गडहिंग्लजला काळभैरी मंदिरात चोरी, चांदीची तलवार, राजदंडही पळविला 

गडहिंग्लजला काळभैरी मंदिरात चोरी, चांदीची तलवार, राजदंडही पळविला 

गडहिंग्लज - गडहिंग्लजचे ग्रामदैवत आणि महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री काळभैरी देवाच्या मंदिरात गुरूवारी (ता. 22) मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली. यामध्ये श्री काळभैरवाची चांदीची तलवार, राजदंड, चांदीचा त्रिशूल, छडी चोरट्यांनी पळविली आहे. चार ते पाच किलो चांदीचे व सोन्याचे मणिमंगळसूत्रही लांबविले आहे. दीड लाखाहून अधिक किमतीचा हा ऐवज अज्ञातांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

गडहिंग्लज शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर कपारीत श्री काळभैरी देवाचे मंदिर आहे. मंदिराचे पुजारी संजय गुरव आज पहाटे साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात गेले. त्यावेळी त्यांना मंदिराच्या दरवाजाचा कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. त्यांना संशय आल्याने मंदिराच्या गाभाऱ्यात जावून पाहताच चोरीचा प्रकार लक्षात आला. मूर्तीच्या मागे असलेली नक्षीदार चांदीची दोन ते तीन किलोची प्रभावळ, 200 ग्रॅमची काळभैरव देवाच्या हातातील चांदची तलवार, जोगेश्‍वरी देवीच्या गळ्यातील चांदीच्या साखळीतील दोन सोन्याच्या वाट्या, चार मणी, काळभैरवाच्या हातातील 400 ग्रॅमचा चांदीचा त्रिशूल, काळभैरी देवाचा 600 ग्रॅमचा राजदंड, चांदीची छडी गाभाऱ्यातून चोरट्यांनी गायब केली आहे. मुख्य मंदिरासमोरील दोन दानपेट्याही पळवून नेवून चोरट्यांनी डोंगरावर टाकल्या आहेत. कुलूप तोडण्यासाठी वापरलेले स्क्रू ड्रायव्हर व इतर साहित्यही तेथेच टाकले आहे. रात्री दीड ते पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मंदिरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये तिघे चोरटे कैद झाले असून ते सर्वजण तरूण असून तोंडाला कापड बांधलेले होते. काळे जॅकेट व हातमोजे घातलेले हे तरूण कर्नाटकातील असावेत, असा संशय पोलिसांचा आहे. तीनपैकी दोघेजण मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश करून चोरी केली. मूर्तीमागील प्रभावळ मोठी आहे. यातील निम्मीच चांदी काढण्यात चोरट्यांना यश आले. निम्मी प्रभावळ तशीच आहे. चोरट्यापैकी एकजण हातात कोयता घेवून मंदिर परिसरात कोणी येते का, हे पाहण्यासाठी गस्त घालत होता. 

श्‍वानपथकाकडून माग...
या चोरीच्या घटनेत श्‍वानपथकाला पाचारण केले होते. चोरट्यांनी चादर, कोयता, स्क्रू ड्रायव्हर घटनास्थळी टाकून गेले होते. या सर्व वस्तूंचा वास श्‍वानाला देण्यात आला. त्यानंतर हे श्‍वान मंदिरामागील पायऱ्यांवरून जात गडहिंग्लज-कोल्हापूर मार्गावरील हडलगे गावच्या फाट्याजवळ घुटमळले. म्हणजेच या रोडने वाहनाद्वारे चोरटे कर्नाटकात पसार झाल्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com