जिल्ह्यातील २२५ रस्ते अद्याप डांबराविनाच 

विकास कांबळे
शनिवार, 29 जुलै 2017

कोल्हापूर - स्वातंत्र्य मिळून देशाला ७० वर्षे झाली तरी जिल्ह्यातील सुमारे सव्वादोनशे रस्त्यांनी अजूनही डांबर पाहिलेले नाही. जिल्ह्यातील ६१३ किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून आराखडा तयार केला आहे. त्यासाठी दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

कोल्हापूर - स्वातंत्र्य मिळून देशाला ७० वर्षे झाली तरी जिल्ह्यातील सुमारे सव्वादोनशे रस्त्यांनी अजूनही डांबर पाहिलेले नाही. जिल्ह्यातील ६१३ किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून आराखडा तयार केला आहे. त्यासाठी दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सधन जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्याच्या विकासात शासनापेक्षा सहकार चळवळीचे योगदान खूप मोठे आहे. असे असले तरी या जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता जवळपास निम्मे तालुके दुर्गम व डोंगराळ आहेत. त्यामुळे या भागात कमी लोकसंख्या म्हणजे मतदान कमी असल्यामुळे शासकीय यंत्रणा किंवा लोकप्रतिनिधींचे देखील फारसे लक्ष जात नसल्याने या भागातील गावांच्या विकासाची गती खूप कमी आहे. केंद्र सरकारने १५ वर्षांपूर्वी पंतप्रधान सडक योजना सुरू केली. या योजनेतून वाड्या-वस्त्या मुख्य रस्त्यांशी जोडण्याचा उपक्रम हाती घेतला. 

या योजनेतही लोकप्रतिनिधींनी काही चांगली गावे घुसडली; मात्र काही गावांमध्ये कधी वाहन जाताना दिसत नव्हते, त्या गावात या योजनेतून रस्ते झाल्यामुळे एसटीची सोय उपलब्ध झाली. अजूनही जिल्ह्याच्या काही गावांमध्ये लाईटची व्यवस्था नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. मुख्य रस्त्यापासून सात ते आठ किलोमीटर आत वाड्या-वस्त्या आहेत. तेथून लोकांना चालतच यावे लागते. त्याठिकाणी रस्त्यांची सोय नाही. मळलेल्या वाटेवरूनच त्यांना यावे लागते. अशा रस्त्यांची संख्या साधारणपणे सव्वादोनशेच्या घरात आहे, असे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांचा आराखडा तयार करत असताना बांधकाम विभागाने आजपर्यंत एकदाही डांबर न पडलेल्या रस्त्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यांनी तालुक्‍यातील संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. त्यानुसार प्रत्येक गावनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात वरील रस्त्यांची माहिती पुढे आली. राधानगरी व शाहूवाडी तालुक्‍यातील सर्वात अधिक रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते. गगनबावडा, कागल, हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्‍यांतील संपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे.

तालुकानिहाय 
रस्त्यांची लांबी (किलोमीटरमध्ये)
भुदरगड  ३७
राधानगरी १९१
करवीर २१
पन्हाळा ११
शिरोळ २७.५०
शाहूवाडी २००
चंदगड ४७
आजरा ३९
गडहिंग्लज ४०

Web Title: kolhapur news road