असा प्रश्‍न पडतो. ही आरक्षणे कमी करून या प्रादेशिक उद्यानांचे क्षेत्र विस्तारल्याचा दावा करत प्रशासनाने शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा या भागात टाकली आहेत; त्यामुळे या परिसरातील गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षणात अडकवून त्यांच्या विकासापेक्षा त्यांच्या अधोगतीसच हा आराखडा कारण बनणार असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांनी हरकती, सूचना केल्या होत्या; पण या हरकती, सूचनांना केराची टोपली दाखविल्याचे बोलले जात आहे.

नव्या योजनेत प्रस्तावित प्रादेशिक उद्यान क्षेत्र (आकडे चौरस किलोमीटरमध्ये)
करवीर (३२.२७ )
हातकणंगले (१२.९७) 
शिरोळ (२.८६)
पन्हाळा (११३.१७)
शाहूवाडी (२८२.३४)
गगनबावडा (७४.४७)
भुदरगड (९२.२५)
आजरा (२८.३१)
चंदगड (८८.३१)
गडहिंग्लज (१३.१२)
राधानगरी (१७५.४४)
कागल (२७.१४)

एकूण प्रादेशिक उद्यान क्षेत्र ९४७.६७ चौरस किलोमीटर

Web Title: Kolhapur News Reservations in the Regional Plan changed