रिंगरोडवरील पाण्याची टाकी त्वरित सुरू करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

कोल्हापूर - उद्‌घाटनापासून बंद असलेल्या फुलेवाडी रिंगरोडवरील पाण्याच्या टाकीचे पूजन करून शिवसेनेने आज अनोखे आंदोलन केले. हलगीच्या कडकडाटात आणि जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात झालेल्या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी जल अभियंत्यांना टाकी बंद असल्याबाबत जाब विचारला. आंदोलनस्थळी उपस्थित असलेले जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी पाण्याची टाकी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन दिले.

फुलेवाडी रिंगरोडवरील गंधर्व नगरीजवळ पाण्याची टाकी बांधून सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या भागातील पाण्याचा प्रश्‍न निकाली निघावा म्हणून सोसायटीने त्यांना बगीच्याची जागा दिली. तेथे लाखो रुपये खर्चून पाण्याची टाकी उभारली; मात्र टाकी आजपर्यंत बंदच आहे. पाण्याच्या टाकीचा वापर झालाच पाहिजे, या मागणीसाठी आज हे शिवसेनेने आंदोलन केले.

परिसरातील महिला डोक्‍यावर कलश घेऊन नेत्यांसह टाकीजवळ आल्या. पोलिस बंदोबस्तात सुरू असलेल्या आंदोलनात हलगीचा कडकडाट असल्यामुळेही ते अधिक प्रभावी ठरले. महिलांनी पाण्याच्या टाकीचे पूजन करून अभिनव आंदोलन केले. 

सध्या या टाकीत पाणी असून तिचा उपयोग होत नाही. काही मुले टाकीवर जाऊन खेळतात.’’ तेथे दरवाजा लावण्यात आला असला तरीही मुलांचे खेळणे धोकादायक असल्याचे महिलांनी जल अभियंत्यांना सांगितले.

यावेळी श्री. पवार यांनी जल अभियंत्यांना धारेवर धरत तातडीने या टाकीचा उपयोग झाला पाहिजे, बंद ठेवणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असा आग्रह धरला. अखेर पाण्याची टाकी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन जल अभियंता कुलकर्णी यांनी दिले. आंदोलक आक्रमक होत असल्यामुळे करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव स्वतः उपस्थित होते.

आंदोलनात शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, राजू हुंबे, हर्षल सुर्वे, दिलीप जाधव, धनाजी यादव, दिलीप देसाई, विकास ओतारी, सुनीता उत्तुरे, शारदा कुंभार, शांता नायर, गीता पाटील, जया कुंभार, कल्पना देसाई, विद्या शिंगे, कमलाकर जगदाळे, राजू यादव, विनोद खोत, कृष्णात पोवार, रणजित आयरेकर, योगेश शिंदे, साताप्पा शिंगे, शुभांगी पोवार, रिया पाटील, सुजाता सोहनी, नीता साळोखे, तसेच प्रतीक साळोखे आदींचा सहभाग होता.

७ वर्षे पडून...
गेल्या सात वर्षांपासून ही टाकी वापराविना पडून आहे. या टाकीची क्षमता २० लाख लिटर आहे. त्यामुळे उपनगराची तहान भागली असती; पण केवळ प्रशासनाच्या अक्षम्‍य दुर्लक्षामुळे टाकी पडून असल्‍याचे शिवसेनेचे दक्षिण विधानसभा संघटक अवधूत साळोखे यांनी सांगितले.