कृष्णाकाठी फुलतेय पर्यटकांची रम्य सायंकाळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

सांगली : सांगलीत सुटीचा आनंद लुटण्यासाठी काय आहे, असा प्रश्‍न नेहमी पडे. सुटीला आलेल्यांना काय दाखवायचे... कोठे घेऊन जायचे...असा प्रश्‍न सांगलीकरांना पडे. सध्या मात्र कृष्णाकाठी रम्य सायंकाळ...कृष्णेत बोटिंग...वाऱ्याची झुळूक...मावळतीच्या लाल केशरी छटा...पाण्यावर तरंगणे अनुभवत कृष्णातीरी सांगलीकर गर्दी करीत आहेत.

यंदा उन्हाळा चांगलाच चटका देत आहे. दुपारी घरातून बाहेर पडण्यावर बंदीच आली होती. रणरणती दुपार आणि सायंकाळी कृष्णातीरावर नागरिक गर्दी करीत आहेत. सकाळी नदीत मनसोक्‍त डुंबणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पंधरवड्यापूर्वी मगरीने फेरफटका मारल्यानंतरही पोहायला येणाऱ्यांची गर्दी कमी झालेली नाही. दुपारी कृष्णातीर रिकामा असतो. सायंकाळी पाचनंतर पर्यटक, नागरिकांच्या वर्दळीने फुलतो.
आयर्विन पुलाला केलेली विद्युत रोषणाई, सुशोभित केलेले वसंतदादा पाटील यांचे स्मारक, स्वामी समर्थ मंदिराबरोबर बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मावळतीच्या सूर्याची लालसर किरणे कृष्णेच्या प्रवाहात तरळताना पाहणे विलोभनीयच. त्यात मंद वाऱ्याची  झुळूक उल्हासित करते. रोषणाईने उजळणारा पूल आकर्षक दिसतो. विस्तीर्ण पात्रात फिरणाऱ्या बोटींचे दृश्‍य तर सायंकाळ रम्य करून जाते.

जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या कल्पनेतून शहराला लाभलेल्या सुंदर नदीकाठाचा पर्यटकांसाठी बोटिंग सुरू करण्यास उपयोग करून घेतला. गतवर्षी सुरू झालेल्या बोटिंग क्‍लबच्या माध्यमातून नदीपात्रात नागरिक बोटिंगचा आनंद लुटत आहेत. वसंतदादा जन्मशताब्दीनिमित्त नदीत तयार केलेल्या तरंगत्या रंगमंचावरही सायंकाळी गर्दी होते. त्यावर बसून नदीच्या पाण्यात पाय हलवत गप्पांचे फड रंगत आहेत. सांगलीत आलेल्या पाहुण्यांना दाखवण्यासाठी काहीतरी उपलब्ध आहे, ही भावना सांगलीकरांनी सुखावह वाटत आहे. विशेष करून महिला, बालचमूंनी कृष्णाकाठ  उन्हाळ्यातही फुलत आहे.