समीर गायकवाडची आज कारागृहातून सुटका शक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते ऍड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित समीर गायकवाडला शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याला उद्या (ता. 19) कारागृहाबाहेर आणू, असे त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

जिल्हा सत्र न्यायालयाने समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर केला. अटीनुसार दोन जामीनदारांचे उतारे काल मिळू शकले नाहीत. आज रविवार सुटी असल्याने याची पूर्तता आजही होऊ शकलेली नाही. सोमवारी (ता. 19) हे उतारे काढून बॉंड न्यायालयात सादर केला जाईल. त्यानंतर न्यायालयाकडून मुक्ततेबाबतचा आदेश प्राप्त करून तो कारागृह प्रशासनाला सादर केला जाईल. दुपारपर्यंत कळंबा कारागृहातून समीर बाहेर येईल, असे ऍड. पटवर्धन यांनी सांगितले. 

जामिनासाठी घालण्यात आलेल्या अटींमध्ये समीरने आपला पत्ता तपास यंत्रणेला द्यायचा आहे. त्याच्याकडील मतदान ओळखपत्र आणि आधारकार्ड हे एसआयटीने यापूर्वीच जप्त केले आहे. हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. तसेच समीरकडे फक्त आता रेशनकार्डच आहे. त्याची प्रत तपास यंत्रणेला आणि न्यायालयात आम्ही सादर करणार असल्याचे ऍड. पटवर्धन यांनी सांगितले. समीरला कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र दर रविवारी एसआयटीमध्ये हजेरी देण्यास यावे लागणार आहे. समीर उद्या कारागृहातून सुटणार असल्याने यावेळी तेथेही पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला जाण्याची शक्‍यता आहे.