१७ लाख कार्यकर्ते जोडणार - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - ‘रयत क्रांती संघटनेत प्रत्येक तालुक्‍यातील पाच हजार याप्रमाणे राज्यात १७ लाख कार्यकर्त्यांचे जाळे जोडणार,’ अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सुरेशदादा पाटील यांची; तर युवा आघाडीचे प्रमुख म्हणून पुण्याच्या शार्दूल जाधवर यांची निवड केल्याची घोषणाही त्यांनी केली. 

कोल्हापूर - ‘रयत क्रांती संघटनेत प्रत्येक तालुक्‍यातील पाच हजार याप्रमाणे राज्यात १७ लाख कार्यकर्त्यांचे जाळे जोडणार,’ अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सुरेशदादा पाटील यांची; तर युवा आघाडीचे प्रमुख म्हणून पुण्याच्या शार्दूल जाधवर यांची निवड केल्याची घोषणाही त्यांनी केली. 

‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी केल्यानंतर श्री. खोत यांनी रयत क्रांती संघटना या नव्या संघटनेची घोषणा मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक सभागृहात केली. श्री. खोत यांच्या हस्ते संघटनेच्या लोगोचे अनावरण झाले. त्यांनी संघटनेची ध्येय, धोरणे व मसुदा काय असेल याचीही माहिती दिली. 

या संघटनेत कोणाचीही चौकशी होणार नाही, कोणालाही काढून टाकले जाणार नाही, असे सांगून श्री. खोत म्हणाले, ‘‘संघटनेचे सभासद होण्यासाठी वेबसाइट तयार केली जाईल. या वेबसाइटवर कार्यकर्त्यांची मोफत नोंदणी केली जाईल. प्रत्येक तालुक्‍यात पाच हजार याप्रमाणे राज्यातील ३५३ तालुक्‍यांतून १७ लाख कार्यकर्त्यांचे जाळे विणणार आहे. सहा महिन्यांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे.’’
ते म्हणाले, ‘‘संघटनेत कायदा, तंत्रज्ञान, महिला, विद्यार्थी, प्रक्रिया, लघुउद्योग, वैद्यकीय-अभियंता, सहकार अशा आघाड्या स्थापन केल्या जातील. प्रत्येक तालुक्‍यासाठी एक संपर्कप्रमुख असेल. प्रदेशाध्यक्ष व युवा आघाडीचे प्रमुख प्रत्येक जिल्ह्यात जातील, कार्यकर्त्यांचा अभ्यास करतील आणि स्थानिक पातळीवरील नियुक्‍त्या त्यांच्याकडून केल्या जातील. कार्यकर्ता हेच आपले दैवत असेल. मी ३० वर्षे संघटनेत काम केलेला माणूस आहे, कोणाला वाटत असेल, की माझ्यामागून कोण येणार आहे, तर अशा टीकाकारांनाही ही संघटना कार्यकर्त्यांचे जाळे विणून चोख उत्तर देईल.’’

ते म्हणाले, ‘३० वर्षे मी तुमच्यासोबत राहिलो आणि मी हाक दिल्यावर तुम्हीही धावून आलात. मी एकटा नाही हे तुम्ही दाखवून दिले. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मंत्री म्हणून जरूर मर्यादा असतील; पण शेतकऱ्यांप्रति असलेली जाण मी विसरणार नाही. आता मुंबईसह रायगड व पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईत घेऊ. या मेळाव्याला किमान पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्यांच्यासाठी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस पाठवण्याची गरज मला पडणार नाही.’’

मातोश्रींच्या हस्ते लावला बिल्ला
‘स्वाभिमानी’तून श्री. खोत यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी आपल्या छातीवरचा ‘स्वाभिमानी’चा बिल्लाही काढून टाकला होता. आज त्यांनी स्वतःची संघटना स्थापन केली. रयत क्रांती संघटनेचा बिल्ला त्यांनी मातोश्री श्रीमती रत्नाबाई खोत यांच्या हस्ते  छातीवर लावून घेतला. या वेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.