एका तासात शिकाऊ; तीन दिवसांत पक्का वाहन परवाना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

आरटीओ कार्यालयाचे पाऊल; २० पासून सुरवात

कोल्हापूर - प्रादेशिक कार्यालयात (आरटीओ) आता कराड पॅटर्न राबविण्यात येणार आहे. एका तासात उमेदवाराला शिकाऊ, तर तीन दिवसांत पक्का वाहन परवाना दिला जाणार आहे. प्रतिमा उंचविण्यासाठी कार्यालयाने एक पाऊल पुढे टाकून हा प्रयत्न केला आहे. याची सुरवात २० जुलैपासून केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी पत्रकारांना सांगितले. 

आरटीओ कार्यालयाचे पाऊल; २० पासून सुरवात

कोल्हापूर - प्रादेशिक कार्यालयात (आरटीओ) आता कराड पॅटर्न राबविण्यात येणार आहे. एका तासात उमेदवाराला शिकाऊ, तर तीन दिवसांत पक्का वाहन परवाना दिला जाणार आहे. प्रतिमा उंचविण्यासाठी कार्यालयाने एक पाऊल पुढे टाकून हा प्रयत्न केला आहे. याची सुरवात २० जुलैपासून केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी पत्रकारांना सांगितले. 

आरटीओ कार्यालयात परवाना काढण्यासाठी जायचे म्हटले, तर भल्या भल्यांच्या अंगावर काटा येतो. कागदपत्रे दाखविणे, ती तपासून घेणे, परीक्षा शुल्क भरणे, त्यानंतर नंबर आला, तर परीक्षा देणे अशा दिव्यातून जाण्यासाठी त्यांना एक-दोन दिवस घालवावे लागत होते. त्यामुळे श्रम, वेळ आणि पैशाचा अपव्यय होत होता. मुलांचा वाहन परवाना काढण्यासाठी तर पालक थेट ऑफिसला सुटी टाकूनच कार्यालयात आजही येतात. आयुष्यभर वापरण्यात येणारा हा परवाना काढण्यासाठी काय कसरत करावी लागली, याचे कटू अनुभव उमेदवार अनुभवतो. त्यामुळे आरटीओ कार्यालयाची प्रतिमा मलिन होऊ लागली. ती सुधारण्यासाठी कराड आरटीओ कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबविण्यात आला. यात उमेदवाराला केवळ एक तासात शिकाऊ वाहन परवाना देण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कोल्हापूर विभागात अंमलबवाजणी करण्याचा निर्णय डॉ. डी. टी. पवार यांनी घेतला. त्याची सुरवात कोल्हापूर कार्यालयातून २० जुलैपासून होणार आहे. 

शिकाऊ परवान्यासाठी अपॉईंटमेट घेऊन उमेदवार कार्यालयात आल्यानंतर अवघ्या एका तासात त्याची कागदपत्रे तपासणे, ती स्कॅनिंग करून घेणे, पैसे भरण्यापासून परीक्षा घेण्यापर्यंतचे काम अवघ्या ३५ ते ४० मिनिटात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटात उमेदवारांच्या हातात शिकाऊ परवाना देण्याचा निर्धार कार्यालयाने केला आहे. त्याचबरोबर पक्का वाहन परवाना देताना कागदपत्रे तपासणे, वाहन चाचणी घेऊन पात्र उमेदवारांचा परवाना तिसऱ्या दिवशी पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. आरटीओ कार्यालयाने घेतलेल्या या पुढाकाराने उमेदवारांचा वेळ, श्रम आणि पैशाची बचत होणार आहे.  

अपॉईंटमेंटचीच अडचण...
शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागते. ती अपॉईंटमेंट उमेदवारांना सध्या दोन महिन्यांनंतरची मिळत आहे. एका तासात शिकाऊ आणि तीन दिवसांत पक्का वाहन परवाना दिला जाणार असला तरी अपॉईंटमेंटसाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा उमेदवारांना करावी लागणार आहे. याबाबत आरटीओ कार्यालयाने मार्ग काढून उमेदवारांची डोकेदुखी कमी करावी, अशी मागणी होत आहे.