रयत संघटना अकोला, वाशिम निवडणूक लढणार - सदाभाऊ खोत

रयत संघटना अकोला, वाशिम निवडणूक लढणार - सदाभाऊ खोत

पन्हाळा - रयत संघटनेला कमकुवत करण्याचा, संघटना फोडण्याचा, कार्यकर्त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न काही बाजार बुजगावण्यांकडून होत आहे. पण येत्या अकोला, वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रयत संघटना चुणुक दाखवून देईल, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

 रयत संघटनेच्या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबीराचा समारोप आज झाला. त्यामध्ये ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले, संघटनेत व्यक्‍ती महत्वाची नाही, तर त्याचा विचार महत्वाचा असतो, सत्तेच्या दिशेने जाताना विचार गुलाम बनतो, कोणी ही गुलामगिरीची भाषा वापरत असेल तर त्या संघटनेत राहायचे की नाही हे ज्याचे त्यांने ठरवायचे असते. सूड भावनेतून झालेले संघटन हे त्यांच्याच आगीत भस्मसात होत असते. असे सांगून राजू शेटटींचे नाव न घेता खोत म्हणाले की आमच्यावर फेकलेल्या वीटेचा प्रतिकार आम्ही दगडांनी करणार नाही तर तो ह्रदपरिवर्तनातून करणा आहोत. आम्हाला समाज मंदिर बनवून सर्वसमान्यांच्या प्रश्‍नांना न्याय दयावयाचा आहे. 

संघटनेची लढाई ही बौध्दिकतेवर असल्याने लगेच आम्ही एवढ्या जागा लढवणार, तेवढया लढवणार असे सांगत फिरू नका. आपण आपले अंथरूण पाहून पाय पसरायचे आहेत, मी सत्तेत जरी असलो तरी सरकारच्या सगळयाच गोष्टी मला पटतात असे नाही. काही गोष्टी आपणाला स्पष्टपणे बोलता येत नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या विषयावर स्वतंत्र शिबीर घेवू या, आमदारकी, खासदारकीची स्वप्ने पाहण्याअगोदर स्वतचे आत्मपरिक्षण करा, आता आपण पेरणी करतोय, त्यातून शिवार फुलू दया मग राजकारणाकडे गांभिर्याने पाहू या. 

- सदाभाऊ खोत

शेतकरी आत्महत्येविषयी बोलताना खोत म्हणाले की या आत्महत्या थांबवायला काही मार्ग आहेत, त्यावर संघटनेला राजकारण करायचे नाही तर या शेतकऱ्यांना सन्मानाने लढायला शिकवायचे आहे. त्याला कर्जाची भीती नाही वाटली पाहिजे, माझ्यावर जरी कर्ज असले तरी ते मी योग्य वेळी फेडीन असा त्याच्यात आत्मविश्‍वास निर्माण करावयाचा आहे आणि यामध्ये कोणी आले तर मी त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही अशी त्याची मानसिकता बनवली पाहिजे.

या शिबीरात प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, प्रदेश युवाअध्यक्ष शार्दुल जाधवर, राज्य प्रवक्‍ते अच्युतराव गंगणे, आदींनी मार्गदर्शन केले. या शिबीरासाठी राज्यभरातून 350 कार्यकर्त्यानी हजेरी लावली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com