यापुढे यात्रा-आंदोलनाची दुकाने कायमची बंद : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

बाहुबली सिनेमा मी पाहिला नाही. मात्र मी त्यातल्या कटाप्पाला ओळखतो. पुढच्या काळात त्यो इकडंच यायला टपलाय. मुख्यमंत्रीसाहेब त्याला इकडे घेण्याआधी दहा वेळा विचार करा. त्याला घेतले तर तो कुणाचा कधी घात करेल हे समजणार नाही. कारण ते ज्या पक्षात राहतात त्या पक्षाचे काम करायचे त्यांना सवय नाही.

- सदाभाऊ खोत

इस्लामपूर : ''जलयुक्त शिवार'सारख्या योजनांमुळे अनेकांची यापुढे अनेकांच्या यात्रा आणि आंदोलनाची दुकाने बंद पडणार आहेत. शेतकऱ्यांना विसरले म्हणूच विरोधक घरी बसले. तुम्ही पंधरा वर्षात केलेला गाळ आम्ही उपसत आहोत. मात्र लक्षात ठेवा तुमच्या पंधरा वर्षाच्या काळाच्या तुलनेत गेल्या अडीच वर्षात आमच्या सरकारच्या कामाचा लेखाजोखा एका व्यासपीठावर येऊन मांडायची माझी तयारी आहे', असे आव्हान देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) विरोधकांना लक्ष्य केले.

राज्य सरकारचे मित्रपक्ष असलेल्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नामोल्लेख टाळत आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आंदोलनाला लक्ष्य केले.

येथील यल्लमा चौकात दुपारी साडेतीन वाजता भर उन्हात झालेल्या जाहीर सभेसाठी तालुक्‍यातून मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नियोजित पक्षप्रवेश झाला नाही...मात्र त्यावर भाष्य करताना 'घात आल्यावर नक्की पेरणी करू' असे सूचक विधान त्यांनी केले. यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

उरुण इस्लामपूर पालिकेतर्फे मुख्यमंत्र्याचा आज नागरी सत्कार झाला.त्यानिमित्ताने जाहीर सभा व शेतकरी मेळावा झाला. संपूर्ण समारंभावर भाजपची छाया होती. सभेच्या सुरवातीला तालुक्‍यातून आलेल्या काही शेतकरी कार्यकर्त्यांनी घोषणा देत भाजपच्या झेंड्याशेजारी संघटनेचे झेंडे लावले.

मुख्यमंत्री, मंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांतून शहरासाठी 69.70 कोटींची भुयारी गटार योजनेचा प्रारंभ, क्रांतिसिंह नाना पाटील कृषी महाविद्यालय मंजूर झाल्याबद्दल हा सत्कार झाला. महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. 

मुख्यमंत्र्याच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेवर टीका करताना माजी मंत्री जयंत पाटील यांनी 'मुख्यमंत्री सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त गाळच काढतात' असे वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, ''तुम्ही शेतकऱ्यांना विसरलात म्हणून घरी जाऊन बसलात. आता संघर्ष यात्रा काढून सोंग करता. पण तुम्ही थकवलेले ठिबक सिंचनाचे तीन वर्षाचे अनुदानही आम्हाला द्यावे लागले. हे तुमचे शेतकरी प्रेम. आम्हीच सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागासाठी सिंचन योजना सुरु केल्या. तुमच्या काळात या योजनांचा पैसा कुठे गेला हेच कळाले नाही. तुमच्या पंधरा वर्षाच्या कामाचा एका व्यासपीठावर येऊन पंचनामा करायची माझी तयारी आहे. तुम्हीही आमच्या अडीच वर्षाच्या कामाचा हिशेब घ्या. हा फैसला करायचीही गरज नाही. कारण गेल्या काही निवडणुकांमध्ये जनतेने त्याचा फैसला केला आहे. आता काही मंडळी आंदोलने करून शेतकऱ्यांचा पुळका आल्याचे दाखवत आहेत. यात्रा आंदोलने करीत आहेत. त्यांनी तेवढी उर्जा गावातील तलावांमधला गाळ उपसण्यासाठी खर्च केली तर शेतकऱ्याला दिलासा मिळेल. आम्ही करीत असलेल्या कामांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान कायमस्वरुपी बदलणार आहे. कदाचित अनेकांची आंदोलनाची दुकाने बंद होतील.'' 

मला खलनायक कराल तर याद राखा
'मला खलनायक कराल तर याद राखा' असा इशारा देत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भावनाप्रधान भाषणात खासदार राजू शेट्टी यांचा नामोल्लेख टाळून समाचार घेतला.

ते म्हणाले, ''मी जहागीरदाराचा पोरगा नाही. फाटका माणूस आहे. पेरणी कधी करायची याचे पक्के भान मला आहे. घात आल्यावर ती होईल. उद्या कणसं भरली तर गोफण घेऊन मी राखणीला उभा राहीन. वडिलांना अंथरुणावर ठेवून मी मराठवाड्याची यात्रा केली आहे. माझी शेतकऱ्यांशी असलेली नाळ कदापि तुटणार नाही. मी एकटा आहे असे म्हणणाऱ्यांना इथल्या गर्दीने उत्तर दिले आहे. या चौकात सभा घ्यायच्या अनेकांना नट नट्या आणाव्या लागत होत्या. '' 

व्यासपीठावर पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, समन्वयक मकरंद देशपांडे, गोपीचंद पडळकर, विक्रम पाटील उपस्थित होते. 

ह्यो कटाप्पा इकडेच येईल 
मंत्री सदाभाऊ खोत यांनी नामोल्लेख टाळून जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ''बाहुबली सिनेमा मी पाहिला नाही. मात्र मी त्यातल्या कटाप्पाला ओळखतो. पुढच्या काळात त्यो इकडंच यायला टपलाय. मुख्यमंत्रीसाहेब त्याला इकडे घेण्याआधी दहा वेळा विचार करा. त्याला घेतले तर तो कुणाचा कधी घात करेल हे समजणार नाही. कारण ते ज्या पक्षात राहतात त्या पक्षाचे काम करायचे त्यांना सवय नाही. त्यांच्या सासुरवासाला कंटाळूनच वैभव (शिंदे) इकडं आलाय.'' 

घात आल्यावर पेरणी 
मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपप्रवेशाबाबत थेट भाष्य टाळताना 'घात आल्यावर पेरणी करू' एवढेच सुचक वक्तव्य केले. शेतकरी मेळावा असला तरी त्याला स्वरुप भाजपच्या मेळाव्याचे आले होते. जतचे आमदार विलासराव जगताप वगळता जिल्ह्यातील सर्व भाजपची नेते मंडळी व्यासपीठावर हजर होती. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊप्रेमी नावाच्या टोप्या घातल्या होत्या. त्यांचे काही झेंडे मंडपात लागले होते मात्र ते उशिरानेच. 

नायकवडींची मुख्यमंत्री भेट 
पुरोगामी चळवळीचे आधारवड राहिलेल्या नागनाथअण्णा नायकवडी याचे नातू गौरव नायकवडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांचे निवासस्थान आज व्हीआयपी सेंटर झाले होते. रात्रीत त्यांच्या घरासमोरचा रस्ता डांबरी झाला होता. आज सकाळीपासून सर्व मात्तबर खोत यांच्या निवासस्थानी आले होते. माजी मंत्री विनय कोरे यांनीही काही काळ तेथे हजेरी लावली. मात्र ते मुख्य समारंभस्थळी आले नव्हते. 

घोषणांचे गणित मला कळते 
मुख्यमंत्र्याचे भाषण सुरु असताना 'कर्जमाफी झालीच पाहिजे' अशा घोषणा चार पाच कार्यकर्त्यांनी दिल्या. याचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले, ''अशा घोषणा मी जिथे जातो तेथे कायम होतात. चारच लोक अशा घोषण देतात. मला त्यामागचे गणित समजले आहे. सदाभाऊंनी या सरकारने ऊसाला दिलेला उच्चांकी दर ऐतिहासिक आहे. आता यापुढे ऊस दरासाठी आंदोलने करायची वेळ येणार नाही.''

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

उद्योगजकतेच्या दिशेने तरूणाईने टाकले एक पाऊल पुढे
मुंबई सांताक्रूझ परिसरात 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या
उद्या लागणार बारावीचा निकाल
गाण्यांत वापरली इंग्रजी, हिंदी भाषा तर बिघडले काय? : महेश मांजरेकर
गड्यांनो, आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर
नोटाबंदीने जिल्हा बँका अडचणीत : शरद पवार
इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प
... आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच!
दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री