‘एफआरपी’चा ३ हजारचा टप्पा पार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

प्रतिएकरी उतारा, वाढती महागाई, खतांचे वाढलेले दर, शेतमजुरी, वीज बिल यावरील वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांनी नव्या एफआरपीविषयी फारसे समाधान व्यक्त केलेले नाही. त्यामुळे भविष्यात पहिली उचल आणि अंतिम दर याचा संघर्ष अटळ राहणार आहे.  दुसऱ्या बाजूला साखरेचे दर ३४०० ते ४००० रुपयांवर स्थिर ठेवण्याच्या केंद्र शासनाच्या धोरणावर साखर कारखानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सांगली : उसाला प्रतिटन दराच्या शेतकरी संघटनांच्या नेहमीच वेगवेगळ्या मागण्या राहिल्या आहेत. यंदा किमान ३००० मिळालेच पाहिजेत, अशी चर्चा गेल्या काही वर्षांत सातत्याने होत आली. यावर्षी पहिल्यांदाच ३ हजार रुपयांवर अधिकृतपणे मिळणार आहेत. जिल्ह्यात साखर उताऱ्याच्या आधारावर  एफआरपी ३ हजारांचा टप्पा पार करून पुढे गेला आहे. प्रतिक्विंटल २५० रुपये वाढ झाल्याने पुढील हंगामात शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. 

अर्थात, केवळ हुतात्मा, राजारामबापू, सर्वोदय आणि सोनहिरा या कारखान्यांचा एफआरपी (तोडणी वाहतूक वजा करून) ३ हजारांवर पोचला असून इतरांचा उतारा कमी आहे. इतर कारखान्यांना इतका दर मिळणार नाही. तो दर सरासरी हेही वास्तव आहे. प्रतिएकरी उतारा, वाढती महागाई, खतांचे वाढलेले दर, शेतमजुरी, वीज बिल यावरील वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांनी नव्या एफआरपीविषयी फारसे समाधान व्यक्त केलेले नाही. त्यामुळे भविष्यात पहिली उचल आणि अंतिम दर याचा संघर्ष अटळ राहणार आहे.  दुसऱ्या बाजूला साखरेचे दर ३४०० ते ४००० रुपयांवर स्थिर ठेवण्याच्या केंद्र शासनाच्या धोरणावर साखर कारखानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

साखरेचे दर कोसळत असताना सरकार काही करत नाही, मग ते वाढत असताना साठाबंदीचा निर्णय घेऊन रोखते का? असा सवाल पुढे येतोय. जिल्ह्यात येत्या हंगामात ऊस दराची वेगळीच स्पर्धा पहायला मिळण्याची शक्‍यता आहे. कारण, वसंतदादा शेतकरी साखर कारखाना मुंबईतील श्री दत्त कंपनीने चालवायला घ्यायचा निर्णय जवळपास झाला आहे.  साखर उद्योगातील हे बडे नाव आहे. हा कारखाना नियोजित क्षमतेने चालला तर किमान ९ लाख टन गाळप करेल, असा अंदाज आहे. त्याचा परिणाम दुष्काळी भागातील माणगंगा, यशवंत, जत, महांकाली, मोहनराव शिंदे यांसह सर्वोदय कारखान्यालाही चिंता राहणार आहे. यावर्षी उसाची उपलब्धता थोडीच वाढलेली दिसेल, त्यापुढील हंगामात मुबलक ऊस असेल. त्यामुळे यंदाच्या हंगामात वाढलेल्या एफआरपीच्या पलीकडे जाऊन स्पर्धा होईल, अशी चिन्हे आहेत.