आयआरबीने केलेल्या रस्त्यांची कोल्हापूरात ‘वाट’

डॅनियल काळे
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

. ना महापालिकेकडे पैसे आहेत, ना शासनाने एक दमडी दिली. त्यामुळे ‘आयआरबी’ने बनविलेले सिमेंट काँक्रिटचे आणि डांबराचेही रस्ते आता खड्ड्यांनी भरले आहेत. या रस्त्यावरूनच नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. रस्त्यावर रात्री पथदीप नाहीत. फूटपाथ निघून गेले. चेंबरची झाकणेही गायब आहेत. अशी दयनीय अवस्था रस्त्यांची आहे.

कोल्हापूर - शहरात प्रवेश करणारे १३ प्रमुख रस्ते बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वातून बांधले. कोल्हापूरकरांनी टोलला टोला दिल्याने ‘आयआरबी’ कंपनीला येथून गाशा गुंडाळावा लागला. सरकारने ‘आयआरबी’चे पैसे भागविले; पण शहरातल्या प्रमुख ४९ किलोमीटरच्या रस्त्यांच्या देखभालीला मात्र कवडीही मिळाली नाही. ना महापालिकेकडे पैसे आहेत, ना शासनाने एक दमडी दिली. त्यामुळे ‘आयआरबी’ने बनविलेले सिमेंट काँक्रिटचे आणि डांबराचेही रस्ते आता खड्ड्यांनी भरले आहेत. या रस्त्यावरूनच नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. रस्त्यावर रात्री पथदीप नाहीत. फूटपाथ निघून गेले. चेंबरची झाकणेही गायब आहेत. अशी दयनीय अवस्था रस्त्यांची आहे.

२००५ मध्ये मोठा पाऊस झाला. या पावसात रस्ते धुऊन गेले. शहरात खड्डेच खड्डे झाले. कोल्हापूर की खड्डेपूर, अशी विचारणा होऊ लागली. नेमक्‍या याचा फायदा उठवून शहरातील ४९ किलोमीटरचे रस्ते बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वातून बांधण्याचा ठराव महापालिकेत मंजूर झाला. ठरावासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. यात नगरसेवकांची बदनामी झाली; पण या ठरावानुसार कामाचा ठेका ‘आयआरबी’ कंपनीला दिला. २००९ मध्ये ‘आयआरबी’ने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. 
सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला असणाऱ्या विरोधाकडे दुर्लक्ष केले. हळूहळू रस्त्यावरून संघर्ष पेटतच गेला. रस्ते आयआरबी कंपनीने कसेबसे पूर्ण केले. टोल सुरू झाला; पण कोल्हापूरकरांनी आंदोलनातून अखेर टोलला हद्दपार करण्यात यश मिळविले.

टोलचे सुमारे ४५० कोटी रुपये राज्य शासनाने दिले; पण कोल्हापूरकरांचे मूळ दुखणे मात्र संपले नाही. रस्त्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर बनत चालला आहे. टोल बंद होऊनही दोन वर्षे झाली. ‘आयआरबी’ने बनविलेल्या काही रस्त्यांना सात, सहा, पाच वर्षे पूर्ण झाली. या रस्त्यांच्या देखभालीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वैशिष्ट्य म्हणजे महापालिकेने या रस्त्यांच्या देखभालीसाठी एक पैसाही खर्च केलेला नाही.

ताराराणी चौकातच खड्डे
तावडे हॉटेल येथून प्रवेश केल्यानंतर ताराराणी चौक हे शहराचे नाक आहे; पण याच चौकात काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून पाणी वाहते. त्यामुळे येथील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला. या रस्त्याने सहा-सात वर्षांत डांबर पाहिलेले नाही.

पुईखडीजवळचा डांबरी रस्ताच गेला
साने गुरुजी वसाहत ते पुईखडी जाणारा रस्ता अर्धा सिमेंटचा आणि अर्धा डांबराचा केला. यापैकी डांबराचा रस्ता कधीच वाहून गेला. एखाद्या खेडेगावात असतो तसा आता मुरूम-मातीचा रस्ता येथे शिल्लक आहे.

दाभोळकर चौक ते ताराराणी चौक
दाभोळकर चौक ते ताराराणी चौक या रस्त्यावरही अडथळ्यांची शर्यत करावी लागते. दुचाकी वाहने अनेकदा पादचारी पूल ते टुरिस्ट हॉटेल या रस्त्याच्या दरम्यान स्लीप होतात. हा मोठा वर्दळीचा रस्ता आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे.

पेव्हर ब्लॉक गेले, दिवे बंदच
‘आयआरबी’च्या रस्त्याप्रमाणे फुटपाथची अवस्था दयनीय आहे. पेव्हर ब्लॉक केव्हाच गेले, चेंबरवरची झाकणे गायब आहेत. स्ट्रॉम वॉटर ड्रेन म्हणजे पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारेही कधीच बुजली. त्यामुळे पाणी गटारीऐवजी रस्त्यावरच वाहते; तर ‘आयआरबी’ने केलेल्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते.